Home महाराष्ट्र रामधीरजजींना ‘जमनाबेन लोकसेवक पुरस्कार’: रविवारी ५ एप्रिलला होणार सोहळा

रामधीरजजींना ‘जमनाबेन लोकसेवक पुरस्कार’: रविवारी ५ एप्रिलला होणार सोहळा

75

✒️धुळे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

धुळे,जळगाव(दि.३एप्रिल):- गांधीवादी विचारांच्या प्रसारासाठी आयुष्य वाहिलेल्या उत्तर प्रदेश सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष रामधीरज बालेश्वरजी सिंग यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘जमनाबेन लोकसेवक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यांचा गौरव ५ एप्रिल रोजी सायंकाळी बर्वे छात्रालयात होणाऱ्या सोहळ्यात माजी कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे व धुळे महानगरपालिकेच्या महापौर मायादेवी परदेशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साम्यकदर्शनचे संपादक रमेश दाणे राहणार असून, जळगाव येथील हरिजन सेवक संघाचे शंभू पाटील यांचे ‘महात्मा गांधी आणि अहिंसा’ या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे.

मालेगाव येथील महाराष्ट्र गो विज्ञान समितीच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार जैन इरिगेशनची सेवाभावी संस्था भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन, गांधीतीर्थ यांच्या पुरस्कृत आहे. सर्वोदयी कार्यकर्त्यांमध्ये या पुरस्काराला विशेष मानाचे स्थान आहे.

रविवारी, दि. ५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५.३० ला बर्वे छात्रालयात होणाऱ्या या कार्यक्रत यावेळी पुरस्कारार्थी रामधीरजजी यांच्या कार्याचा आढावा घेणारा लघुपटही प्रस्तूत केला जाणार आहे. या पुरस्काराचे स्वरुप ५१ हजार रुपयांचा धनादेश, शाल, श्रीफळ, मानचिन्ह व मानपत्र असे आहे.

गांधी रिसर्च फाउंडेशन आणि भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन जळगाव तसेच महाराष्ट्र गो विज्ञान समिती, मालेगावतर्फे नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 *रामधीरजजींचा थोडक्यात परिचय* 

रामधीरज बालेश्वरजी सिंग यांचा जन्म १४ डिसेंबर १९५४ रोजी वाराणसी जिल्ह्यातील कोरी (सध्याचे चंदौली) येथे झाला. प्राथमिक शिक्षण गावातच झाल्यानंतर त्यांनी इलाहाबाद विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. बालपणापासूनच गांधी विचारांचा प्रभाव असलेल्या रामधीरजजींनी १९७४ च्या जयप्रकाश नारायण आंदोलनात सहभाग घेतला. आणीबाणीच्या काळात १८ महिन्यांचा कारावास भोगल्यानंतर त्यांच्या विचारांना अधिक धार आली.

विद्यार्थी व किसान आंदोलनात सक्रिय सहभाग घेत त्यांनी १९८९ मध्ये ‘आज़ादी बचाओ आंदोलन’ व ‘लोक स्वराज अभियान’ सुरू केले. बहुराष्ट्रीय कंपन्यांविरुद्ध स्वदेशी चळवळ उभारण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. सध्या ते उत्तर प्रदेश सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून, वाराणसीतील वारसा स्थळांच्या संरक्षणासाठी सत्याग्रह, पदयात्रा व उपोषणाद्वारे लढा देत आहेत. गांधीवादी मूल्यांचे आचरण हेच कार्यकर्त्यांचे बळ असल्याचा त्यांचा ठाम विश्वास आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here