Home अमरावती आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू

आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू

26

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आणि आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या ६२ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ॥ त्यांचा जन्म सन -१८८९ सालातील नोव्हेंबर महिन्याच्या १४ तारखेला उत्तर प्रदेशातील अलाहाबाद ( प्रयागराज) येथे झाला.आई स्वरूपराणी आणि वडील मोतीलाल यांच्या सुसंस्कारातून ते घडले.त्यांचे प्राथमिक शिक्षण अलाहाबाद येथे तर उच्च शिक्षण इंग्लंड येथे झालेत्यांनी हॅरो स्कूल आणि केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले.इंग्लंडमध्ये त्यांनी कायद्याची (बॅरिस्टर) पदवी संपादन करून सन -१९१२ मध्ये ते मायभूमीत आले.

         मातृभूमित परतल्यानंतर त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात काही काळ वकिली केली.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांनी ते खूप प्रभावित झाले म्हणूनच त्यांनी वकिली सोडून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले.सन – १९२० च्या असहकार आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला तेव्हा त्यांना पहिल्यांदा तुरुंगवास झाला होता. स्वातंत्र्य चळवळीच्या दरम्यान त्यांना नऊ वेळा ९ वर्षे तुरुंगवास भोगावा लागला.१९२९ च्या ऐतिहासिक लाहोर अधिवेशनात त्यांची काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड झाली.याच अधिवेशनात त्यांनी ‘पूर्ण स्वराज्या’चा ठराव मांडला आणि तिरंगा फडकविला.१९३० च्या सविनय कायदेभंग आणि १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

​ तुरुंगात असताना त्यांनी विपुल लेखन केले,जे जागतिक साहित्यात अजरामर ठरले.त्यांनी लिहिलेले ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’

 (भारताचा शोध) आणि ‘ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी’ हे ग्रंथ अत्यंत प्रसिद्ध आहेत.

 त्यांनी तुरुंगातून मुलगी इंदिरा गांधी यांना लिहिलेली पत्रे पुढे ‘letters from a Father to his Daughter’ या नावाने प्रसिद्ध झाली.ते एक थोर विचारवंत, इतिहासकार आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुत्सद्दी नेते होते.

      १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.त्यांनी सलग १७ वर्षे (१९६४ पर्यंत) भारताचे पंतप्रधानपद भूषविले,जो एक विक्रम आहे.त्यांनी भारतात लोकशाहीची पाळेमुळे घट्ट केली आणि धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार केला.देशाच्या आर्थिक विकासासाठी त्यांनी ‘पंचवार्षिक योजना’ सुरू केल्या आणि मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. भाक्रा-नांगल सारखी मोठी धरणे, आयआयटी (IIT), आणि एम्स (AIIMS) सारख्या संस्थांच्या उभारणीचे श्रेय त्यांनाच जाते.त्यांनी आधुनिक उद्योगांना आणि संस्थांना ‘आधुनिक भारताची मंदिरे’ म्हटले होते.आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी’अलिप्ततावादी चळवळ’ (Non-Aligned Movement) उभी करण्यात मोठी भूमिका बजावली. जागतिक शांततेसाठी त्यांनी ‘पंचशील तत्त्वे’ मांडली, ज्याचा मुख्य उद्देश शांततापूर्ण सहअस्तित्व हा होता.

         पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुलांबद्दल खूप प्रेम आणि जिव्हाळा होता.

मुले त्यांना प्रेमाने ‘चाचा नेहरू’ म्हणून हाक मारत असत. त्यामुळेच त्यांचा जन्मदिवस १४ नोव्हेंबर हा संपूर्ण भारतात ‘बालदिन’ म्हणून साजरा केला जातो. देशाप्रती असलेल्या त्यांच्या अफाट योगदानासाठी १९५५ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दि.२७ मे १९६४ रोजी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू पंचतत्त्वात झाले.त्यांच्या ६२ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ॥ 

चाचा नेहरूंना । आज स्मृतिदिनी ।

वंदन करांनी । कोटी कोटी ॥

✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले(अमरावती)मो:-८०८७७४८६०९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here