Home चंद्रपूर 230 आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

230 आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

22

▪️उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोप

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.26मे):-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर यांच्यावतीने 23 एप्रिल ते 22 मे 2026 पर्यंत घेण्यात आलेल्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोप नुकताच पार पडला. बोर्डा येथील शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेत घेण्यात आलेल्या या शिबिरात 230 आदिवासी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळुंके तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा महिला बाल विकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक श्री. कांबळे, स्टेट बँकेचे उपव्यवस्थापक श्री. डेकाटे आदी उपस्थित होते. या शिबिरात विद्यार्थ्यांनी 10 प्रकारचे प्रशिक्षण घेतले. यात मातीकाम, कराटे, योगा, बांबू कला, ढोल वाद्य, आर्चरी, मेहंदी, संगीत, कीवलिंग, म्युरल आर्ट, रांगोळी, रोबोटिक्स या कलांचा समावेश होता.

समारोपीय कार्यक्रमात माती काम, बांबू कला, आर्चरी, मेहंदी, रोबोटिक्स आर्ट, रांगोळी या कलांची प्रदर्शनी भरवण्यात आली होती. तसेच कराटे, योगा, ढोल, आर्चरी, लाठीकाठी या कलांचे प्रात्यक्षिक देखील सादर करण्यात आले. 10 प्रकारच्या कलांमध्ये प्रत्येक कलेतून एक, याप्रमाणे 10 विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. तसेच संपूर्ण शिबिरामधील उत्कृष्ट पाच विद्यार्थी निवडून त्यांना स्मार्टवॉच पारितोषिक देण्यात आले.

यावेळी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म्हणाले, उन्हाळी शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख बनवण्याचे प्रयत्न केले गेले. दरवर्षी अनेक विविध प्रशिक्षणाचा समावेश करून पुढील वर्षी देखील अशाच प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला प्रकल्प कार्यालयातील सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, अधीक्षक, अधीक्षिका आदी उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here