Home अमरावती ‘कृत्रिम प्रज्ञा’ : विज्ञान, संवेदनशीलता आणि मानवी मूल्यांचा समतोल साधणारी प्रेरणादायी कादंबरी

‘कृत्रिम प्रज्ञा’ : विज्ञान, संवेदनशीलता आणि मानवी मूल्यांचा समतोल साधणारी प्रेरणादायी कादंबरी

106

कृत्रिम बुद्धिमत्ता AI हा अत्यंत क्लिष्ट आणि व्यापक विषय सर्वसामान्य वाचकांपर्यंत सहज, सोप्या आणि प्रभावी भाषेत पोहोचविणे हे मोठे आव्हान असते. हे आव्हान समर्थपणे पेलताना लेखक आदरणीय शेषराव खाडे यांची सर्जनशील प्रतिभा आणि समाजाभिमुख दृष्टी प्रकर्षाने जाणवते. विज्ञानाची आवड निर्माण करून तरुण पिढीला सकारात्मक दिशा देणारी, तसेच सुखी आणि सुसंस्कृत समाजनिर्मितीचा संदेश देणारी ही ‘कृत्रिम प्रज्ञा’ कादंबरी अत्यंत प्रेरणादायी ठरते.

ही कादंबरी एका संयुक्त कुटुंबाच्या पार्श्वभूमीवर उभी राहते. कुटुंबप्रमुख आजोबा आणि त्यांची नातवंडे रुद्र, भागर्व, अर्णव, आर्या आणि अदैय यांच्या संवादातून AI, संगणक आणि आधुनिक तंत्रज्ञानाविषयीचे विचार मांडले गेले आहेत. संवादप्रधान शैली, सरळ भाषा आणि सहज उदाहरणांमुळे विषय सामान्य वाचकालाही रुचकर वाटतो. या कथनातून एकत्र कुटुंबपद्धतीचे महत्त्व अधोरेखित होते. आजच्या काळात कुटुंबातील संवाद हरवत चालला असताना दोन पिढ्यांमध्ये तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विचारमंथन घडवून आणणे ही कादंबरीची विशेष जमेची बाजू आहे.

लेखकाने AI च्या वाढत्या प्रभावाकडे केवळ तांत्रिक दृष्टीने न पाहता मानवी मूल्यांच्या संदर्भातही विचार मांडले आहेत. शिवपुराणातील भस्मासुर जसा विनाशकारी ठरला, तसेच सिलिकॉनवर आधारित AI तंत्रज्ञानही भविष्यात भस्मासुर ठरू नये, या कल्पनेतून या कादंबरीचा जन्म झाल्याचे जाणवते. तंत्रज्ञानाचा वापर विकासासाठी व्हावा; मात्र त्यात मानवी संवेदनशीलता आणि सद्सद्विवेकबुद्धी कायम राहिली पाहिजे, ही लेखकाची भूमिका अत्यंत कौतुकास्पद आहे.

अवघ्या १२८ पानांच्या या कादंबरीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा इतिहास, संकल्पना, विकास, उपयोगाच्या संधी आणि संभाव्य धोके यांचे सुसंगत विश्लेषण करण्यात आले आहे. AI मुळे शिक्षण, उद्योग, प्रशासन, समाजव्यवस्था आणि मानवी जीवनाच्या सर्वच क्षेत्रांवर होणारा प्रभाव लेखक प्रभावीपणे अधोरेखित करतात. तंत्रज्ञानाचा योग्य वापर मानवी कल्याणासाठी कसा होऊ शकतो, यावर ही कादंबरी वाचकाला गांभीर्याने विचार करायला भाग पाडते.

लेखक शेतकरी, शासकीय अधिकारी आणि साहित्यिक अशा तिन्ही भूमिकांतून आलेले अनुभव कथानकात प्रभावीपणे मांडतात. शेतीतील वाढते संकट, उत्पन्न आणि खर्चातील विसंगती, तसेच वाढत्या शेतकरी आत्महत्या यामुळे लेखक अस्वस्थ झाल्याचे जाणवते. AI तंत्रज्ञान शेतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी उपयोगी ठरू शकते का, हा प्रश्न लेखक आपल्या नातवंडांसमोर उपस्थित करतात. ‘मिशन कृषिवल’ या संकल्पनेतून AI च्या साहाय्याने शेतकरी आत्महत्या थांबविण्याचे प्रयत्न व्हावेत, हा अत्यंत विधायक विचार कादंबरीत मांडण्यात आला आहे.

कादंबरीत विज्ञान आणि ज्ञान यांतील सूक्ष्म फरकही स्पष्ट करण्यात आला आहे. “जेथे विज्ञान संपते, तेथून ज्ञानाचा प्रवास सुरू होतो,” या विचारातून लेखक सांगतात की AI चा शोध विज्ञानामुळे लागला असला, तरी त्याचा योग्य उपयोग कसा आणि कोणासाठी करायचा हे ज्ञानाशिवाय समजत नाही. युवकांनी संशोधन करावे; पण ते संशोधन मानवकल्याणासाठी असावे, हा संदेश कादंबरीत सातत्याने अधोरेखित केला आहे.

लेखकाने AI च्या अतिरेकी वापराबद्दलही गंभीर चिंता व्यक्त केली आहे. लॅमार्कच्या सिद्धांताचा संदर्भ देत, ज्या अवयवांचा उपयोग होत नाही ते कालांतराने नष्ट होतात, हे उदाहरण देऊन लेखक सांगतात की AI मुळे जर माणूस विचार करणेच कमी करेल, तर मानवी मेंदूची कार्यक्षमताच कमी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. हा विचार वाचकाला अंतर्मुख करणारा आहे.

भारतात AI क्षेत्रातील बहुतांश काम परदेशी सर्व्हरवर चालते आणि भारत आजही AI चा वापरकर्ता देश आहे, निर्माता नाही, याची खंत लेखक व्यक्त करतात. भारतीय संशोधक आणि अभियंते परदेशात जाऊन काम करतात आणि आपणच त्यांचे संशोधन महागड्या दराने विकत घेतो, ही वस्तुस्थिती लेखकाने स्पष्टपणे मांडली आहे. आजच्या तरुणांनी भारताच्या विकासासाठी संशोधन करावे आणि समाजहिताला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा लेखक व्यक्त करतात.

कादंबरीत पर्यावरण आणि निसर्गसंवर्धनाचा मुद्दाही प्रभावीपणे मांडला आहे. निसर्गाशी संघर्ष न करता त्याच्याशी समरस होऊन विकास साधावा, असा संदेश लेखक देतात. गंगा, गोदावरी, कावेरी यांसारख्या नद्या प्रदूषणामुळे विषारी होत चालल्या आहेत; पाणी आणि विजेच्या टंचाईमुळे शेतीसमोर मोठे संकट उभे राहत आहे, याकडे लेखक गांभीर्याने लक्ष वेधतात. निसर्गाला शत्रू नव्हे, तर मित्र मानण्याची शिकवण ही कादंबरी देते.

शिक्षण क्षेत्रावर AI मुळे होणाऱ्या परिणामांचाही विचार लेखकाने केला आहे. भविष्यात शिक्षकांची संख्या कमी झाली, तर शिक्षणव्यवस्थेचे काय होईल? आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबे AI आधारित शिक्षण घेऊ शकतील; मात्र गरीब विद्यार्थ्यांचे काय? अशा प्रश्नांमधून वाढती सामाजिक विषमता आणि लोकशाहीसमोरील धोके लेखक अधोरेखित करतात.

AI चा वापर युद्धासाठी नव्हे, तर युद्ध टाळण्यासाठी व्हावा, ही लेखकाची मानवतावादी भूमिका विशेष लक्षवेधी आहे. AI ने मानवी जीवन सुलभ व्हावे; मात्र यंत्रमानवांनी माणसालाच पर्याय बनू नये, हा लेखकाचा स्पष्ट इशारा आहे. अन्यथा समाजासमोर गंभीर अनर्थ उभा राहू शकतो, ही जाणीव ही कादंबरी करून देते.

‘कृत्रिम प्रज्ञा’ ही केवळ AI विषयावरील कादंबरी नसून विज्ञान, संस्कार, पर्यावरण, शिक्षण, शेती, मानवी मूल्ये आणि सामाजिक जबाबदारी यांचा समतोल साधणारी चिंतनशील साहित्यकृती आहे. आधुनिक तंत्रज्ञानाकडे विवेकपूर्ण आणि मानवी दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा ही कादंबरी देते. लेखकाच्या अमृत महोत्सवी वर्षात प्रकाशित होणारी ही कादंबरी साहित्यविश्वासाठी अभिमानाची आणि समाजासाठी दिशादर्शक ठरणारी आहे.

लेखकाच्या लेखणीतून समाजप्रबोधनाचा, ज्ञानाचा आणि संस्कारांचा प्रकाश असाच सतत पसरत राहो, हीच शुभेच्छा. आदरणीय शेषराव खाडे साहेबाचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण होत असून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 

▪️समीक्षक:-प्रा. डॉ. रविकांत महिंदकर(कला,वाणिज्य महाविद्यालय,जरूड)

▪️संकलन:-विद्रोही अविनाश गोंडाणे(अमरावती)मो:-९९२३२६४१९३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here