


▪️विर्शीत बसले बॅंक ऑफ महाराष्ट्र समोर आमरण उपोषणावर ; साकोली पोलीसांचा बंदोबस्त
✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)
भंडारा(दि.20नोव्हेंबर):-४० वर्षांपासून स्थायी असलेल्या विर्शी येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेचे स्थानांतर २१ नोव्हेंबरला साकोलीत होत आहे. याविरोधात विर्शी आणि १८ गावातील सरपंच उपसरपंच यांसह बचत गटातील महिला पुरुष जनतेने हे स्थानांतरण तात्काळ रद्द करा यासाठी ( गुरू. २० नोव्हें.) ला विर्शी शाखेसमोरच आमरण उपोषणाला सुरुवात केली. ही मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा दिला आहे. येथे साकोली पोलीसांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. या शाखेत परीसरातील सुमारे ५ हजारांवर शेतकरी, महिला पुरुष व विद्यार्थ्यांचे खाते असून याला सर्व जनतेनी विरोध दर्शविला आहे.
विर्शी येथे ४० वर्षांपासून बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा सुरू आहे. येथे एकुण ५ हजारांवर खातेधारक आहेत. यामध्ये परीसरातील उकारा, मोखे, सितेपार, किन्ही, मोखे, रेंगेपार, खांबा, जांभळी, मालुटोला, वडेगाव, सातलवाडा, चारगांव, सुंदरी यांसह अनेक गावांतील महिला पुरुष, विद्यार्थी, शेतकरी आणि विद्यार्थ्यांचे खाते आहेत. सदर शाखेचे स्थानांतरण साकोली येथे होत आहे. परंतू याचा त्रास असंख्य जनतेला व अपंग व्यक्तींना होणार आहे. करीता हे स्थानांतरण तात्काळ रद्द करा यासाठी अनेक गावांतील शेतकरी, सरपंच, उपसरपंच, महिला बचत गटातील असंख्य महिला आणि जनता बॅंकेसमोरच आमरण उपोषणाला बसले आहेत. यांची मागणी हिच आहे की, समस्त जनतेची भयंकर गैरसोय आणि वारंवार साकोलीला हेलपाट्या होऊ नये म्हणून ही शाखा येथेच ठेवून हे स्थानांतरण तात्काळ रद्द करा. अन्यथा विर्शी येथेच रस्त्यावर उतरून जनआंदोलन छेडण्याचा इशारा याप्रसंगी देण्यात आला. या बॅंकेत या १८ गावातील सुमारे ५ हजारांहून अधिक खातेदार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. हे गुरूवारी आमरण उपोषण सुरू होताच साकोली पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांनी तात्काळ विर्शी येथे पोलीस बल पाठवून बंदोबस्त तैनात केलेला आहे. तर नागपूरहून बॅंक ऑफ महाराष्ट्रचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा विर्शीत आले आहेत.
बॅंक ऑफ महाराष्ट्र विर्शी शाखेचे स्थानांतरण तात्काळ रद्द करा, या आमरण उपोषणाला जि. प. सभापती शितल राऊत, ओमकार कापगते, सरपंच विर्शी लिलाधर सोनवाने, किन्ही सरपंच घनश्याम पारधी, सरपंचा मोखे केमेश्वरी टेंभरे, दुर्गेश राऊत, सरपंचा सातलवाडा अर्चना मेश्राम, सरपंच चारगांव मोहन लंजे, ग्रामपंचायत सदस्य सर्व ( विविध गाव ) रजनी राऊत, उपराज बोपचे, भगवान लांजेवार, सरीता गहाणे, बचत गट महिलावर्ग छाया लंजे, खोकेश्वरी कापगते, शेतकरी होमराज कापगते, जयेश इलमकार, यशवंत लांजेवार, पतिराम ठाकरे, गोपिनाथ कापगते, वकटू लांजेवार यांसह १८ गावातील सुमारे दोनशेच्या वर जनता आमरण उपोषणावर बसलेले आहेत.
—–
“या विर्शी परीसरातील १८ गावातील जनतेच्या हितासाठी व वारंवार साकोलीला येरझारा टाळण्यासाठी या बॅंकेचे स्थानांतरण थांबवा अन्यथा समस्त जनतेला धरून जन आंदोलन उभारले जाईल, याची नोंद घ्यावी”
— शितल जयेश राऊत
जिल्हा परिषद सभापती भंडारा, रहिवासी – विर्शी
—–
“ही बॅंक येथून गेली तर माझ्यासारख्या डोळ्यांनी अंध वृद्धा मी कुठे जाणार. माझे मोतिबिंदू ऑपरेशन झाले आहे माझ्या सोबतच्या असंख्य महिलांनी कसे करायचे, म्हणून आम्ही सुद्धा या उपोषणाला बसले आहोत”
— निर्मलाबाई नानू टेंभूर्णे
वृद्ध अपंग महिला
रा. विर्शी














