


▪️साकोलीत ३० दिवसांचा अल्टिमेट ; रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा ; निवेदन सादर
✒️किशोर बावणे(विशेष प्रतिनिधी)
साकोली(दि.26मे):-टोल नाका पासुन दहा कि.मी. अंतरावर असलेल्या सर्व गावांतील सर्व चारचाकी स्थानिक वाहनांना “टोल फ्री” करा अन्यथा शिवसेना कडून “फ्री स्ट्राईक” म्हणजे कोणत्याही स्तरावर जात रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू करू असा इशारा देत ३० दिवसाचा अल्टिमेट देऊन टोल व्यवस्थापक यांना शिवसेनेने ( मंगळ. २६ मे ) ला निवेदन सादर केले आहे.
पथकर नाका साकोली पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातील संपूर्ण चार चाकी वाहनांना टोलमधून पूर्णतः सूट देण्याबाबत निवेदन सादर केले आहे. यात नमूद केले आहे की, आम्ही टोल नाका साकोली पासून दहा किलोमीटर अंतराच्या परिसरातील ग्रामस्थ आहोत. आमच्या दैनंदिन कामकाजासाठी, शैक्षणिक, वैद्यकीय तसेच शेतीसंबंधित कारणांसाठी आम्हाला वारंवार या मार्गाने प्रवास करावा लागतो. सदर टोल नाक्यावरून दरवेळी ये-जा करताना स्थानिक नागरिकांच्या चार चाकी वाहनांकडून टोल आकारला जात असल्यामुळे आर्थिक भार वाढत आहे.
केंद्र शासनाच्या नियमांनुसार टोल नाक्याच्या दहा किलोमीटर परिसरातील स्थानिक रहिवाश्यांचा खाजगी वाहनांना सूट देण्याची तरतूद आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे टोल नाका साकोली पासून दहा किलोमीटर अंतरातील गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या खाजगी चार चाकी वाहनांना टोलमधून पूर्णतः सूट देण्यात यावी. यासाठी आवश्यक ती कार्यवाही करून स्थानिक जनतेला सहकार्य करावे, करिता ३० दिवसात योग्य ती कार्यवाही करावी, व केलेल्या कार्यवाही बद्दल आम्हाला अवगत करावे अन्यथा शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू करावे लागेल असा इशारा दिला आहे.
आणि यादरम्यान नगरसेवक इंजि. पुष्कर करंजेकर यांनी राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत सर्व्हिस रोडवरील मोठ्या नाल्यांची सफाई, वाढलेल्या झाडीझुडपांची कापणी, नालींचे तुटलेल्या झाकणे नविन बदलविण्याकरीताही निवेदन दिले आहे. कारण समोर पावसाळा लक्षात घेऊन येथे जनतेसोबत कुठलाही जिवितहानीचा धोका होऊ नये यासाठी ही सुद्धा उपाययोजना तातडीने करा असे म्हटले आहे.
शिवसेना साकोली तालुका वतीने, व नगरसेवक तर्फे निवेदन देतेवेळी शिवसेना तालुकाप्रमुख राधेश्याम मुंगमोडे, शहरप्रमुख नरेंद्र वाडीभस्मे, नगरसेवक इंजि. पुष्कर करंजेकर, वि. स. प्रमुख सुरेश गजापूरे, संपर्क प्रमुख उमेद गोडसे, प्रा. वंदना पोहाणे, शिवसैनिक विनायक देशमुख, सचिन घोनमोडे, लोकेश टेंभरे, सचिन घोनमोडे, मेघराज मेश्राम, रितीक तिडके, निशांत कुडमते, प्रज्वल गभणे, तुषार जांभूळकर, सुमित धुर्वे, शुभम गभणे यांसह शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.















