


▪️आज युवक युवतींना कुटुंब मूल्यांची आवश्यकता-ह.भ.प. बाळकृष्ण आमले
✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अमरावती(दि.3नोव्हेंबर):- श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ, अकोट, मध्यस्थी वधू वर सूचक मंडळ, विदर्भ वैभव मंदिर, मुंबई व कर्मयोगी संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्था, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय मराठा-कुणबी समाजाचा भव्य उपवधू-वर सूचक व पालक परिचय मेळावा अभियंता भवन, शेगाव नाका, अमरावती येथे उत्साहात संपन्न झाला.
मेळाव्याचे अध्यक्ष ह.भ.प. ईंजि. बाळकृष्ण आमले (अध्यक्ष, मध्यस्थी वधू वर सूचक मंडळ शाखा, अमरावती), उद्घाटक श्री.बाळासाहेब फोकमारे (अध्यक्ष, मध्यस्थी वधू वर सूचक मंडळ अकोट), प्रमुख अतिथी नंदकिशोर हिंगणकर, सुरेशराव कराळे, विदर्भ वैभव मंदिर,मुंबईचे संजय बारब्दे, संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे सचिव रवींद्र वानखडे, विश्वस्त तसेच संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्था, अमरावतीचे अध्यक्ष प्रा. प्रभाकरराव ठाकरे होते.
अध्यक्ष ह.भ.प. इंजि. बाळकृष्ण आमले पाहुण्यांनी संत श्री वासुदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले तर उद्घाटक बाळासाहेब फोकमारे यांनी दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले.
अध्यक्षीय भाषणात इंजि. बाळकृष्ण आमले महाराज म्हणाले की, “आकाशातील ग्रहताऱ्यांचा मानवी जीवनावर परिणाम होत नाही. रास-कुंडली पाहून विवाह ठरविणे चुकीचे आहे.विवाहाचे वाढते वय ही आरोग्य विषयक समस्या बनली आहे.लिंगनिदान प्रतिबंधक कायदा लागू होण्यापूर्वी गर्भजल परीक्षणाद्वारे कन्या भ्रूण नष्ट करण्याची प्रवृत्ती वाढल्याने मुलींची संख्या घटली आहे,जे मुलांच्या पालकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे . घटस्फोटाचे जे आज प्रमाण वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी युवक-युवतींना मानसिक सजगता आणि कुटुंब मूल्यांची आवश्यक आहे. लग्नसंस्था व कुटुंबव्यवस्था टिकवण्यासाठी उपयुक्त उपाययोजना व मूल्यसंस्काराची गरज आहे.”
याप्रसंगी प्रमुख अतिथी नंदकिशोर हिंगणकर यांनी आपले विचार व्यक्त केले.
—
वर – वधू परिचय मेळावे आज समाजाची गरज-प्रा.अरुण बुंदेले
मराठा समाज युवक – युवती परिचय व पालक मेळाव्याला समाजप्रबोधनकर्ते व साहित्यिक प्रा. अरुण बुंदेले यांच्याकडून पुणे येथून प्राप्त झालेल्या ऑनलाइन शुभेच्छांचे व्यवस्थापक किशोर राऊत यांनी वाचन केले. ” प्रा.अरुण बुंदेले आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, वधु-वर परिचय मेळावे आज समाजाची गरज आहे,अशा मेळाव्यामुळे वधू – वरांच्या पालकांचे श्रम, अर्थ आणि वेळेची बचत होते, तसेच वर – वधू संशोधन करणे सोपे जाते. असे प्रतिपादन त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केले आहे.”
या मेळाव्यात १३१ युवक- युवतींनी नोंदणी करून पालकांसमक्ष परिचय सादर केला, तसेच मध्यस्थी परिवाराने त्यांच्या भेटीगाठी घडवून आणल्या.
या प्रसंगी मध्यस्थी अमरावती शाखेचे उपाध्यक्ष ईंजि. दिलीपराव वाकोडे, डॉ. सुरेशराव चिकटे, दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्या मुंबई शाखा अमरावती चे शाखा व्यवस्थापक श्री किशोर राऊत व इतर पदाधिकारी व सेवेकरी उपस्थित होते.
कार्तिक शुद्ध एकादशीच्या औचित्याने उपस्थितांना फलाहार व चहाफराळ देण्यात आला. गजानन च-हाटे यांनी युवक- युवतींच्या परिचयपत्रांचे वाचन केले, उषाताई ठुसे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर श्री. शांताराम उमाळे यांनी आभारप्रदर्शन केले.














