


नाशिक- शांतारामभाऊ दुनबळे
नाशिक-: करोना कालावधीपासून बंद असलेली सिन्नर ते कसबे सुकेणेमार्गे चांदवड एस.टी सेवा तब्बल सहा वर्षानंतर पूर्ववत सुरू झाली आहे.
पूर्वीप्रमाणेच या एस.टी ची सिन्नरहून निघण्याची वेळ सकाळी ८.३० असून कसबे सुकेणे येथे ही लालपरी ९.३० वाजता येवून चांदवडला ती १०.३० पर्यंत पोहोचेल. पुन्हा चांदवडहून दुपारी १.३० वाजता निघून कसबे सुकेणेत दुपारी २.३० वाजता पोहोचून सिन्नर येथे ३.३० वाजता पोहोचण्याचे नियोजन एस.टी महामंडळाकडून करण्यात आले आहे. ही एस.टी सिन्नर, नायगाव, सायखेडा, चांदोरी, मौजे सुकेणे, कसबे सुकेणे, निसाका, कुंदेवाडी, सारोळे, खडक माळेगाव या मार्गे चांदवडला पोहोचेल. पुन्हा याच मार्गे परतीच्या प्रवासाने सिन्नरला पोहोचेल. या लाल परीमुळे प्रवाशांची मोठी सोय
झाली आहे. चांदोरीमार्गे येण्यासाठी यापूर्वी कोणतीही एस.टी नव्हती. तसेच कसबे सुकेणे ते निसाकामार्गे जाणारी एस. टी. देखील नसल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत होते. आता मात्र ही एस. टी. नियमित सुरू झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. तसेच एस.टी महामंडळाला देखील उत्पन्नाचा एक स्त्रोत उपलब्ध होणार आहे. या एस.टी बरोबरच कोरोना काळापूर्वी गिरणारे, ओझर, कसबे सुकेणे, निफाडमार्गे नांदगाव एस.टी सेवा देखील सुरू होती. मात्र ही एस.टी सुरू करावी अशी मागणी केली जात आहे.
लालपरी एस.टी सेवेतून महिलांना ५० टक्के तिकीट दरात सवलत मिळते. त्यामुळे महिलांची मोठी सोय होते. आता एस. टी महामंडळाने सिन्नर ते चांदवड प्रमाणेच गिरणारे ते नांदगाव एस.टी सेवा सुरू करणे गरजेचे आहे.
अशी मागणी परीसरातील नागरिक यांनी केली आहे.
आता करोना उलटून पाच वर्षे होऊन गेले असले तरी अद्यापही ही एस. टी. सेवा सुरू झालेली नाही. नाशिककडे व लासलगावमार्गे नांदगावकडे ये-जा करण्यासाठी ही एस.टी सेवा गरजेची आहे. प्रवाशांसह विद्यार्थी व चाकरमानी वर्गासाठी या एस. टी. ची गरज असल्याने पूर्वीप्रमाणेच एस.टी. महामंडळाने या लालपरीची सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी प्रवासी संघटना व प्रवाशांनी केली.














