


✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.31जानेवारी):-प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत या अभियाना अंतर्गत भोलारामजी कांकरिया बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट (बीकेबीसी) संस्थेच्या वतीने १० क्षयरुग्ण दत्तक घेऊन पूरक पोषक आहाराचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाद्वारे, गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या क्षयरोग केंद्रात दत्तक घेतलेल्या १० क्षयरुग्णांना विविध पोषक आहाराचे वितरण करण्यात आले. यामध्ये गहू, तांदूळ, मूगडाळ, चवळी, शेंगदाणे, खाद्यतेल, राजगिरा लाडू यासारख्या साहित्याचा समावेश होता. या उपक्रमात रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारे पोषणकारक आहार देण्यात आले, जेणेकरून त्यांचे पुनर्वसन शक्य होईल आणि त्यांच्या उपचारात मदत होईल.
या कार्यकमासाठी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. केशव मुंढे सर, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक रविंद्रकुमार मैड सर, वरिष्ठ प्रयोगशाळा उपचार पर्यवेक्षक आनंद पथक सर, संस्थेच्या सचिव सौ. मंजुताई दर्डा, पूजा दर्डा, सिद्धार्थ दर्डा, अमर करंडे, शुभम जामगे, ऋषभ दर्डा तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
कांकरिया ट्रस्टच्या या उपक्रमाने एक सामाजिक जबाबदारी निभावली आहे, आणि ट्रस्टने यापुढेही अशी मानवसेवेची कार्ये सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. ‘मानव सेवा हिच ईश्वर सेवा’ या आदर्शावर आधारित या उपक्रमाने अनेक दीन-दुखी व्यक्तींना आशेचा किरण दाखवला आहे.
पुन्हा एकदा मानवतेसाठी समर्पित कार्य करून कांकरिया ट्रस्ट समाजात सकारात्मक बदल घडवण्यास तत्पर आहे.














