Home चंद्रपूर नगर परिषद राजुरा येथे वृक्ष प्राधिकरण समितीचे पुनर्गठन

नगर परिषद राजुरा येथे वृक्ष प्राधिकरण समितीचे पुनर्गठन

21

▪️सदस्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित-पर्यावरण संवर्धनासाठी नगर परिषद राजुराचा पुढाकार.

✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.१जून):-महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) अधिनियम २०२१ अंतर्गत नगर परिषद राजुरा येथे सुधारित वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमार्फत शहरातील वृक्ष संवर्धन, वृक्षतोड व छाटणी अर्जांची छाननी, नवीन वृक्ष लागवड नियोजन तसेच वृक्ष संरक्षणासंबंधी विविध कामे करण्यात येणार आहेत.

समितीच्या अध्यक्षपदी मुख्याधिकारी तथा वृक्ष प्राधिकरी विवेक चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली असून सदस्य म्हणून नगर परिषद चे संदीप वानखेडे, कार्यालय अधीक्षक,सुमेध खापर्डे, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता , तसेच बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, प्रकाश आक्केवार , सेवानिवृत्त वनपाल, वनविभाग राजुरा, आणि आशिष मडावी, संगणक चालक न.प.राजुरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

समितीच्या कार्यकक्षेनुसार शहरातील वृक्षतोड व वृक्ष छाटणी संदर्भातील अर्ज स्वीकारणे, स्थळ पाहणी करणे, आवश्यकतेनुसार वृक्षांचे मूल्यांकन करणे, नवीन वृक्ष लागवडीचे नियोजन करणे, नागरिकांना सूचना देणे, वृक्ष गणना करणे तसेच वृक्ष संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविणे ही प्रमुख कार्ये राहणार आहेत.

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, राजुरा यांचे प्रतिनिधी म्हणून सदस्य बादल बेले तसेच प्रकाश आक्केवार, सेवानिवृत्त वनपाल यांच्यावर प्राप्त अर्जांनुसार स्थळ पाहणी करणे, अभिप्राय देणे, नवीन वृक्ष लागवड व संवर्धनाबाबत नियोजन करण्यास मदत करणे तसेच वृक्ष गणना व इतर अनुषंगिक कामांमध्ये सहकार्य करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

या समितीच्या स्थापनेमुळे राजुरा शहरातील हरित क्षेत्राचे संरक्षण, वृक्ष संवर्धनाला चालना आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्रभावी यंत्रणा उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here