Home महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्युची नव्याने सखोल चौकशी व्हावी-ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत...

बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्युची नव्याने सखोल चौकशी व्हावी-ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

233

 

 

 

जगदीश का. काशिकर, विशेष प्रतिनिधी, मो. ९७६८४२५७५७.

 

 

विजयादशमीच्या दिवशी मुंबईत दोन्ही शिवसेनेचे मेळावे पार पडले. उबाठा गटाचा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर झाला. तर शिंदे गटाचा मेळावा मेस्को सेंटर च्या डोम मध्ये घेण्यात आला होता. अपेक्षेप्रमाणे दोन्ही मेळाव्यामध्ये एकमेकांवर आरोपांची जोरदार चिखलफेक करण्यात आल्याचे उभ्या महाराष्ट्राने बघितले.

यातील शिंदे गटाच्या मेळाव्यात या गटाचे एक नेते रामदास कदम यांनी केलेल्या एका आरोपामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशाच्या राजकीय विश्वात प्रचंड खळबळ उडाली आहे. रामदास कदम यांनी दावा केला आहे, की बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर पुढील दोन दिवस उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मृत्यू जाहीर न करता मृतदेह तसाच घरात पडून राहू दिला होता. या काळात त्यांनी विविध कागदपत्रांवर बाळासाहेबांच्या हातांच्या बोटांचे ठसे देखील घेतले असा आरोप रामदास कदम यांनी यावेळी केला. यावेळी बाळासाहेबांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची देखील साक्ष काढावी अशी मागणी त्यांनी केली.

रामदास कदम यांच्या या आरोपानंतर लगेचच शिवसेनेतील चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, असे काही नेते पुढे सरसावले आणि त्यांनी रामदास कदमांवर चांगलेच तोंडसुख घेतले. त्याच्या उत्तरात रामदास कदम यांनी लगेचच दुसऱ्या दिवशी एक पत्र परिषद घेतली आणि त्यात मी माझ्या दाव्यावर ठाम आहे, असे स्पष्ट करत उद्धव ठाकरे यांनी आपली स्वतःची आणि माझी नार्को टेस्ट करावी म्हणजे दूध का दूध पानी का पानी होऊन जाईल आणि नेमके वास्तव महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल. त्यांच्या या आरोपामुळे अजूनच वातावरण तापलेले आहे.

आता प्रस्तुत लेख लिहीत असतानाच शिवसेनेचे एक नेते अनिल परब यांनी पत्र परिषद घेऊन रामदास कदम यांचे दावे खोडून काढले आहेत. कदम यांची अक्कल गुडघ्यात आहे अशी टिप्पणी करत कोणताही मृतदेह शेवपेटीत न ठेवता दोन दिवस चांगला राहू शकतो का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. अजूनही काही दावे त्यांनी यावेळी केले आहेत. एकूणच हा वाद आता चांगलाच पेटणार असे दिसते आहे.

रामदास कदम हे शिवसेनेचे एकाकाळचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जातात. नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर काही काळ रामदास कदम हे महाराष्ट्राचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणूनही कार्यरत होते. त्याआधी मनोहर जोशी मंत्रिमंडळात आणि नंतर देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात ते मंत्री देखील राहिलेले आहेत. उद्धव ठाकरेंवर नाराज होत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ज्यावेळी ४० शिवसेना आमदारांनी गुजराथेत पळून जात पक्ष सोडला, त्यावेळी त्या आमदारांमध्ये रामदास कदम आघाडीवर होते. नंतर शिंदेंच्या मंत्रिमंडळातही ते मंत्री राहिलेले आहेत. तसेही ते बाळासाहेबांच्या अतिशय जवळचे म्हणून ओळखले गेलेले शिवसैनिक आहेत. त्यामुळे त्यांचा दावा एकदमच मोडीत काढता येत नाही हे निश्चित.

कदम हे कोकणातील आहेत. काल कोकणातीलच एक नेते वैभव नाईक यांनी कदम तेरा वर्ष गप्प का राहिलेत असा प्रश्न उपस्थित केला आहे. बाळासाहेबांचे निधन १७ नोव्हेंबर २०१२ ला झाले. त्यावेळी रामदास कदम हे ठाकरेंच्या शिवसेनेतच सक्रिय होते. त्यांच्या दाव्यानुसार बाळासाहेबांच्या अखेरच्या आजारपणात आपण मातोश्रीवरच मुक्कामी होतो, आणि रोज रात्री मातोश्री बाहेरच्या बाकावर झोपत होतो. यावरून त्यांची ठाकरे परिवाराशी असलेली जवळीक लक्षात येते. त्यानंतर २०२२ पर्यंत म्हणजेच पुढील दहा वर्ष कदम हे ठाकरेंसोबतच होते. अशावेळी ठाकरेंची झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवण्यातच कदम यांनी धन्यता मानली असावी. २०२२ मध्ये त्यांनी शिंदेंसोबत पक्ष सोडला. नंतर शिंदे सोबत पक्ष सोडून गेलेल्यांवर उद्धव ठाकरे, त्यांचे युवराज आदित्य ठाकरे, एक शागीर्द संजय राऊत, नंतरचे अनिल परब, अरविंद सावंत, अनिल देसाई असे सगळेच शिंदे गटातील आमदारांवर टीकास्त्र सोडत होते. २०२४ च्या निवडणुकीत महायुती विजयी झाल्यावर रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांना गृहराज्यमंत्री म्हणून शपथ देण्यात आली. नंतरच्या काळात उबाठा गटातील आमदारांनी योगेश कदम यांच्या एका डान्सबारचे प्रकरण काढले. त्या बारचे लायसन्स रामदासजींच्या पत्नीच्या म्हणजेच योगेशच्या आईच्या नावावर असल्याचा दावा या शिवसेना नेत्यांनी केला. तेव्हापासून कदम आणि उबाठा गटातील सर्व नेते यांच्यात चांगलीच जुंपलेली आहे. ठाकरे गट आपल्यावर वारंवार असे वेगवेगळ्या आरोप करून आपल्याला अडचणीत आणतो आहे, हे पाहून कदाचित कदम यांनी आता तेरा वर्षांनी तोंड उघडले असावे, असा निष्कर्ष काढता येतो. राजकारणात जोवर तुम्ही एकमेकांचे सोबती असता, तोवर एकमेकांशी पापे झाकून नेणे, हे परस्पर कर्तव्य असते. मात्र जेव्हा काही मुद्द्यांवरून एकमेकांशी फाटते, तेव्हा मग असे हुकमाचे एक्के बाहेर काढले जातात. डान्सबार प्रकरणात आपल्या कुटुंबाची झालेली बदनामी लक्षात घेत रामदास कदम यांनी यावेळी हा डाव साधला असावा असा निष्कर्ष इथे काढता येतो.

रामदास कदम यांनी केलेल्या या आरोपात खरोखरी काही तथ्य असेल का? यावर आडाखे बांधणे सध्या सुरू आहे. आज कदम जे बोलत आहेत तशी चर्चा बाळासाहेबांच्या निधनानंतर काही काळ सुरू झाली होती. ही कुजबूज त्यावेळी बाळासाहेबांच्या बंगल्यात वावरणाऱ्या मंडळींकडूनच केली गेली होती, असेही कानावर आले होते. मात्र त्याबाबत कोणताही ठोस पुरावा न मिळाल्यामुळे कोणीही तसा दावा केला नव्हता.

उद्धव ठाकरे यांनी खरोखरी असे काही केले असेल काय याबाबत काही जाणकारांना विचारले असता तशी शक्यता नाकारता येत नाही असे उत्तर मिळाले. मात्र त्याबाबत नेमके पुरावे उपलब्ध नसल्यामुळे तसा ठोस आरोप करता येत नाही असेही या जाणकार सूत्रांनी सांगितले. प्रस्तुत प्रकरणात काही जाणकारांनी सांगितल्यानुसार उद्धव ठाकरे यांचा स्वभाव सुरुवातीपासून काहीसा आत्मकेंद्रित आणि हट्टी राहिलेला आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात ते फारसे राजकारणात सक्रिय नव्हते. त्यांच्याहून वयाने लहान असलेले राज ठाकरे उद्धवजींच्या आधी शिवसेनेत सक्रिय झाले होते. त्यांनी विद्यार्थी सेनेची स्थापना केली आणि बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून ते राजकारण करू लागले होते. उद्धव ठाकरे नंतर राजकारणात साधारणतः १९९० नंतर सक्रिय झाले. त्यावेळी बाळासाहेबांचे पुढचे राजकीय वारसदार म्हणून राज ठाकरे यांच्याकडेच बघितले जात होते. त्याला कारणेही होती. बाळासाहेबांप्रमाणेच व्यक्तिमत्त्व आणि वक्तृत्वशैली, बाळासाहेबांसारखेच व्यंगचित्रकार आणि बाळासाहेबांइतकेच संघटन कौशल्य हे राज ठाकरेंचे गूण उभ्या महाराष्ट्राला विशेषत्वाने जाणवत होते. त्यामुळे पुढचा शिवसेनाप्रमुख राज ठाकरेच असेही बोलले जाऊ लागले होते.

मात्र २००१-०२ या कालखंडात अचानक बाळासाहेबांनंतर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंचे नाव पुढे आले. तिथून खरी संघर्षाला सुरुवात झाली. बाळासाहेब कधी प्रेमाने तर कधी थोडा धाक दाखवून सर्वांना समजून घेत सांभाळून घेत होते. मात्र उद्धव ठाकरेंना ते कधीच जमले नाही. त्यामुळे त्यांनी संघटनेची सूत्रे हाती घेताच पक्षांतर्गत वाद सुरू झाले. त्याचा पहिला दणका बसला तो नारायण राणे यांना. राणेंनी २००५ मध्ये शिवसेना सोडून ते काँग्रेसमध्ये प्रवेश घेते झाले. त्यांच्यासोबत जवळजवळ १५ आमदार पक्ष सोडून गेले होते.

राणेंनी शिवसेना सोडली त्याचे कोणाला फारसे काही वाटले नाही. मात्र खरा धक्का बसला तो जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला तेव्हा. राज ठाकरे हे ठाकरे कुटुंबाचाच एक अविभाज्य भाग होते. त्यांचा बाळासाहेबांवर खूप जीव होता. तरीही त्यांना शिवसेनेतून बाजूला व्हावे लागले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले होते की माझे माझ्या विठ्ठलावर प्रेम आहे. मात्र सध्या त्याला बडव्यांनी घेरलेले आहे, आणि तेच मला पुढे जाऊ देत नाहीत, हा सरळ इशारा उद्धव ठाकरेंना होता. राज ठाकरेंनी शिवसेना सोडणे हा उभ्या महाराष्ट्राला जबरदस्त धक्का होता. राज आणि उद्धव या दोघांनी एकत्र यावे यासाठी शिवसेनेतील अनेक ज्येष्ठांनी खूप प्रयत्न केले. त्यात मनोहर जोशींचाही समावेश होता. मात्र ज्यांनी ज्यांनी असे प्रयत्न केले ते सर्वच उद्धव ठाकरेंच्या हिटलिस्टवर आले. शेवटी राज आणि उद्धव एकत्र काही आलेच नाहीत. राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी केली आणि त्यांनी उद्धव ठाकरेंसमोर एक आव्हान देखील उभे केले.

नारायण राणे आणि राज ठाकरे हे दोन खंदे साथीदार शिवसेनेला सोडून गेल्यावर अजूनही किरकोळ जाणेयेणे सुरूच होते. त्यामुळे शिवसेना दिवसेंदिवस खिळखिळी होत चालली होती. १९९९ मध्ये सत्ता गेली, तरी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते पद २००९ पर्यंत शिवसेनेकडे होते. मात्र २००९ ला ते देखील गमावावे लागले होते. मात्र अशावेळी आपण कुठे कमी पडतो आहोत याचा विचार न करता उद्धव ठाकरे आपल्याच मस्तीत राहिले. त्यामुळे शिवसेनेला अजूनच धक्के बसत गेले.

२०१२ मध्ये बाळासाहेबांचे निधन झाले. त्यानंतर शिवसेनेचा संपूर्ण कारभार उद्धव ठाकरे यांच्याच हाती आला. त्यांनी अडेलतट्टू पणा करत २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपशी २५ वर्ष जुनी असलेली मैत्री तोडली. परिणामी ऐनवेळी शिवसेनेला स्वतंत्रपणे लढावे लागले होते. भाजपला प्रथमच महाराष्ट्रात १०० च्या वर जागा मिळाल्या होत्या. नंतर उद्धव ठाकरे यांना नाक घासत फडणवीसांकडे जावे लागले आणि सत्तेत नाईलाजाने सहभाग घ्यावा लागला होता. असे म्हणतात की २०१४ मध्ये जर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना शरण जात सत्तेत सहभाग घेतला नसता, तर त्याचवेळी शिवसेना फुटली असती. नंतरच्या काळात त्यांनी मनोहर जोशी सारखे बाळासाहेबांचे निष्ठावंत देखील बाजूला सारले. २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांनी पुन्हा भाजपशी पंगा घेत स्वतंत्रपणे निवडणूक लढवली आणि शेवटी मुंबईची सत्ता हातात यावी यासाठी पुन्हा फडणवीसांसमोर नाक घासावे लागले होते.

२०१९ मध्ये तर त्यांनी कहरच केला. निवडणुकीपूर्वी केलेली युती निवडणुकीनंतर बाळासाहेबांच्या खोलीत न दिलेल्या वचनाचा बागुलबुवा उभा करत मोडली आणि ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बाळासाहेबांनी आयुष्यभर शिव्या घातल्या होत्या, त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसत सत्ता मिळवली. ठाकरे परिवारातल्या कोणीही सत्तेत जाऊ नये हे बाळासाहेबांचे तत्व होते. मात्र त्याला तिलांजली देत उद्धव ठाकरेंनी चक्क ३१ महिने मुख्यमंत्रीपद देखील मिळवले होते. ही सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी चक्क दहा जनपथ नवी दिल्ली येथे जाऊन सोनिया गांधींच्या नाकदुऱ्या काढायलाही कमी केले नाही. सत्तेसाठी माणूस किती लाचार होऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले. त्यामुळे त्यांची महाराष्ट्रातील विश्वासार्हता संपली होती. त्यानंतर ३१ महिने सत्ता टिकवण्यासाठी त्यांनी काय काय उपद्व्याप केले ते उभ्या महाराष्ट्राला माहित आहेत. त्यामुळे त्यावर जास्त लिहिणार नाही.

हे सर्व काही उद्धव ठाकरेंनी फक्त व्यक्तिगत स्वार्थासाठी केले होते. त्यांना तिथे शिवसेनेशी आणि मराठी माणसाशी काहीही देणे घेणे नव्हते. हे सर्व मुद्दे लक्षात घेतले तर स्वार्थासाठी उद्धव ठाकरे काहीही करू शकतात हा निष्कर्ष काढता येतो.

इथे आणखी एक मुद्दा विचारात घ्यायला हवा. बाळासाहेबांना एकूण तीन पुत्र आहेत. त्यातील एक बिंदूमाधव दुसरा जयदेव आणि तिसरा उद्धव, यातील दोन मुले आधीपासूनच बाळासाहेबांपासून वेगळे झालेली आहेत. त्यातील एकाची पत्नी स्मिता ठाकरे ही मात्र अखेरपर्यंत या परिवारासोबत राहत होती. बाळासाहेबांच्या मृत्युपत्रात मातोश्रीचा एक मजला स्मिता ठाकरे यांना राखून ठेवण्यात आला आहे. बाकी सर्व उद्धव ठाकरेंच्या ताब्यात आहेत. कदाचित बाळासाहेबांचे मृत्युपत्र नसले तर बाकी दोन भाऊ मालमत्तेवर हक्क सांगतील, या हेतूने देखील उद्धव ठाकरेंनी दोन दिवस उशीर करून सर्व हालचाली केल्या असाव्या असा निष्कर्ष काढता येतो. अर्थात त्याला ठोस आधार कोणताही नाही हे इथे नमूद करायलाच हवे.

मृत्यूनंतर दोन दिवस मृत देह घरात ठेवता येतो का, आणि तो चांगला राहील का, असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला आहे. मात्र माझ्या अल्पमतीनुसार एमबाम्बिंग नावाच्या वैद्यकीय प्रक्रियेची पूर्तता केल्यास तो मृतदेह सांभाळता येतो. तसेच व्हेंटिलेटर लावलेले असले तर दीर्घकाळ सुद्धा कृत्रिम श्वासावर व्यक्ती जिवंत ठेवता येते. आता मातोश्री बंगल्यावर व्हेंटिलेटर लावले होते का, याची इथे मला तरी कल्पना नाही. मात्र बाळासाहेबांसारखा व्हीआयपी पेशंट बघता कदाचित ती सोय देखील केलेली असू शकेल. त्यावर तिथे उपचार करणारे डॉक्टरच प्रकाश टाकू शकतात. रामदास कदम यांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा दाखला दिला आहे, आणि त्यांचीही साक्ष काढण्याचे आवाहन केले आहे.

या सर्व प्रकारात गंमत अशी की गेल्या दोन दिवसात अजून पर्यंत तरी उद्धव ठाकरेंनी या आरोपांना स्वतः कोणतेही उत्तर दिलेले नाही. त्या ऐवजी अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, संजय राऊत, अनिल परब, असे आपले मोहरेच त्यांनी पुढे केलेले आहेत. खरे तर त्यांनी समोर येऊन हा खुलासा करायला हवा होता म्हणजे चित्र काहीसे स्पष्ट होऊ शकले असते. अर्थात ते अजून तरी खुलासा करायला समोर आलेलेच नाहीत.

या सर्व पार्श्वभूमीवर झालेल्या प्रकाराची सखोल चौकशी गरजेची आहे. रामदास कदम यांनी माझी आणि उद्धव ठाकरेंची नार्कोटेस्ट करावी असे आव्हान उद्धव ठाकरेंना केले आहे. उद्धव ठाकरेंनी ही नार्कोटेस्ट मान्य करावी आणि दोघांचीही नार्को टेस्ट व्हावी. तसेच राज्य शासनाने झाल्या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी देखील करावी, आणि नेमके वास्तव जनसामान्यांसमोर आणावे.

बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील एक महान व्यक्तिमत्व म्हणून ओळखले गेले होते. आजही बाळासाहेबांना चाहणारा फार मोठा वर्ग महाराष्ट्रात उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत असे वाद निर्माण होणे हे कुठेतरी चुकीचेच आहे असे वाटते. त्यामुळेच दूध का दूध पानी का पानी करण्यासाठी या प्रकाराची सखोल चौकशी व्हायला हवी आणि नेमके सत्य महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांसमोर आणायला हवे. ते खरोखरी गरजेचे ठरणार आहे.

वाचकहो….. पटतेय का तुम्हाला हे…..?
त्यासाठी आधी समजून तर घ्या राजे हो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here