


✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
चोपडा(दि.27फेब्रुवारी):-येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे आज दि.२७ फेब्रुवारी, २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता जागतिक मराठी राजभाषा गौरव दिन व कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित काव्यवाचन तसेच मराठी विभागातर्फे आयोजित विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण समारंभ’ अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.के.एन.सोनवणे हे उपस्थित होते. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.डॉ.आर.एम.बागुल,समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. पी.एस.पाडवी, पर्यवेक्षक श्री.ए.एन.बोरसे आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका श्री.संदीप पाटील यांनी प्रास्ताविकेद्वारे स्पष्ट केली. यावेळी कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांचे स्वागत कु.भावना कोळी या विद्यार्थिनीने गायलेल्या सुरेल स्वागत गीताने करण्यात आली.
याप्रसंगी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या सुप्रसिद्ध कवितांचे काव्यवाचन करण्यात आले.यात कु. अनुष्का अहिरे – कणा कु.भावना कोळी-माय मराठी, कु.तृप्ती पाटील – कोकिळा या विद्यार्थिनींनी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या कवितांचे सादरीकरण केले.तर विद्यार्थी मनोगतात कु.गंगा करंकाळे, कु.जागृती बारी व कु.कविता माळी यांनी मराठी भाषाविषयक आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी मराठी विभागातर्फे ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने मराठी वरिष्ठ व कनिष्ठ विभागातर्फे आयोजित ‘शुद्धलेखन स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, काव्यलेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, माझे वाचन – माझे विचार प्रकटीकरण स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, उस्फूर्त सादरीकरण स्पर्धा, काव्य सादरीकरण स्पर्धा, मराठी व्याकरण प्रज्ञाशोध प्रश्नमंजुषा स्पर्धा, शब्दसंपदा स्पर्धा तसेच निबंध स्पर्धा त्याचप्रमाणे दि.१९/०२/२०२६ छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने व दि.२१ फेब्रुवारी,२०२६ रोजी ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त’ आयोजित निबंध स्पर्धा, बोलीभाषा काव्य लेखन स्पर्धा,पोस्टर स्पर्धा,व्यंगचित्र स्पर्धा, बोलीभाषेतील लोकसाहित्य संकलन स्पर्धा अशा एकूण २४ विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एकूण ९५ विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. एम. बागुल यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेची महती आपल्या मनोगतातून स्पष्ट करून सांगितली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘मराठी भाषेत अनमोल व दर्जेदार साहित्य लेखन निर्माण झाले असून मराठी भाषा जीवन जगायला शिकविते. सुसंस्काराचे धडे व व्यक्तिमत्व घडविणारी मराठी भाषा खऱ्या अर्थाने ज्ञानपीठ आहे. या अमृतासम भाषेचे जतन व संवर्धन करणे काळाची गरज आहे.’
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.निवृत्ती पाटील व कु.मोहिनी राजपूत यांनी केले तर आभार सौ.पुष्पा दाभाडे यांनी मानले.या कार्यक्रमाप्रसंगी डॉ.डी.पी.सपकाळे,श्री.एस.टी.शिंदे,श्री.संदीप देवरे,श्री.बी.के.जाधव,श्री.वाय.एन.पाटील,डॉ.आर.आर.पाटील,श्री.व्ही.डी.शिंदे, सौ. अनिता लांडगे, सौ.पूजा, पुन्नासे ,सौ.सारिका पाटील,सौ.सुनंदा नन्नवरे,कु.निकिता शर्मा इत्यादींनी उपस्थित राहून सहकार्य केले. या कार्यक्रमाप्रसंगी कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.














