Home नागपूर जीवनात मोठे कार्य करायचे असेल तर शिक्षण हाच परिवर्तनाचा पाया आहे-प्रवीण बागडे

जीवनात मोठे कार्य करायचे असेल तर शिक्षण हाच परिवर्तनाचा पाया आहे-प्रवीण बागडे

86

✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नागपूर(दि.31मे):-लष्करीबाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशन सभागृहात बहुजन हिताय संघाची ४७२ वी साप्ताहिक सभा शनिवारी (दि. ३०) उत्साहात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रशासनिक अधिकारी, साहित्यिक व स्वतंत्र लेखक प्रवीण बागडे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक न्याय विभागाचे माजी उपायुक्त संजीव गाडे उपस्थित होते. याप्रसंगी बहुजन हिताय संघाचे अध्यक्ष तथा आंबेडकरी विचारवंत डॉ. शंकर खोब्रागडे व राजेंद्र गजभिये प्रज्ञापीठावर उपस्थित होते.

                                     कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्रिशरण, पंचशील व बुद्धवंदनेने करण्यात आली. अध्यक्ष प्रवीण बागडे यांनी उपस्थितांकडून आनापानसती साधना करून घेतली, तर प्रमुख अतिथी संजीव गाडे यांनी बावीस प्रतिज्ञा वदवून घेतल्या. तसेच मनोगत व्यक्त करताना त्यांनी हिस डेव्हिड यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत बौद्ध धम्माच्या जागतिक प्रसारासाठी त्यांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला.

           संस्थेचे अध्यक्ष डॉ. शंकर खोब्रागडे यांनी यकृताचे आरोग्य, फॅटी लिव्हर, लिव्हर कॅन्सर, मधुमेह, हृदयविकार आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय याविषयी मार्गदर्शन केले. जागतिक तंबाखूमुक्त दिनानिमित्त तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांबाबतही जनजागृती करण्यात आली.

बहुजन हिताय संघाचे उपाध्यक्ष बौद्धाचार्य प्रकाश सोनटक्के यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. सुत्तपठणादरम्यान रविंद्र हुमणे यांनी धम्मविषयक मार्गदर्शन केले. प्रथमच सभेला उपस्थित राहिलेल्या आयु. प्रभाकर सोमकुवर यांनी संघाच्या धम्म, समाजप्रबोधन व सामाजिक कार्याचे कौतुक केले.       

          अध्यक्षीय मनोगतात प्रवीण बागडे यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना, “जीवनात काही मोठे कार्य करायचे असेल तर सर्वप्रथम शिक्षित होणे आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्रातील वाढते बाजारीकरण ही चिंतेची बाब असून तरुणांनी या विषयावर गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन केले. तसेच बहुजन हिताय संघासारख्या संस्था समाजजागृतीचे महत्त्वपूर्ण कार्य करीत असून अशा सभा समाजपरिवर्तनाची शाळा असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. राजेंद्र गजभिये यांनी केले, तर आभार प्रदर्शन आयु. माया बोंदाडे यांनी मानले. समापन गाथा प्रा. नंदाताई भगत यांनी सादर केली. वर्षाताई टेंभेकर, मंगलाताई राऊत व संगीताताई पानतावणे यांनी राष्ट्रगीत सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here