Home महाराष्ट्र म्हसवडचे एपीआय सोनवणे यांची कार्यपद्धती पक्षपाती,निवडणूक प्रक्रियेतून हटविण्याची मागणी, राज्य निवडणूक आयोगाकडे...

म्हसवडचे एपीआय सोनवणे यांची कार्यपद्धती पक्षपाती,निवडणूक प्रक्रियेतून हटविण्याची मागणी, राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार

99

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड : म्हसवड (ता. माण) पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) अक्षय सोनावणे यांचे वर्तन पक्षपाती असल्याने त्यांना जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रक्रियेतून हटवावे, अशी मागणी माण तालुक्यातील तीन सामाजिक कार्यर्त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

सामाजिक कार्यकर्ते महेश करचे, डाँ. प्रसाद ओंबासे, बाळराजे वीरकर यांनी सातारा येथे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना भेटून सोनावणे यांची कार्यपद्धती व संभाव्य परिस्थीतीची माहिती दिली. यावेळी देण्यात आलेल्या लेखी तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, नगरपालिका निवडणूक आचारसंहिता लागू असताना अक्षय सोनवणे यांनी एका विशिष्ट राजकीय पक्ष म्हणजेच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या बाजूने वागून पक्षपाती भूमिका घेतली. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधी गटाच्या काही नागरिक, कार्यकर्त्यांना बेकायदेशीररीत्या चौकशीस बोलावणे, दबाव टाकणे, धमकावणे तसेच कोणताही ठोस कायदेशीर आधार नसताना डांबून ठेवणे, नोटिसा देणे अगर कारवाई करण्याचा प्रयत्न केला.

नगरपालिका निवडणूक काळात भारतीय जनता पार्टी व्यतिरिक्त इतर पक्ष संघटना यामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी दिलेल्या लेखी तक्रारी, निवेदनांवर योग्य नोंद घेतली गेली नही, तर दुसऱ्या बाजूच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्यात आली. नगरपालिका निवडणूक काळात दोन गटात झालेल्या वादामध्ये त्यांनी पूर्णपणे पक्षपाती भूमिका घेतली. म्हसवड पोलीस ठाणे हे भारतीय जनता पार्टीचे कार्यालय असावे या पद्धतीने पोलीस ठाण्याचा वापर करण्यात आला.

निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होईल अशा पद्धतीने भीतीचे वातावरण निर्माण करणे, सभा-प्रचार, हालचाली यामध्ये अडथळे आणणे, तसेच समानतेच्या तत्त्वाचे उल्लंघन करण्यात आले.पोलिस अधिकाराचा गैरवापर करून लोकशाही प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यात आला असून हे वर्तन निवडणूक आचारसंहिता, भारतीय संविधान व पोलिस आचरण नियमांना विरोधात आहे.सदर प्रकारांबाबत तक्रार करूनही वरिष्ठ पातळीवर योग्य दखल न घेतली जाण्याची भीती असून निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

प्रमुख मागण्या 

• सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्याविरुद्ध तातडीने स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी नेमण्यात यावी.

• चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणूक संबंधी कामकाजापासून दूर ठेवण्यात यावे.

• दोषी आढळल्यास त्यांच्यावर निवडणूक आचारसंहिता व सेवाशिस्त नियमांनुसार कडक कारवाई करण्यात यावी.

• म्हसवड परिसरात निष्पक्ष व भयमुक्त निवडणूक वातावरण सुनिश्चित करण्याचे आदेश देण्यात यावेत.

कोट

राज्य निवडणूक आयोगाने दि. १६ जुलै २०२५, ४ नोव्हेंबर २०२५ रोजी आदर्श आचारसंहिसंबंधीचे आदेश दिले आहेत. १६ जुलै २०२५ च्या आदेशात निवडणूक प्रक्रिया कर्तव्यदक्ष निःपक्ष अधिकारी, कर्मचारी यांच्याव्दारे हाताळण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करीत असताना कर्तव्यदक्ष, निःपक्षपातीपणा, लौकिक व सचोटी (Reputation and integrity) पहावी, असे आयोगाने म्हटले आहे. आयोगाला अपेक्षित असलेला एकही निकष सोनावणे पुर्ण करीत नाहीत. राजकीय दबावातून सोनावणेंची पाठराखण केल्यास होणाऱ्या परिणामांना निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासन जबाबदार असेल.

– महेश करचे,

 सामाजिक कार्यकर्ते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here