


आपण समाजात घडणाऱ्या घटनांना कसे पाहतो? वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये जीवनात घडणाऱ्या घटनांना आपण कसे पाहतो?
जेव्हा घटना आपल्या सोबत घडते तेव्हाच आपण जागे होतो. पण ती घटना आपल्या सोबत घडू नये यासाठी सजग राहणे आवश्यक आहे. जसे आत्ताचे उदाहरण घ्या… देशभरात NEET पेपर लीक ची घटना घडली त्यात लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य दावणीवर आहे. यात अधिक्तांश विद्यार्थी हे मध्यम वर्गातून येणारे आहेत. हा तोच मध्यमवर्ग आहे जो राजनीती पासून दूर राहतो.
1990 पासून विकसनशील देशात एक नवीन आणि वेगाने वाढणारा वर्ग उदयास आला. जो परदेशातील संकल्पनांनी प्रेरित होतो. भौतिक सुरक्षा, चांगल्या संधींचा आनंद घेणे ही या मध्यमवर्गाची विचारसरणी आहे. त्यामुळे “जे घडतंय ते आपल्यापर्यंत नाही ना आलंय” या मानसिकतेने ग्रासलेला हा वर्ग कधीही बदलाची सुरुवात स्वतःपासून करत नाही.
स्वातंत्र्याची ७७ वर्षे होऊन ही आणि भारतीय संविधानाला ७४ वर्षे उलटून गेल्यानंतरही आपल्या देशाची वर्णवादाच्या विळख्यातून सुटका नाही झाली. आपण कितीही म्हटलं की, आता कुठे आहे वर्णवाद ? तरीही वर्णव्यवस्थेचा डाग जाता नाही जात. आत्मकेंद्रीत वर्चस्वाच्या विकारातून वाढलेली शोषण प्रणाली म्हणजे वर्णवाद! खरंतर वर्णवाद ही भारताची संस्कृती नाही तर विकृती आहे ! जी आजही भारताला जातीपातींच्या गटात विभागून संविधानाला पोखरत आहे. या वर्णव्यवस्थेत “महिला” मग ती कोणत्याही वर्णातील असो ती वंचितच असते. म्हणूनच सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी 1948 मध्ये पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. जेणेकरून महिला समाजातल्या प्रत्येक स्तरावर समता आणि समानतेने माणूस म्हणून जगतील. आजच्या उच्चशिक्षित महिला वटपौर्णिमा व्रत करतात.
सर्व व्रतवैकल्ये, निरंकार उपवास, अनेक पाखंडी बाबांची, ढोंगीसाधूंची ‘सेवा’ करण्यातच कितीतरी स्त्रिया पार बुडून गेल्या आहेत. त्यांचे हक्क अधिकार विसरून गुलामगिरीत त्या जगत आहेत.
ज्या सावित्रीबाई फुलेंनी रूढी परंपरांतून महिलेला उन्मुक्त केले त्याच फुलेवाड्यात वटसावित्री साजरी करण्यात आली, ही शोकांतिका आहे !
शिक्षणाने व्यक्तीमध्ये विद्रोहाची ठिणगी पेटते परंतु आता तर शिक्षणालाच विकत घेण्याची मानसिकता निर्माण झाली आहे आणि या मानसिकतेने व्यवस्थेला वाळवी प्रमाणे पोकळ केले आहे. तुम्हाला हवे ते विकत घ्या, मग ते मत असो, मंत्री असो, खासदार असो, सरकार असो किंवा परीक्षेचे पेपर !
जागतिकीकरण, खरेदी-विक्रीची मानसिकता “निर्माण” करत नाही, ज्ञान संपादन किंवा सृजन करत नाही. माणसं असोत वा पर्यावरण, त्यांचा विनाश करते. पर्याय काय आहे? हा भ्रम निर्माण करून, प्राणघातकाला निवडते. हा अल्पकालीन तात्कालिक विकास म्हणजे दीर्घकालीन विनाश होय.
कोणतेही प्रसार माध्यम त्याचे आकलन आपल्याला दाखवणार नाही. तुमच्या घरात, कुटुंबात आणि समाजात घडणाऱ्या घटनांच्या प्रत्यक्ष अनुभवावरून तुम्हाला याचे मूल्यमापन करावे लागेल.
आपल्याकडे शुद्ध पाणी, हवा आणि अन्न आहे का ? वेळेवर पाऊस नाही, पूर, दुष्काळ आणि आग! आपल्याकडे नोकऱ्या आहेत का ?
या मुद्यांवरून तुमची परिस्थिती समजून तुम्ही सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्या.
विवेक जागवून सांस्कृतिक,सामाजिक और राजनैतिक मुक्ती साठी उत्प्रेरित करणारे “थिएटर ऑफ रेलेवंस” नाटय सिद्धांताचे नाटक “गोधडी,लोक-शास्त्र सावित्री आणि राजगति!”
रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित:-
• जनतेचा राजनैतिक विवेक जागवणारे नाटक – राजगती
• धर्मांधतेतून बाहेर काढणारे / वर्ण व्यवस्थेतून मुक्त करणारे नाटक – गोधडी… आपली संस्कृती
• समतावादी दृष्टी देणारे, पितृसत्ताक गुलामीतून मुक्त करणारे नाटक – लोक – शास्त्र सावित्री
रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित या नाटकांचे प्रयोग आम्ही देशभरात प्रस्तुत करणार आहोत.
‘आम्ही भारताचे लोक’ म्हणजे संविधानानुसार देशाचे मालक आहोत. आपले मूलभूत हक्क आणि आपल्या मताची ताकद सर्वशक्तिमान आहे. याचमुळे निवडणुकीच्या वेळी प्रत्येक नेता आपल्याला सलाम करतो. पण तो जनतेला निवडणुकीच्या वेळीच विचारतो! आता फसवणुकीपासून स्वतःला वेगळे करून सत्य पाहण्याची जबाबदारी जनतेची आहे.
राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक सत्य जाणून घेऊया आणि सत्यमेव जयतेचा झेंडा फडकवूया!














