Home महाराष्ट्र निसर्गरंगांची रंगपंचमी पळसाच्या फुलांनी खुललेला उत्सव,मुलांकडून नैसर्गिक रंगांचा संदेश

निसर्गरंगांची रंगपंचमी पळसाच्या फुलांनी खुललेला उत्सव,मुलांकडून नैसर्गिक रंगांचा संदेश

173

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.2मार्च):-होळी आणि त्यानंतर येणारी रंगपंचमी हा आनंद,उत्साह आणि रंगांची उधळण करणारा सण.लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण या सणात मनमुराद सहभागी होताना दिसतो.रंगांची मस्ती करताना क्षणभर स्वतःला विसरून जाण्याचा हा उत्सव प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाची भर टाकतो.परंतु या रंगोत्सवाला निसर्गाचीही सुंदर साथ लाभलेली असते.उन्हाळ्याची चाहूल लागताच पळसाचे झाड फुलांनी बहरते.याच फुलाचे राणीसावरगाव येथील मुलांनी रंग तयार केले आहे.आकाशी निळ्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारी केशरी-तांबडी पळसाची फुले जणू निसर्गानेच रंगपंचमी साजरी केल्याचे भासवतात.हे दृश्य मनाला क्षणभर थांबवते, भुरळ घालते आणि खऱ्या अर्थाने “निसर्गाची रंगपंचमी” अनुभवायला लावते.

पूर्वी रंग फुलांपासून,पानांपासून आणि विविध नैसर्गिक साधनांपासून तयार केले जात.ते आरोग्यास हितकारक आणि पर्यावरणपूरक असत.मात्र अलीकडच्या काळात रासायनिक, केमिकलयुक्त रंगांचा वापर वाढला असून ते त्वचा,डोळे आणि आरोग्यासाठी घातक ठरत आहेत.जोषात होश नसतो असे म्हणतात ते काही खोटे नाही. रंगांच्या उत्साहात अनेक जण आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात.अशा वेळी राणीसावरगाव येथील काही लहान मुले मात्र निसर्गातून रंग गोळा करताना दिसतात.काहींना महागडे रंग परवडत नाहीत तर काही जण परंपरेनुसार नैसर्गिक रंग तयार करण्याचा प्रयत्न करतात.पळसाची फुले गोळा करताना,पानाफुलांपासून रंग तयार करताना ही मुले इतकी रमून जातात की त्यांना स्वतःचाच विसर पडतो.

नकळतपणे ती एक सुंदर संदेश देत असतात स्वस्त, मस्त आणि सुरक्षित नैसर्गिक रंग वापरा,आरोग्याची काळजी घ्या.पळसाचे झाड वर्षभर दुर्लक्षित राहते;पण उन्हाळ्याच्या सुरुवातीला तेच झाड फुलांनी बहरून सर्वांचे लक्ष वेधून घेते. जणू निसर्गच आपल्याला सांगत असतो की खरा उत्सव हा साधेपणात आणि नैसर्गिकतेत आहे.या रंगपंचमीच्या निमित्ताने आपणही निसर्गाच्या या रंगोत्सवाकडे पाहावे,त्याचा आनंद घ्यावा आणि शक्य तितक्या नैसर्गिक रंगांचा वापर करून सण अधिक सुरक्षित, आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा हीच खरी निसर्गरंगांची रंगपंचमी ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here