


चंद्रपूर : कलावादी प्रवाहाच्या अनुकरणाचे बळी न पडता आदिवासी लेखक व कलावंतांनी आपल्या सभोवतीचे ज्वलंत वास्तव कलाकृतीतून सशक्तपणे मांडावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ आदिवासी विचारवंत प्रभु राजगडकर यांनी केले. प्रब्रह्मानंद मडावी यांच्या ‘गोंडी पेंटिंगचे जनक : जनगण सिंह श्याम’या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. केंद्र सरकारच्या नाट्य व संस्कृती विभागाचे निवृत्त निर्देश डॉ. नीलकांत कुलसंगे यांचे हस्ते ग्रंथ प्रकाशन झाले.
फिनिक्स साहित्य मंच चंद्रपूर, उलगुलान साहित्य व सांस्कृतिक मंच मूलद्वारा श्रमिक पत्रकार भवनात शनिवारी (दि. २७) हा कार्यक्रम झाला. प्रमुख अतिथी जिल्हा समाजकल्याण अधिकारी धनंजय साळवे, डॉ. विजय उराडे, पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. हमराज उईके व भाष्यकार म्हणून बोलीभाषा अभ्यासक राजेश मडावी आदी उपस्थित होते. राजगडकर म्हणाले, आजपर्यंत वारली चित्रकलेबाबत आपण सर्व वाचत आलो. मात्र, प्रब्रह्मानंद मडावी यांनी गोंडी पेंटिंगचे जनक जनगण सिंह श्याम या अलक्षित चित्रकाराची मराठी कलाविश्वात प्रथमच ओळख करून दिली. मराठीत असे पुस्तक आजवर नव्हते.
डॉ. कुलसंगे यांनी ग्रंथाचे आशय व सौंदर्य अधोरेखित करून कलावंतांनी प्रबोधनाचे साधन म्हणून उत्तम कलाकृती साकारण्याचे आवाहन केले. मडावी यांनी युरोपीयन व आधुनिक भारतीय चित्रकलेच्या पार्श्वभूमीवर गोंडी चित्रकलेचे महत्त्व अधाेरेखित केले. समाजकल्याण अधिकारी साळवे यांनी ग्रंथाची मौलिकता विशद केली. डॉ. गेडाम यांनी ग्रंथ लोकांपर्यंत पोहोचावा, असे आवाहन केले. प्रब्रह्मानंद मडावी यांनी मनोगत, प्रास्ताविक कवी नरेशकुमार बोरीकर, तर संचालन अरविंद मेश्राम यांनी केले. डॉ. देव कनाके यांनी आभार मानले.
आशयसंपन्न कवितांनी रंगले संमेलन
दुसऱ्या सत्रात प्रवीण आडेकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरेश रामटेके व बी. सी. नगराळे यांच्या उपस्थितीत कवी संमेलन रंगले. गोपाल शिरपूरकर (वणी), नागोराव सोनकुसरे (नागपूर), संतोषकुमार उईके (गोंडपिपरी), विजय वाटेकर, मृणाल कांबळे, ॲड. योगिता रायपुरे, सूरज दहागावकर, संगीता घोडेस्वार (चंद्रपूर), सुधाकर कनाके (बल्लारपूर), प्रा. नीरज आत्राम (वरोरा) अरुण घोरपडे (भद्रावती), नेताजी सोयाम (सिंदेवाही), सुरेश गेडाम (सावली), शालिक दानव आदींनी कविता सादर केल्या. धर्मेंद्र कनाके यांनी संचालन केले. गोपाल शिरपूरकर यांनी आभार मानले.














