Home चंद्रपूर धोपताला ओपन कास्ट खदानातील आगीचा धूर सास्तीगावासाठी ठरतोय जीवघेणा

धोपताला ओपन कास्ट खदानातील आगीचा धूर सास्तीगावासाठी ठरतोय जीवघेणा

67

▪️कोलबेंच व कोलस्टॉकला लागलेल्या आगीमुळे प्रदूषण वाढले ; नागरिकांचा चक्काजाम आंदोलनातून संताप

✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.मार्च):-वेकोली च्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत धोपटाळा ओपन कास्ट कोळसा खदान परिसरातील कोलबेंच व कोलस्टॉकला लागलेल्या आगीमुळे निर्माण होणाऱ्या धुरामुळे सास्तीगावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून संपूर्ण गाव प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. दोन दिवसांपासून येथे धूर व आगजनीचे प्रकार घडत असताना स्थानिक वेकोली प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे सास्ती गाववासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी संतप्त होत चक्काजाम आंदोलन केले.

 गेल्या काही दिवसांपासून खदान परिसरातील कोळशाच्या साठ्याला व कोलबेंच भागाला लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणावर धूर आणि घातक वायू वातावरणात पसरत आहेत. त्यामुळे सास्ती गावासह परिसरातील नागरिकांना श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ, तसेच इतर आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. गावावर सतत धुराचे सावट असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. खदान प्रशासनाने तातडीने आग विझवून प्रदूषणावर नियंत्रण मिळवावे, तसेच गावकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली.

       या आंदोलनात गावातील उपसरपंच सचिन कुडे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर झाडे, दिलीप नरड, आनंद मांडवकर, सुमन जगलिवार, चंदु नळे, नितेश चेतुलवार, राहुल टेकाम, नरेश ऊपरे, अनिल खवसे, रितिक पेटकर, सोनु मेश्राम, बाप्या कष्टी, पदमाबाई, सविता नरड, पत्तीताई यांच्यासह अनेक महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ग्रामस्थांच्या मते, खदान परिसरातील आगीमुळे निर्माण होणारे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असून त्याचा थेट परिणाम गावकऱ्यांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहून तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here