


आशिया खंडातील पहिली ग्रामपंचायत , मुंबई प्रांतातील दुसरी नगरपालिका म्हणून ज्या रहिमतपूर चा ऊल्येख केला जातो त्या रहिमतपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दिनांक ५ मे १९२६ रोजी सभा झाली होती .
१६ व्या शतकात आदिलशाहीतील रहिमत खान या सरदाराने हे गाव वसविले आहे . रहिमतपूर हे गाव कुमंडलू नदी किनारी वसले आहे . या नदीच्या एका बाजूस मुस्लिम वस्ती तर दुसऱ्या बाजूस हिंदू वस्ती आहे . या दोन्ही धर्मीय जनतेला जोडण्या करिता या नदीवर केसरी नावाचा पुल बांधण्यात आला . १६ व्या शतका पासूनच हे शहर व्यापारी दृष्ट्या गजबजलेले राहिले आहे . पेशव्यांच्या काळी येथे टाकसाळ होती . इथं अस्पृश्य समाजाची वस्ती आधी पासूनच होती . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचे लोण अगदी सुरवातीच्या काळा पासून इथं पसरले होते . बाबासाहेबांनी इथं जिल्हास्तरीय महार परिषद घेण्याचा विचार बोलून दाखविला असता स्थानिक महार लोकांनी या परिषदेचे आयोजन केले , परिषदेच्या यशस्वीतेकरिता महिलांचा सुद्धा सहभाग राहिलेला होता .
सातारा जिल्हा महार परिषद दिनांक ५ मे १९२६ रोजी रहिमतपूर येथे घेण्याचे निश्चित झाले असता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अध्यक्ष म्हणून परिषदेस येण्याचे मान्य केले . डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या गावी येणार म्हणून सर्व अस्पृश्य समाजात तसेच सत्यशोधक , ब्राम्हणेतर चळवळीतील जनतेत मोठा उत्साह संचारला . या काळी इथं ब्राम्हणेतर चळवळ मोठी प्रभावी होती . धनजी भाई हे या चळवळीचे मोठे नेते होते . त्यांनीसुद्धा या परिषदेच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले .
ही परिषद सातारा जिल्ह्यातील महार समाजाची जरी असली तरी या परिषदेस मुंबई , पुणे , फलटण आदी भागांतून महार लोक मोठ्यासंख्येने आलेले होते . सातारा लोकल बोर्ड चे अध्यक्ष ( जे पुढं मुंबई प्रांताचे पहिले प्रधानमंत्री झाले ) प्रसिद्ध उद्योगपती तथा नगरसेवक , नगराध्यक्ष अशी पदं भूषविलेले धनजी भाई कूपर , प्रसिद्ध स्वातंत्र्य सेनानी , ( जे पुढं १९४७ ते १९५२ मुंबई विधान परिषदेचे सभापती झाले ) रामचंद्र सोमण , प्रसिद्ध स्वातंत्र्य सेनानी सीताराम रामजी तावडे , कोरेगाव चे तहसीलदार दुदुस्कर मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले .
परिषदेचे स्थळ हे पटांगण होते , सभामंच सुशोभित होता , सभेची वेळ दुपारी ३ ची होती . परिषदेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर व निमंत्रित सर्व मंडळी वेळेत सभामंचवर आली . या सभेस सीताराम शिवतरकर , जनार्दन रणपिसे , धर्माजी सावंत व काही मंडळी बाबासाहेबांसोबत आली होती . परिषदेस सुमारे १५ हजार लोक उपस्थित असल्याचे सांगितले जाते . या परिषदेत सातारा लोकल बोर्ड चे अध्यक्ष धनजीभाई कूपर , सीताराम शिवतरकर, जनार्दन रणपिसे , सीताराम रामजी तावडे , रामचंद्र सोमण यांची मुख्य भाषणं झाल्या नंतर विविध ठरावांचे वाचन करण्यात आले .
यात एक ठराव असा वाचण्यात आला की , ‘ बहिष्कृत वर्गातील योग्य व्यक्तीस जे. पी. करावे ‘. ठरावांचे वाचन होताच रामचंद्र सोमण यांनी या ठरावास हरकत घेतली . हरकत घेतांना सोमण यांनी सांगितले की , आपल्या देशावर परकियांची सत्ता आहे , त्या सत्तेविरूद्ध देशात मोठे आंदोलन सुरू आहे अश्या परिस्थितीत आपण सरकारी पदव्या , किताब , नौकरी मागणे चुकीचे आहे . या मागणीतून आपण आपल्या गुलामगिरीला पाठिंबा देत आहोत , म्हणून हा ठराव संमत करण्यात येऊ नये . सोमण यांच्या या हरकतीने परिषदेत काहीशी चलबिचल सुरू झाली .
सरते शेवटी परिषदेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषणा करिता उभे राहिले . उपस्थित जनतेने त्यांच्या जय जय काराच्या घोषणा दिल्या . बाबासाहेबांनी सोमण यांनी घेतलेल्या हरकतीस प्रखर विरोध केला. आपल्या भाषणात बाबासाहेबांनी सांगितले की , …… अस्पृश्य समाजाच्या हातात सत्ता व संपत्ती जसजशी अधिक येत जाईल तसतशी त्यांची प्रगती होत जाईल . जे. पी. होणे किंवा आमदार होणे ही प्रगती घडवून आणण्याची साधने होत व ती आम्ही हाती घेतलीच पाहिजे . भारत परकियांच्या गुलामीत कसा गेला , बहिष्कृत समाज गुलाम कसा राहिला याचे विश्लेषण त्यांनी केले . ब्राम्हणेतर समाज व बहिष्कृत समाजाला आपल्या गुलामीचे कारण कळून चुकले आहे .तेंव्हा या दोन्ही समाजाने एकत्र येऊन आत्मप्रगतीची चळवळ चालविली तर ते पांढरपेशा वर्गाच्या गुलामीतून नक्कीच मुक्त होतील .
भाषणाच्या शेवटी बाबासाहेबांनी सांगितले की, अस्पृश्य समाजास या पांढरपेशा वर्गा पासून दूर ठेवणे मी माझे कर्तव्य समजतो. कारण मी माझ्या आंधळ्या जनतेच्या हातातील काठी आहे. या काठीच्या आधारे माझी जनता प्रगतीची वाट चालू लागली तर ती कधीही खड्ड्यात पडणार नाही .
रहिमतपूर येथील आताच्या बौद्ध जनतेने बाबासाहेबांनी दिलेल्या या ऐतिहासिक संदेशाने आपली प्रगती करणे काळाची गरज आहे . बाबासाहेबांनी रहिमतपूर गावाला दिलेल्या भेटीचे हे शताब्दी वर्ष आहे , या वर्षभरात गावकऱ्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून या संदेशाचा प्रचार , प्रसार करावा व नवीन पिढी समोर हा इतिहास जागृत ठेवावा . रहिमतपूर विषयक इतिहासात अनेक लहान , लहान घटना आलेल्या आहेत पण ‘ भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या गावी येऊन गेले ‘ असा साधा उल्येख कोठेच केला गेला नाही . या सभेस धनाजिभाई आलेले होते ही बाब सुद्धा काही लहान नाही . त्या काळातील ब्राम्हणेतर चळवळीचे ते फार मोठे पुढारी होते , पुढं त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला , मुंबई प्रांताचे पहिले प्रधानमंत्री झाले , मात्र रहिमतपूरचा इतिहास लिहणाऱ्या लेखकांनी या बाबीकडे दुर्लक्ष केले. अर्थात लेखकांनी असे वागणे बरे नव्हे .
✒️लेखक:-जयसिंग वाघ(अजिंठा हाउसिंग सोसायटी , अजिंठा चौक ,जळगाव)संपर्क:-९८८१९२८८८१














