


फाल्गुन हा शालिवाहन शके महिन्यातील शेवटचा महिना आहे. त्यामुळे होळी हा हिंदू दिनदर्शिकेनुसार येणा-या महिन्यातील शेवटचा सण असतो. होळी पेटवून दुस-या दिवशी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी जमिनीला, मातीला नमस्कार करण्याची प्रथा आहे. प्रत्येक प्राणी मात्राचा देह हा पंचमहाभूतांपासून बनलेला असतो. पृथ्वी, आप, त्वज, वायू, आकाश असा या पंचमहाभूतांचा क्रम आहे. पृथ्वी पासून सुरुवात आणि आकाशापर्यंत शेवट असे पंचक असणा-या या तत्त्वांना आपल्या सणांच्या मधून आदर व्यक्त करण्याचा एक दिवस म्हणजे धूलिवंदन. यादिवशी पृथ्वीला वंदन केले जाते. त्यानंतर १५ दिवसांनी नववर्षाला म्हणजे पाडव्याच्या दिवशी आकाशाला भिडणारी गुढी उभारण्याची पद्धत आहे.
या दिवशी सकाळी घरातील बायका पाण्याची तपेली, घागरी, हंडे पाण्याने भरुन होळी पेटवलेल्या जागी ठेवतात. सूर्याच्या उन्हाने हे पाणी तापते. या पाण्याने लहान मुलांना आंघोळ घालतात. असे मानले जाते की या पाण्याने आंघोळ केली असता लहान मुलांना किंवा कोणालाही उन्हाळा बाधत नाही. या दिवसात कै-याही मिळू लागतात. कै-या उकडून त्याचा गर लहान मुलांना अंगाला लावून स्नान घालतात. मोठी माणसे होळीवर पाणी शिंपडून ती राख कपाळाला लावतात, अंगाला फासतात व नंतर स्नान करतात. काही ठिकाणी आजकाल लोकांनी आपापल्या सोयीनुसार होळीच्या दुस-या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा सुरु केली आहे. त्यात लहान-मोठे, स्त्रिया-पुरुष सरसकट सगळे उत्साहाने रंग खेळतात. परंतु रंगपंचमी हा वेगळा सण आहे. वसंत ऋतूची चाहूल लागल्यामुळे या सुमारास झाडे नवीन पालवीने व विविध रंगी फुलांनी रंगीबेरंगी दिसत असतात. हवाही उष्ण झालेली असते. अशावेळी थंड पाणी अंगावर उडविणे सुखदायक असते. त्यामुळे रंगपंचमी हा सण सुरु झाला.
कुसुंबीच्या फुलांपासून काढलेल्या रंगाचे पाणी करून तसेच केशराचे पाणी करून ते एकमेकांच्या अंगावर उडविले जात असे. पेशवाईत तर हा सण शाही इतमामाने साजरा केला जात असे. रंगाच्या पिचका-या भरभरून हत्तीवरून गुलाल आणि इतर कोरडया रंगाची उधळण केली जात असे. आजकाल विविध प्रकारचे रंग पाण्यात कालवून ते एकमेकांवर उडवितात. विशेषत: तरुण स्त्री-पुरुषांना एकत्र येण्याची व थट्टा-मस्करी करण्याची संधी या सणामुळे मिळते. परंतु कालांतराने अश्लील शब्द उच्चारून शंखध्वनी करणे यासारख्या विकृत गोष्टीही या उत्सवात शिरल्या. आजकाल एखाद्या हौदातील पाण्यात रंग टाकून एकमेकांना त्यात डुबवून हसत खेळत या सणाची मजा लुटली जाते.
धूलिवंदन (धुळवड) हा होळीच्या दुस-या दिवशी फाल्गुन वद्य प्रतिपदेला साजरा केला जाणारा रंगांचा आणि आनंदाचा सण आहे. या दिवशी होळीची राख आणि माती अंगाला लावून पृथ्वीला वंदन करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रात या दिवशी एकमेकांवर रंगपाणी आणि चिखल उडवून वसंत ऋतूचे स्वागत केले जाते. तसेच परस्परांतील मतभेद विसरून हा सण साजरा केला जातो. होळी पौर्णिमेच्या दुस-या दिवशी फाल्गुन वद्य प्रतिपदेस सकाळी धुळवड साजरी करतात. पहिल्या दिवशी पेटवलेल्या होळीच्या पवित्र राखेला वंदन करून ती अंगाला लावतात ज्याला ‘धूलिवंदन’ म्हणतात.
काही ठिकाणी विशेषतः ग्रामीण भागात चिखल उडवून धुळवड खेळली जाते. हा सण रंगप्रेम आणि वसंत ऋतूचे प्रतीक असून समाजातील बंध म्हणजेच सामाजिक एकता मजबूत करतो. पौराणिक संदर्भानुसार हिरण्यकश्यपूवर विष्णूच्या नरसिंह रुपाने मिळवलेल्या विजयाचे अर्थात वाईटावर चांगल्याचा विजयाचे हे स्मरण आहे. यामागिल वैज्ञानिक महत्त्व असा आहे की, हा सण रंगांचा वापर करून आरोग्यासाठी आणि वसंत ऋतूच्या बदलांमध्ये शरीरातील दोष संतुलित करण्यासाठीही साजरा केला जातो. एकंदरीत धूलिवंदन हे होळीच्या उत्सवाचा अविभाज्य भाग असून तो आनंदरंग आणि सामाजिक सलोख्याचा दिवस आहे.
रंग उधळले आसमंती
गोकुळ धुंद झाला
राधा-कृष्णाचा प्रेम स्नेह
चोहीकडे दरवळला
✒️शब्दस्पर्शी:-सुनील शिरपुरे(कमळवेल्ली,यवतमाळ)मो:-७०५७१८५४७९














