


✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७
शिवसैनिक हेच माझे आप्तस्वकीय व शाखा हेच माझे मंदिर म्हणणारे व तसे वागणारे साहेब आप जैसा कोई नही*
आज माझ्यावर हल्ला होऊन 23 दिवस झाले परंतू एकाही शिवसेना नेत्याचा सहानुभूतीदर्शक साधा फोन नाही. ते जाऊ द्या, साधा मेसेज नाही की हल्ल्याचा निषेध नाही. तेच जर आपण असता तर धावून आला असतात. चौकशी केली असती, पोलिसांना फैलावर घेतले असते. पण तुमच्या सारखी दानत कोणातच नाही. किती म्हणून नावे घेऊ ? पक्ष प्रमुख व आदित्य ही हिमालयापेक्षा उंच माणसं. त्यांना एका सर्वसामान्य शिवसैनिकाची सावली दिसणार नाही, हे आपण गृहीत धरू. पण ते पायलीचे पन्नास नेते, उपनेते, स्टार प्रचारक व ढीगभर नेते माणुसकीचा कोळसा केला हॊ त्यांनी नावच घ्यायचे झाले तर विनायक राऊत, गुरुनाथ खोत, हर्षल प्रधान, रवी म्हात्रे,सुषमाताई अंधारे, शरद कोळी, ज्योती ठाकरे, अयोध्या पोळ, अल्ताफ शेख, राजन विचारे, केदार दिघे, बंड्या साळवी या पैकी एकाही नेत्याला वाटले नाही की आपण आपल्या एकनिष्ठ व लढावू शिवसैनिकाची चौकशी करावी, निदान भ्याड हल्ल्याचा निषेध तरी करावा.
आजवर 53 वर्षे मी निष्ठेने वागलो, पक्षासाठी अनेकांशी पंगा घेतला, 14-14 केसेस अंगावर घेतल्या, पक्ष फुटीनंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर तुफान शाब्दिक हल्ले केले. तेही त्यांच्या बालेकिल्ल्यात राहून. “गद्दारांना क्षमा नाही”, हा ज्वालाग्रही लेख संग्रह स्वखर्चाने प्रकाशित केला, त्यावरून भा. दं. सं. च्या 153अ कलमखाली माझ्यावर गुन्हा दाखल झाला. तरी मी मागे हटलो नाही. कोट्यावधीची आमीषे लाथाडली.
माझ्या वर पाच फेब्रुवारी रोजी झालेला हल्ला हा मी माजी कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी ऐनवेळी पक्षाचा अवसानघात करुन धोका दिला व भाजपात प्रवेश करुन पक्षाला वाऱ्यावर सोडले म्हणून निवडणूक काळात जी लेख मला लिहिली व ज्यामुळे धनंजय बोडारे चे पूर्ण पॅनल भुईसपाट झाले, घराणेशाही मोडीत निघाली. त्याचा राग म्हणून सराईत गुन्हेगारांना सुपारी देऊन तो भ्याड हल्ला केला.
या प्रसंगी कल्याण जिल्हा स्तरावरील बहुसंख्य पदाधिकारी व शिवसैनिक ( बोडारे भक्त सोडून ) मोठ्या संख्येने आले. माझे शेकडो वाचक व हितचिंतक प्रत्यक्ष भेटले. दूरच्यांनी फोन वर चौकशी केली. परंतू पक्ष पातळीवर माझी उपेक्षाच झाली. एखाद्या नेत्याच्या कुत्र्याला जरी ताप आला, तर बुके घेऊन धावणाऱ्या, नेत्याला नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले तरी गर्दी करणारे, माझ्या वरील प्राणघातक हल्ल्याला आज 23 दिवस लोटले तरी झोपेतून जागे झाले नाहीत का? मी सर्व बाबतीत स्वावलंबी, सक्षम आहे. मला मदतीची अजिबात गरज नाही. पण अश्यावेळी माणुसकीचा कोळसा झालेला पाहून मन उद्विघ्न होते. आयुष्यातील 53 वर्षे वाया गेली असे वाटते, हेच फळ काय मम तपाला? असे वाटू लागते. *माझ्यासारख्या ज्येष्ठ शिवसैनिक व पत्रकारास जर अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्य व गरीब शिवसैनिकांनी कोणाच्या जीवावर आपल्या नेत्यांवर व पक्षावर जीव ओवाळून टाकावा ?*
या उलट मी ज्यांच्यावर आग पाखड केली, टिकेची, झोड उठवली ते शिंदे सेनेत गेलेले माझे जुने शिवसैनिक मित्र मोठ्या संख्येने धावून आले. असंख्य लोकांनी विचारपूस केली. साहेब याच वृत्तीला कंटाळून आम्हीही नाईलाजाने पक्ष सोडला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आणि याच लोकांची संभावना मी गद्दार ~ गद्दार अशी करीत राहिलो.
*जो पक्ष प्राणघातक हल्ल्याच्या वेळी साधी विचारपूस करीत नाही, जिथे माणुसकीचा लवलेश नाही, तो पक्ष माझा कसा म्हणू मी?*














