


✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मुंबई(दि.22ऑक्टोबर):- यंदाच्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या परिस्थितीचा परिणाम त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर होत आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी, विशेषतः नर्सिंग आणि वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी, परीक्षा शुल्क भरण्यास असमर्थ ठरत आहेत.
या पार्श्वभूमीवर “चेतक युथ फाउंडेशन” तर्फे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. हसन मुश्रीफ, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, आणि सचिव मा. धीरज कुमार (वैद्यकीय शिक्षण विभाग) यांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची विनंती पुर्वक मागणी करण्यात आली आहे.
फाउंडेशनने नमूद केले आहे की, “विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये आणि शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना आर्थिक दृष्ट्या दिलासा मिळावा म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक , महाराष्ट्र परिचर्या परिषद व महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळ मुंबई यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या विषयावर मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी संवेदनशीलता दाखवत संबंधित विभागाकडे हे प्रकरण पुढे पाठविले असल्याची माहिती फाउंडेशनला मेलद्वारे प्राप्त झाली आहे.
चेतक युथ फाउंडेशन चे अध्यक्ष श्री.गोपाल पवार साहेब यांनी घेतलेल्या पुढाकाराचे राज्यभरातून स्वागत होत असून अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय दिलासा देणारा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अशी माहिती अनिल जायभाये बीडकर यांनी दिली.














