


✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.3एप्रिल):-नागपूर विभागात आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, नियोजनबद्ध नवोपक्रम, शिस्तप्रिय, संस्कारक्षम व आनंददायी वातावरण इ. अनेकविध वैशिष्ट्यांमुळे विशेष ओळख निर्माण करणाऱ्या ने.भै.हि. शिक्षण संस्था, ब्रम्हपुरी द्वारा संचालित नेवजाबाई हितकारिणी उच्च माध्यमिक विद्यालय, ब्रम्हपुरीला २०२५-२६ या शैक्षणिक सत्रातील ‘राज्यस्तरीय आदर्श शाळा’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. विद्यालयाचे अभिनव उपक्रम, उत्कृष्ट व्यवस्थापन, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य तथा शैक्षणिक गुणवत्तेतील सातत्यपूर्ण प्रगती यांची दखल घेऊन राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राज्यस्तरावर शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ‘ध्येय एज्युकेशन फाउंडेशन, पुणे’ या संस्थेद्वारा पिंपरी -चिंचवड (पुणे) येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात आयोजित भव्य सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाचे प्राचार्य के. एम. नाईक आणि पर्यवेक्षक प्रा. पी. आर. जीभकाटे यांनी सदर पुरस्कार स्विकारला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यालयाचे नावीन्यपूर्ण उपक्रम व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे कौतुक करतांना भविष्यातही अशीच प्रगती कायम राखण्याच्या शुभेच्छा दिल्या.
विद्यालय ‘राज्यस्तरीय आदर्श शाळा’ पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल ने. भै. हि. शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती स्नेहलताबाई भैया, सचिव अशोकजी भैया, सहसचिव ॲड. भास्करराव उराडे, सदस्य प्रा. सुभाषजी बजाज, सदस्य गौरवजी भैया व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या सन्मानामुळे विद्यालयाचे शिक्षकवृंद, प्रशासकीय कर्मचारीवृंद, विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण असून संपूर्ण ब्रम्हपुरी परिसरात विद्यालयाचे कौतुक होत आहे.














