Home चंद्रपूर राजुरा विधानसभा निवडणुकीपूर्वी बनावट मतदार नोंदणी घोटाळा उघड

राजुरा विधानसभा निवडणुकीपूर्वी बनावट मतदार नोंदणी घोटाळा उघड

174

 

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

भाजप नेत्यांशी संबंधित व्यक्तींचा सहभाग; युवक काँग्रेसकडून पोलिस अधीक्षकांना तक्रार.

राजुरा – राजुरा विधानसभा निवडणूक २०२४ पूर्वी मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बनावट आणि डुप्लिकेट नोंदणी झाल्याचा गंभीर आरोप चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसकडून करण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, ERONET पोर्टलद्वारे करण्यात आलेल्या मतदार नोंदणी प्रक्रियेत मोबाईल क्रमांक आणि नोंदणीदारांची नावे जुळत नसल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. यावरून फसवणूक, तोतयागिरी आणि गुन्हेगारी कटाचे गंभीर प्रकार घडल्याचे स्पष्ट होते. युवक काँग्रेसने केलेल्या स्वतंत्र तपासणीत काही उदाहरणे उघडकीस आली असून त्यात सत्ताधारी भाजप नेत्यांच्या निकटवर्तीयांचा थेट सहभाग असल्याचे आरोप आहेत.
अनुक्रमांक १५ (एफआयआर संदर्भ): अनिल झाडे यांच्या नावाने दाखल केलेल्या अर्जात दिलेला ७८२०८६४५१९ हा मोबाईल क्रमांक भाजप नेते निलेश ताजणे यांच्या मेडिकल फार्मसीत काम करणाऱ्या व्यक्तीशी संबंधित असल्याचे म्हटले आहे.अनुक्रमांक १६ (एफआयआर संदर्भ): प्रतीक भाऊ यांच्या नावाने नोंदवलेला ९६०७२१७१४३ हा मोबाईल क्रमांक भाजपचा सक्रिय सदस्य आणि आमदार देवराव भोंगळे यांचे निकटवर्तीय प्रतीक सदन पवार यांचा असल्याचे उघड झाले आहे. या प्रकारातून भाजपच्या स्थानिक नेटवर्कमधील व्यक्तींनी संगनमत करून मतदार यादीत फेरफार केल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे.
जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने तक्रारीत पोलिसांकडे खालील मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यात फसव्या नोंदणीत सामील असलेल्या व्यक्तींविरुद्ध तातडीने फौजदारी खटला दाखल करावा, एफआयआरमध्ये नमूद मोबाईल क्रमांकांची दूरसंचार कंपन्यांमार्फत पडताळणी करून संबंधितांची चौकशी करावी, तपासाची प्रगती पारदर्शक पद्धतीने जाहीर करावी, युवक काँग्रेसने पोलिस प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्यास पुढील पावले उचलण्याचा इशारा दिला आहे. यात सीआरपीसी कलम २०० अंतर्गत खाजगी फौजदारी तक्रार दाखल करणे, उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणे आणि निवडणूक आयोगाकडे हस्तक्षेपासाठी धाव घेणे यांचा समावेश असेल.

*मुक्त व निष्पक्ष निवडणुकांशी तडजोड मान्य नाही : शंतनु धोटे यांनी घेतला आक्रमक पावित्रा*
या प्रकरणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे म्हणाले, निवडणुकांचे पावित्र्य राखणे हा प्रत्येक नागरिकाचा संवैधानिक अधिकार आहे. सत्ताधारी भाजप नेत्यांच्या संगनमताने मतदार यादीत फसवणूक होत असेल तर ते लोकशाहीवर थेट आघात आहे. पोलिसांनी निष्पक्ष व वेळेत कारवाई करणे गरजेचे आहे, अन्यथा आम्हाला न्यायालयीन आणि कायदेशीर मार्गांचा अवलंब करावा लागेल. एकंदरीत राजुरा मतदारसंघात निवडणुकीपूर्वीच असा घोटाळा उघड झाल्याने स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here