Home महाराष्ट्र दुसऱ्याचे धन, दुसऱ्याची स्त्री यांच्यावर कुदृष्टी ठेवू नये…’

दुसऱ्याचे धन, दुसऱ्याची स्त्री यांच्यावर कुदृष्टी ठेवू नये…’

166

 

 

श्रीपाल आणि मैनासुंदरी यांच्या गोष्टीत खूप काही शिकायला मिळते. आजच्या कथानकात दुसऱ्याचे धन, दुसऱ्याची स्त्री यांच्यावर कुदृष्टी ठेवू नये, हे शिकायला मिळते. धवल शेठने श्रीपालला समुद्रात ढकलून दिले आणि श्रीपालच्या संपत्तीवर तसेच दोन्ही पत्नींवर हक्क जमविण्याचा प्रयत्न केला. त्या दोघींचे चारित्र्य, शील धवल शेठमुळे धोक्यात आले. भारतीय महिला इतक्या शीलवान असतात की, देह त्याग करू शकतात, परंतु परपुरुषासोबत जाऊ शकत नाहीत. असे अत्यंत रोमांचकारी कथानक प.पू. नीलेशप्रभा म.सा. यांनी आजच्या प्रवचनातून सांगितले.
श्रीपाल समुद्रात पडल्याची बातमी त्याच्या दोन्ही पत्नींना समजली. त्या मूर्छित झाल्या, शोक करू लागल्या. “आम्ही असे कोणते पाप केले असेल किंवा कोणते कर्मबंध झाले असतील, त्यामुळे पतीवियोग सहन करावा लागतो,” असे त्या म्हणाल्या. इकडे धवल शेठ देखील श्रीपालसाठी दिखाव्याचा शोक करू लागला. त्याचवेळी धवल शेठचे मित्र दोन्ही स्त्रियांना समजावतात, “या दुःखाच्या वेळी तुम्ही धैर्याने वागले पाहिजे.” त्यावर त्या म्हणतात, “आमचा तर पूर्ण बागच नष्ट झाला. सासू आणि मैनासुंदरीला आम्ही काय उत्तर देऊ? चंपापुरी राज्य आता कोण सांभाळेल?” त्यात त्यांच्या दासी देखील धवल शेठच्या कटात सहभागी होतात. “निघून गेलेला प्राण पुन्हा येत नाही. रडणे-कुढणे बंद करून हे जीवन मस्त आनंदाने जगावे. त्यासाठी धवल शेठशी विवाह करावा,” असा सल्ला त्या देतात. “धवल शेठ आमच्या सासऱ्यासारखा आहे, हा विचार करूच शकत नाही. आम्ही साधारण नारी नव्हे, पतीव्रता आहोत. परपुरुषाची दृष्टी देखील सहन करू शकत नाही, तर विवाह करणे दूरच,” असे त्या ठामपणे सांगतात. धवल शेठ मदनरेखा व रत्नमंजुषा यांच्यावर साम, दाम, दंड, भेद सर्व आजमावतो, परंतु त्या आपल्या निर्णयाशी ठाम राहतात. दोघींनी नवकार मंत्राचे मोठ्या श्रद्धेने व एकाग्रतेने स्मरण केले. क्षेत्रपाल चक्रेश्वरी देवी, शीलसहाय्यक देवी अवतीर्ण झाली. त्यावेळी समुद्र खवळला होता. जहाजात अफरातफरी निर्माण झाली. जहाजातील सर्वजण भयभीत झाले. धवल शेठने इतका अत्याचार केला तरी देखील, “धवल शेठला सोडून देण्यात यावे,” अशी विनंती मदनरेखा व रत्नमंजुषा देवीला करतात. त्या दोहोंच्या चांगुलपणामुळे धवल शेठचा जीव वाचतो आणि तो त्या दोहोंच्या चरणी येतो.-(ऑक्टोबर ०३ : २०२५
जळगाव)

 

(शब्दांकन – किशोर कुलकर्णी, मो. 94227 76759)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here