Home महाराष्ट्र पंथदीपाचा तेजोमय प्रवास-अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष- महंत श्री कारंजेकर बाबा यांच्या...

पंथदीपाचा तेजोमय प्रवास-अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष- महंत श्री कारंजेकर बाबा यांच्या कार्याचा गौरव

181

महानुभाव पंथाची ही सर्वोच्च आणि शिखर संस्था *— अखिल भारतीय महानुभाव परिषद —*

पंथातील एकात्मता, परंपरा आणि पंथप्रसार यांचा ध्यास घेऊन सतत कार्यरत आहे.

ही परिषद म्हणजे पंथाचा प्रशासनिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक केंद्रबिंदू.

या संस्थेच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे *महंत श्री कारंजेकर बाबा* यांची —

एक दूरदर्शी, ज्ञाननिष्ठ आणि सेवाभावी व्यक्तिमत्व असलेले पंथदीपाचे तेजस्वी मार्गदर्शक.

 

*त्यांच्या निवडीबद्दल स्वागत*

 

मागील काही महिन्यापूर्वी अखिल भारतीय महानुभाव परिषद या संस्थेचे नियोजित अध्यक्ष पदाची घोषणा झाली अशी माहिती समोर आली…

 

म्हणून कोणाचे नाव आहे हे माहित करून घेतलं असता जे नाव समोर आलं ते म्हणजेच महानुभाव पंथाच्या कवीश्वर कुळाचे प्रमुख आचार्य म्हणजेच आचार्य प्रवर महंत श्रीकारंजेकर बाबा अर्थातच पूर्वाश्रमीचे प पू प म श्री मोहनराज दादा महानुभाव…

 

महंत श्री कारंजेकर बाबा यांच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल पंथातील सर्व अनुयायी, साधक, आणि श्रद्धावंत भक्तवर्ग अत्यंत आनंदित झाले.

ही निवड म्हणजे केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून संपूर्ण पंथाच्या सेवेचा गौरव आहे.

त्यांच्या निवडीमुळे परिषदेला नव्या उर्जेचा, नव्या दृष्टिकोनाचा आणि नव्या दिशेचा लाभ झाला आहे.

त्यांच्या नेतृत्वात पंथकार्य अधिक दृढ आणि संघटित स्वरूपात पुढे जात आहे.

 

*त्यांच्या माध्यमातून घडणारी पंथसेवा*

 

कारंजेकर बाबा यांनी पंथसेवा ही केवळ धार्मिक कर्तव्य म्हणून नव्हे, तर मानवतेचे ऋण फेडण्याचा एक मार्ग म्हणून स्वीकारली आहे.

त्यांच्या कार्यकाळात आणि मार्गदर्शनाखाली अनेक प्रेरणादायी उपक्रम घडले —

 

विविध प्रांतांमध्ये *पंथसेवा केंद्रांची स्थापना*

 

आध्यात्मिक ग्रंथांचे संपादन, पुनर्मुद्रण आणि आधुनिक माध्यमांतून प्रसार

 

महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानावर आधारित अध्ययनवर्ग, वाचनमंडळे आणि सत्संग सत्रांचे आयोजन

 

विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि उत्तर महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतभर सतत प्रवास करून भक्तसंवाद, मार्गदर्शन आणि प्रवचनकार्य

 

 

युवकांमध्ये पंथाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी *“युवा पंथप्रेरणा अभियान”*

 

 

समाजोपयोगी अर्थातच पंथीय सेवा कार्यांत — अन्नदान, आणि आश्रमस्थ साधकांना वेळोवेळी मदतकार्य

 

वृद्ध व गरजू साधकांसाठी सेवा देण्यासाठी सदैव प्रयत्न 

 

त्यांच्या या कार्यामुळे पंथातील एकता, अनुशासन आणि परस्पर स्नेह अधिक वृद्धिंगत झाला आहे.

 

गौरव उद्गार

 

महंत श्री कारंजेकर बाबा हे पंथाच्या आध्यात्मिक आणि संघटनात्मक परंपरेचे सच्चे वाहक आहेत.

त्यांचा संवाद साधा पण प्रभावी —

त्यांच्या शब्दात भक्ती आहे, ज्ञान आहे, आणि प्रेरणाही आहे.

त्यांच्या कार्याबद्दल बोलताना अनेक वचनवंत, साधक व पंथसेवक अभिमानाने म्हणतात —

 

*“कारंजेकर बाबा म्हणजे पंथसेवेचा नवा अध्याय,

जिथे सेवा आहे तिथे प्रभूचा प्रकाश आहे.”*

 

 

त्यांच्या व्यक्तिमत्वात एक विलक्षण संतुलन आहे —

श्रद्धा आणि विवेक, साधना आणि सेवा, परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम.

 

*पंथदीपाचा तेजमय प्रवास*

 

विद्यमान महंत यांच्या विषयी सविस्तर आढावा खालील प्रमाणे मुद्यांच्या आधारे सविस्तरपणे सांगता येईल.

 

*जीवनप्रसंग:-*

 

विद्यमान महंत कविश्वर कुळाचार्य श्रीकारंजेकर मोहनराज आहेत. 

 

दादांचा अमरावती जिल्ह्यातील येसुर्णा या गावी पडोळे या घराण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे देहाचे वडील भाऊराव पाटील पडोळे तसेच जन्म देणारी आई लीलाबाई…

 

आदरणीय दादांना आपल्या घरच्यांना पंथीय आचार विचार याबद्दल ज्ञान असल्याने तसेच भाऊराव पाटील यांच्या देहाच्या भगिनी ह्या देखील बोराला येथील महंत मोतीवाले बाबां यांच्या ठिकाणी अनुसरण घेऊन त. शांताबाई अमृते ह्या नावाने अगोदर पासून अमरावती येथील मोठ्या मार्गात संन्यस्थ साधक म्हणून स्वामीच्या आचार विचारावर धर्माचरण करत होत्या…

 

दादांचे आई वडिलांना बहुतेक त्याचवेळी सुचित होते की काय…

 

पण त्यांनी आपले ४ वर्ष वयाचे बालक अर्थातच मोहन यास आई वडित्याच त. शांताबाई अमृते या त्यांच्या आत्यांना संकल्पित केले होते. आदरणीय दादांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मार्गातच झाले लहानाचे मोठे ते अमरावती येथील आश्रमात झाले. पुढ ब्रम्हविद्या शास्त्रांचे ज्ञान समजून घेण्यासाठी त्यांनी संवस्तर येथील महानुभाव मठात जाऊन ब्रम्हविद्या शास्त्रांचे ज्ञान समजून घेतले तिथंच त्यांनी शास्त्र अध्ययन केलं. त्यानंतर पुन्हा अमरावती येथे येऊन तेथील तीनही अधिकरणांचा कार्यकाळ त्यांनी पाहिला आणि दोन अधिकराणांचा स्वतः अनुभवला. ते श्री कारंजेकर गोविंदराज बाबा यांच्या सतत सहवासात होते. समर्पित भावनेने त्यांची सेवा केली आदरणीय दादाजी यांनी अगोदरच्या बाबांची ज्या निष्काम भावनेतून आणि श्रद्धायुक्त भाव ठेवून श्रद्धेने सेवा केली त्यांच्या प्रसन्नतेमुळे त्यांना श्री कारंजेकर ही (गादी) महंतीप्रतिष्ठा प्राप्त झाली. हा उगवता सूर्य आहे. त्यांनी महानुभाव संप्रदायाच्या सेवेसाठी स्वतःला झोकून दिले…

 

महानुभाव पंथाचा इतिहास म्हणजे ज्ञान आणि साधनेचा अखंड दीपप्रवाह.

त्या दीपप्रवाहातील एक तेजस्वी ज्योत म्हणजे *महंत श्री कारंजेकर बाबा.*

त्यांच्या नेतृत्वात आज पंथाचा दीप नव्या तेजाने प्रज्वलित होत आहे.

 

त्यांच्या कार्यातून पंथातील एकात्मता अधिक दृढ झाली,

 

पंथज्ञानाचा प्रसार आधुनिक माध्यमांतून वाढला,

 

आणि समाजसेवेच्या कार्यातून पंथाचा प्रतिष्ठित संदेश सर्वदूर पोहोचला.

 

*सामाजिकतेला महत्त्व:-*

 

पंथात सामाजिक बदल ही होणे आवश्यक आहे. ही बाब त्यांनी समजावून घेतली आणि पंथात व्यापक प्रमाणात सामाजिक बदल केले त्यामुळे त्यांना महानुभावांचे विकासपुरुष या उपाधीने पंथात ते प्रसिद्ध झाले. डिसेंबर २०२४ झालेला शताब्दी महोत्सव या भव्य अशा महानुभावांच्या कार्यक्रमात भानखेड अमरावती येथे त्यांना महानुभावांचे विकासपुरुष आणि लोकमान्य टिळकांनी श्री मुरलीधर बाबा कारंजेकर यांना दिलेले नाणे ही दुर्मिळ वस्तू त्यांना या कार्यक्रमात पुरस्कार रुपी प्रदान करण्यात आली…

 

दादांच्या पुढाकाराने तसेच त्यांचा राजकीय नेत्याच्या सोबत असलेल्या जवळीक मधून त्यांनी जो पंथीय कार्यात आलेख वाढवला तो न भूतो न भविष्य ती असाच आहे…

 

*मराठी भाषा विद्यापीठ:-*

 

आजच्या समाजाला व्यसनमुक्त व सुसंस्कृत बनवण्यासाठी मूल्य शिक्षणाची अत्यंत गरज आहे. आजच्या काळात महाराष्ट्र आणि भारत सरकारकडून मूल्य शिक्षणावर भर दिला जात आहे. महानुभावांचे समग्र वांग्मय हे मूल्यधिष्ठितच आहे. परमेश्वर भक्तीचा दृष्टिकोन समोर ठेवून हे वांग्मय निर्माण झाले त्यामुळे जीवन मूल्याची प्रभावी माहिती या साहित्यात विपुल प्रमाणात या जीवन मूल्यांचा प्रसार समाजाच्या सर्व थरात व्हावा व त्याच्या योगाने समाजाचे प्रबोधन होऊन नियमन व्हावे. यासाठी जीवन मूल्यांचा सर्व बाजूंनी अभ्यास व्हावा या दृष्टीने श्रीबाबांनी अतोनात प्रयत्न करून शेवटी मराठी भाषा विद्यापीठ श्रीक्षेत्र रिद्धपूर येथे निर्माण केले. यासाठी प्रत्येकवेळी पावलोपावली संघर्ष करावा लागला परंतु कदाचित हे कार्य ईश्वरालाही त्यांच्याकडून अपेक्षित असावे. शेवटी यात यश मिळाले ही बाब महानुभावीयांसाठी अभिमानास्पद आहे.

 

*श्री क्षेत्र रिद्धपूर रेल्वे स्टेशन :-*

 

श्री गोविंद प्रभूच्या चरणांनी पवित्र झालेल्या या महानुभावांच्या काशीकडे सरकारने लक्ष द्यावे इतर सांप्रदायाप्रमाणे महानुभाव संप्रदायालाही शासनाच्या सुविधा स्वीकारून आपण अनुयायांयांसाठी दक्ष होऊ शकतो. या अर्थाने येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लाखोंच्या संख्येत आहे त्यांची हेडसाळ होऊ नये यासाठी रेल्वे स्टेशन आणण्याचा बाबांचा निर्णय शेवटी शासनाला मान्य करावा लागला.

 

*पोथ्यांची डिजिटल लायब्ररी :-*

 

अनेक पोथ्या हस्तलिखित जुन्या आहेत त्या जीर्ण इतक्या झाल्या होत्या, की ते विचारधन केव्हाही नष्ट होईल. चाळीच्या भक्षस्थानी जाईल. हे सांगता येत नाही याचे डिजिटलेशन होणे काळाची गरज आहे म्हणजे एक तरी प्रत पुढील पिढीला उपलब्ध होईल जेणेकरून तत्वज्ञान युवापिढी जवळ पोहोचली जाईल. हे शास्त्र डिजिटलेशन करण्यासाठी बाबांनी अथक प्रयत्न घेतले. अमरावती आश्रमाच्या जुन्या मोठ्यांचे डिजिटलेशन त्यांच्या प्रयत्नातून झाले. 

 

*भानखेड :-*

 

भानखेड येथे महानुभाव आश्रम राजापेठ हि जागा पोथी सोहळ्यासाठी उपयोगी आहेच, याव्यतिरिक्त मार्गाचे सेवेला उपयोगी जात आहे. या ठिकाणी आचार्य श्री मराठे बाबा, आचार्य श्री वर्धनस्थ बिडकर बाबा, आचार्य श्री हंसराज दादा खामनीकर, आचार्य श्री भोजने बाबा नवे, इत्यादी मंडळींनी वास्तव्य करून पोथी चिंतन केले आहे. येथे श्री नागदेवाचार्य स्मृतीस्थान आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेली ही भानखेड नगरी नव्याने सुधारणा करून महानुभावीयांसाठी एकांत ज्ञानासाठी मनोवेधक बनलेली आहे. याठिकाणीही बाबांची दूरदृष्टी आहे.

 

*रोट उपहार :-*

 

महानुभाव संप्रदायात फडप्रसंगी, भेट-भेटकाळी व याचा प्रसंगी एकत्रीत यावे ही रुढी आहे. तर सभा – सभारंभ भरवून गुरुकुळाचा मेळावा घ्यावा ही परंपरा आहे. प्रसाद बांधणी अभिषेक, खिचपूरी आंबील व रोट उपहार त्या त्या कुळाची परपंरा आहे. खिचपुरी, श्रीखामणीकर व श्री बीडकर परंपरेची आहे. आंबीलपान धाराशिवकर पिढीतील तर रोट उपहार श्रीकारंजेकर पिठी वंदनाचा असतो. हा उपहार म्हणजे पंचावतार उपहार असून त्यात हे पदार्थ प्रामुख्याने असतात. रोट आरोगणा लीळाचरित्रातही येवून गेली आहे. ही परंपरा श्री बाबाजींनी सुरू ठेवली शताब्दी महोत्सव 2024 साजरा करताना रोट उपहार संपन्न झाला होता.

 

*इतर कार्य :-*

 

#_१) श्रीक्षेत्र रिद्धपुर येथे केंद्रीय विश्वविद्यालय यांच्या प्रयत्नातून यशस्वी झाले.

 

#_२) आश्रमामध्ये श्री गोविंद प्रभू सार्वजनिक ग्रंथालय सुरू करण्यात त्यांचा अनमोल वाटा आहे.

 

#_३) रामसगाव इत्यादी सारख्या मंदिरांसाठी शासनमान्य निधी मंजूर करण्यात बाबांचे प्रयत्न

 

आहेत.

 

#_४) महानुभावीयांचे बरीच कामे राज्य सरकारने केल्याबद्दल माननीय. देवेंद्रजी फडणवीस यांचा कुंभकक्षेत्र नाशिक येथे त्यांचा कृतज्ञता सोहळा श्री बाबाजींच्या प्रयत्नातून संपन्न झाला.

 

#_५) जाळीचा देव येथील महामार्गाच्या ठिकाणी रोप वे व्हावा यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे प्रयत्न सुरू.

 

#_६) सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव ला शासकीय सुट्टी मंजूर करणे आणि प्रत्येक कार्यालयात नियमाने अवतार दिन साजरा करण्यासाठी प्रयत्नात यश.

 

#_७) मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यात सिंहाचा वाटा.

 

#_८) आतापर्यंत झालेल्या भानखेड नगरीत पोथी समारंभात अग्रणी नेतृत्व करण्यात बाबाजींचा क्रमांक प्रथमस्थानी

 

#_९) भारताचे सरसंघ संचालक माननीय, मोहनजी भागवत यांच्याशी संपर्क, चर्चा, मंथन करून महानुभावी यांची अनेक कामे पूर्णत्वास नेण्यात यश.

 

*उपसंहार :-*

 

अशा प्रकारे अर्थसंकल्पात अभिनयाची छाप, सामाजिकतेमध्ये प्रथमदर्शनी स्थान, महानुभाव संप्रदायाच्या प्रत्येक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बाबा प्रयत्नशील भूमिका निभवताना आपल्याला दिसतात. आज वरच्या श्री कारंजेकर आचार्यांचा इतिहास मनोवेधक आहे. या सर्वांच्या संन्निधानात राहून अनेक ब्रह्मविद्या अभ्यासक तयार झाले. पारंगत झाले. शतकभराच्या कार्यकाळात कवीश्वर कुळाचार्य श्री कारंजेकर बाबा हे तीन अधिकरण होऊन गेले. या तीन आधिकरणाने ज्ञान, भक्ती, वैराग्याचा ठसा उमटविला. पंथात ते अग्रस्थानी म्हणून प्रसिद्ध पावले.

 

त्यांच्या मार्गदर्शनाखाली परिषद नवनवीन आध्यात्मिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवित आहे.

त्यांची दृष्टी दूरगामी आहे —

 

“प्रत्येक भक्ताच्या हृदयात प्रभूचा प्रकाश जागवणे आणि प्रत्येक घरात पंथसेवेचा दीप प्रज्वलित करणे.”

 

*समारोप : तेजोमय नेतृत्वाची प्रेरणा*

 

महंत श्री कारंजेकर बाबा यांच्या निवडीने अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या कार्याला एक नवीन दिशा आणि वेग लाभला आहे.

त्यांची निष्ठा, त्याग आणि कार्यशीलता ही भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

 

त्यांच्या नेतृत्वाखाली पंथकार्य अधिक समरस, समर्पित आणि सेवाभावी बनले आहे.

पंथप्रेम, मानवसेवा आणि प्रभुभक्ती — या तिन्हींचा संगम त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसतो.

 

*“पंथदीप कधी विझत नाही —*

*तो नवे तेज घेऊन काळाच्या प्रवाहात उजळत राहतो.”*

 

 

आज त्या तेजस्वितेचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे

*महंत श्री कारंजेकर बाबा — पंथसेवेचा नवा दीप, भक्तांसाठी नवी प्रेरणा.*

 

*आदरणीय दादांचा व माझा परिचय*

 

आदरणीय मोहनराज दादा यांच्या बद्दल मी अगदी ३० वर्षापासून जवळचा आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.

 

त्याचं कारण असं की…

 

माझे श्रीगुरुजी कैवल्य वासी उपाध्य कुळ आचार्य महंत श्री वामनराज शास्त्री उपाख्य वर्धनस्थ बाबा महानुभाव रणाइचे यांच्या कडून मी जेव्हा नाम घेतले अर्थातच उपदेश घेतला तेव्हा पासुन बाबाचे जवळ जाण्याची संधी मिळत गेली…

 

आदरणीय बाबांचा मी अगदी लाडका शिष्य म्हणून पंथात देखील ओळखला जाऊ लागलो. त्याच काळात बाबांचे माध्यमातून अनेक सोहळे अर्थातच खिचपुरी असेल अगर पोथी प्रवचन त्या सर्व कार्यात तत्कालीन आदरणीय श्री मोहनराज दादा हे नेहमीच तिथ उपलब्ध असायचे. दादांकडे नेहमी पाक गृहाची जबाबदारी असत. त्यामुळं मी मोठ्या बाबांचे तसेच कैवल्य वासी सरळ बाबांच्या सेवेत असताना दादांची व आमची नेहमीच चर्चा हितगुज होऊ लागली. अश्याच दादांचे सोबत जवळीक वाढत गेली…

 

पुढ जाऊन आमच्या श्रीगोविंद प्रभू अवतार दिन सोहळा समिती नवीन नाशिक द्वारा आयोजित अवतार दिन सोहळयाचे निमित्ताने देखील दादांचा प्रवचन सोहळा पार पाडला.

 

याच कारणाने नेहमीच दादांची भेट व हितगुज होत असे…

 

यावेळी दादांचा माझ्याबद्दल असलेला विश्वास व्यक्त करताना आवर्जून सांगाव वाटत की…

 

पंथाच्या एका तीर्थ स्थानावर तिथला एक ग्रहस्थ साधकाला व स्थानावर आपला उपद्रव करत होता. त्या ठिकाणी असलेली साधक अनेकाना याबाबतीत तक्रार करून अक्षरशः रडकुंडी झालेले होते. त्याच दरम्यान त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून आदरणीय दादांना त्यांची ती अडचण मांडली. त्यावेळी दादा हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. मात्र त्यांनी ती अडचण माहीत करून घेताच ही अडचण तुम्ही सुरेश डोळसे यांना सांगा ते तात्काळ निवारण करून देखील इतक खात्रीने सांगितलं की. त्यांना होणारा त्रास नक्कीच दूर होईल पुढ जाऊन त्याठिकाणी अडचण होणार नाही याची त्यांना खात्री होती. आणि त्याच्या त्या आदेशाला ही मला शक्य होईल तितकी दाद देण्याचं काम माझ्याकडून देवांनी करून घेतलं. 

 

हे सांगायचं कारण इतकंच की

 

दादांचा माझ्या बद्दल असलेला विशेष विश्वास…

 

अशा ह्या दादांची आज पंथाचे शिखर संस्थेच्या प्रमुख पदी झालेली निवड ही पंथ हिताचे दृष्टीने खूप मोलाची ठरणार आहे यात शंका नाही…

🕊️ पंथदीपाचा तेजोमय प्रवास — त्यांच्या कार्यातून, त्यांच्या नेतृत्वातून, आणि त्यांच्या भक्तीभावातून अविरत उजळत राहो.

अशा कवीश्वर कुळाचार्य श्रीकारंजेकर बाबाजींना अर्थातच आज त्यांच्या झालेल्या निवडीबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन आणि सादर दंडवत प्रणाम…

✒️लेखन:-प से सुरेश सरूबाई देवराम डोळसे, नाशिक, संस्थापक अध्यक्ष श्रीप्रभू प्रतिष्ठान नाशिक मो नंबर ९४२२७६२९१४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here