Home महाराष्ट्र मराठी भाषा दिनानिमित्त ग्रामगीता महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन 

मराठी भाषा दिनानिमित्त ग्रामगीता महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन 

75

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.27फेब्रुवारी):-मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून सेमाना विद्या व वनविकास प्रशिक्षण मंडळ, गडचिरोली द्वारा संचालित ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर येथील ग्रंथालय विभागामार्फत विशेष ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे, मराठी भाषेचा सन्मान वाढविणे आणि ज्ञानवृद्धीला चालना देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. या उपक्रमाला प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

ग्रंथ प्रदर्शनीचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा आस्वले यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी बोलताना त्यांनी मराठी भाषा दिनाचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले. मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि विचारसंपदेची ओळख आहे, असे सांगत विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय जोपासून ज्ञानसंपन्न होण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच ग्रंथालय हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र असून त्याचा अधिकाधिक उपयोग करून घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले. या प्रसंगी प्रा. भालचंद्र लोडे नेहरू कनिष्ठ महाविद्यालय चिमूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या ग्रंथ प्रदर्शनीमध्ये ग्रंथालय विभागामार्फत नव्याने खरेदी करण्यात आलेली विविध विषयांवरील पुस्तके, नामांकित लेखकांचे साहित्य, संदर्भग्रंथ, स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त मार्गदर्शक पुस्तके तसेच व्यक्तिमत्त्व विकास, विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्रे, इतिहास, साहित्य आदी विविध विषयांवरील ग्रंथ मांडण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या पुस्तकांचे बारकाईने अवलोकन करून माहिती घेतली आणि अनेकांनी पुस्तके वाचनासाठी घेण्याची उत्सुकता दर्शविली.

ग्रंथालय विभागाने या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती बळकट करण्याचा प्रयत्न केला. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आयोजित हा उपक्रम ज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, ग्रंथालय कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here