


✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.3नोव्हेंबर):- “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार असून, समविचारी पक्षांसोबत चर्चेची दारे खुली ठेवली आहेत,” असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष मा.आ.बाबाजानी दुर्राणी यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केले.
गंगाखेड येथे ३ नोव्हेंबर सोमवार रोजी काँग्रेसच्या तालुकास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते तदपूर्वी शहरातून भव्य मोटरसायकल रॅलीद्वारे नव्याने नियुक्त जिल्हाध्यक्ष दुर्राणी यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.पक्षाची संघटनात्मक स्थिती,कार्यकर्त्यांचा उत्साह आणि निवडणुकीची रणनीती यावर सविस्तर चर्चा झाली.बैठकीनंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष अभिजीत देशमुख,अनुसूचित जाती विभाग प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीआंबिरे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड.संतोष मुंढे, माजी नगरसेवक राजु सावंत, शहराध्यक्ष शेख युनूस, तालुकाध्यक्ष गोविंद यादव, तसेच हाजी शेख महेबुब, अकबर पठाण यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना दुर्राणी म्हणाले, “गंगाखेड नगराध्यक्ष पद काँग्रेस स्वबळावर लढविणार असून विजय निश्चित आहे. काँग्रेसचा खरा आधारस्तंभ म्हणजे जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांची निष्ठा. काही जण वैयक्तिक महत्त्वाकांक्षेमुळे पक्ष सोडून गेले, पण खरे काँग्रेसचे मतदार आजही आमच्यासोबत आहेत. जे निष्ठेने उभे आहेत, त्यांनाच सन्मान आणि उमेदवारी मिळणार आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, अभिजीत देशमुख यांनी सांगितले की, “पाथरी, सेलू, जिंतूर, पूर्णा आणि गंगाखेडसह संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेसचा विजय निश्चित आहे. संघटनात्मक रचना मजबूत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.”
या बैठकीतून काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेने जिल्ह्यातील राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही काँग्रेसच्या नव्या उत्साहाची नोंद घ्यावी लागणार असून, आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये गंगाखेडचे राजकारण अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.














