


मुंबई : सामाजिक, संविधानिक, पॅन्थर आंबेडकरी चळवळ आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात ठसा उमटवणारे मराठवाड्याचे सुपुत्र डॉ. राजन लता ईश्वर माकणीकर यांनी जीवनाचा अत्यंत भावनिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. संसारातील जबाबदाऱ्या, नातीगोती, संघर्ष व कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडल्यानंतर त्यांनी आता गृहस्थ जीवनाचा त्याग करून बुद्ध धम्म संघात भिक्षु म्हणून प्रवेश करण्याचा संकल्प केला आहे.
आपल्या निर्णयामागील भावना व्यक्त करताना डॉ. माकणीकर म्हणाले..,
“जीवनात सुख-दुःख, अपमान- सन्मान, लाभ-हानी सर्व अनुभवले. पण अंतिम शांतता आणि मोक्षाचा मार्ग केवळ बुद्ध धम्मात आहे. संसार सोडणे म्हणजे कुणाविरुद्ध पळ काढणे नाही, तर करुणा, प्रज्ञा आणि समतेच्या मार्गाने खरी मुक्ती शोधणे आहे. आता उरलेले दिवस धम्ममार्गावर चालत समाजाला करुणेचा संदेश देण्यासाठी अर्पण करतो.”
ते पुढे म्हणाले,”माझा हा निर्णय सहज नाही. संसार त्याग म्हणजे केवळ नातीगोतींचा नव्हे तर स्वतःच्या अहंकाराचा व वासनांचा त्याग आहे. पण हाच त्याग मला खरी शांती आणि आत्ममुक्ती देईल.”
डॉ. माकणीकर यांनी आपल्या पत्रातून स्पष्ट केले आहे की, मुंबई महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर ते बिहारच्या बोधगया येथे जाऊन भिक्षु दिक्षा घेतील व उर्वरित जीवन धम्माच्या साधनेत व्यतीत करतील.
याशिवाय माझा खून झाला किंवा अपघाती मृत्यू झाल्यास माझा चेहरा माझ्या कोणत्याहि नातलगाला न दाखवता किंवा कोणते संस्कार विधी न करू देता मी केलेले मरणोत्तर नेत्र, अवयव गरजूना द्यावी तसेच देहदान कायदेशीर व वैद्यकीय प्रक्रिया करून वैद्यकीय अभ्यासा साठी वापरन्यात यावा तसेच 2 वर्षांनी संबंधित आरोग्य केंन्द्र किंवा शासनाच्या वतीने बौध्द पद्धतीने अंतिम संस्कार करावेत असा मनोदय हि त्यांनी व्यक्त केला आहे.














