


जळगाव – समकित के ६७ बोल यातील ८ व्या क्रमांकात असलेल्या ‘प्रभावना’चे महत्त्व सांगण्यात आले. प्रभावना याचेही मुख्य आठ प्रकार आहेत. त्यातील ‘प्रवचन’ आणि ‘कथा’ या प्रकारांवर सोदाहरण सांगण्यात आले. करताना धर्मकार्यात श्रावक-श्राविकांनी सहभागी व्हावे असे सांगत, प्रवचन हे धर्मप्रसाराचे सशक्त माध्यम असून, त्यातून तत्वज्ञान स्पष्ट होते आणि आत्मजागृती होते. त्यात प.पू. गुरुणीसा उमरावकुंवर म.सा. यांनी काश्मीरमध्ये प्रवचनाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी जनजागृती केली. जैन नव्हे तर जैनेतर लोकांनी देखील मद्य, मास, वाईट गोष्टींचा त्याग केला. प्रवचनाचा इतका प्रभाव असतो की एकच प्रवचन ऐकून प.पू. जयमलजी म.सा. यांची आत्मज्योती जागृत झाली आणि ते एकभवावतारी झाले. त्यांनी १८ राजांना सुपंथात आणले. जयमलजी सहज म्हणून गुरू प.पू. भूधरजींच्या प्रवचनात बसले व त्यात सुदर्शन, शील, ब्रह्मचर्य याची महती सांगणारी गोष्ट ऐकल्यावर वैराग्य आले. नवीन नोकरी लागणे व बदली होणे यात जसे अंतर असते तसे काहीसे धर्मजागृती आणि धर्मदलालीमध्ये असते. कथा हे धर्माचे सजीव चित्रण असून, त्यातून श्रोत्यांमध्ये गोडी निर्माण होते आणि नैतिक मूल्यांची रुजवणूक होते. धर्म प्रभावना म्हणजे आत्मकल्याणासाठी इतरांना प्रेरित करणे. प्रभावनेतून समकिती होऊन मोक्षपदी पोहोचता येऊ शकते. प्रभावना ही सम्यक दर्शनाच्या मार्गातील महत्त्वाची पायरी आहे, जी साधकाला आत्मोन्नतीकडे नेते प.पू. डॉ. इमितप्रभाजी म.सा. यांनी आजच्या धर्मप्रवचनात केले.
क्रोधामुळे आत्मा अधोगतीच्या दिशेने जातो. क्रोधाला चांडाळ मानला जातो, त्यामुळे क्रोधाला त्यागले पाहिजे. क्रोध विवेकाचा सगळ्यात मोठा शत्रू असतो. यासाठी एका गुरू-शिष्याची गोष्ट प्रस्तूत करण्यात आली. गुरू आणि शिष्य रस्त्याने जात असताना रस्त्यावर मेलेला बेडूक पडलेला होता. चुकून गुरुंच्या पायाचा धक्का लागतो. शिष्य गुरुंना उद्देशून बोलतो की, गुरुदेव, आपण त्या बेडकाला मारले. गुरुंना सतत बोलून त्यांना तो शिष्य दोषी म्हणत होता. त्यांच्या कुटियात पोहोचले, स्वस्थ बसत नाही तोवर तो शिष्य पुन्हा म्हणतो, गुरुदेव तुम्ही प्रायश्चित्त करायला हवे. त्यावर ते शांत, संयमी गुरू क्रोधीत झाले व शिष्याच्या मागे त्याला धरायला जाताना छप्परावर डोके आदळल्याने त्यांना तिथेच मृत्यू होतो. क्रोधामुळे अनेक वर्षांची मैत्री संपुष्टात येते. क्रोधाचे रुपांतर प्रेम, भक्तीत झाले की कृष्ण होतो, ध्यानात रुपांतर झाले तर गौतम बुद्ध होतात आणि करुणा व क्षमा यात रुपांतर झाले तर भगवान महावीर होतात. क्षमारुपी दागिना परिधान केला म्हणजे आपल्यातून क्रोध निघून जाऊ शकतो. क्रोध न करण्याचा प्रत्येकाने संकल्प करावा असे आवाहन प.पू. नीलेशप्रभाजी म.सा यांनी आजच्या प्रवचनातून आवाहन केले.
(शब्दांकन – किशोर कुलकर्णी, मो. 94227 76759 )














