Home लेख दुःख लपवता येत नाही….

दुःख लपवता येत नाही….

298

 

कैक तुझ्या भावना..
कैक त्याचे पिसारे
जिकडे वारा तिकडे निघणारे
उन्मळून जातात झाडे वादळात
मुळा, मुळातून निघतात…
झाकून काय ठेवावे..
भावनाही तशाच असतात….

जगात जर सर्वाधिक काय वाढते असे विचारले तर त्याचे उत्तर भावना असेल. मग त्या सुखाच्या असो की दुःखाच्या त्या सातत्याने वाढून दाटून येत आहेत. जग तर अगोदरही भावनिक होते; ते काही आताच झाले नाही. त्याला वाढवणारे चेतक तर आधीही होते ते काही आता नव्याने जन्मले नाही. पण त्यांना लपविणारे ‘मन’ हे वरखाली तेवढे होत राहिले. भावना म्हटले की सुख, दुःख, आनंद, विरह, वेदना, मजा, क्लेश, राग सर्व काही आले. पण यात आत्यंतिक टोकाचा वाटा हा ‘दुःखाचा’ असतो. भावना जर खऱ्याखुऱ्या असतील तर त्या व्यक्त व्हायला पाहिजे कारण खऱ्या अर्थाने जीवनही तेव्हाच समृद्ध होत असते. त्या लपविल्याने किंवा जबरदस्ती त्या उठून दाखविल्याने होत नाही. भावना या आपल्या मनाचा जिवंत आरसा आहे. मन जे म्हणते ते त्या सजीव करतात. यातलीच एक दुःखाची भावना आहे जी लपवतो म्हटले तरी लपवता येत नाही. बरेचजण ते लपविण्याचा प्रयत्न करतातही पण त्यात ते नाकाम होतात. लोकांपुढे कदाचित आपण ते लपवू शकेलही पण स्वतः पुढे काय? प्रश्नच आहे. पण याचे उत्तर स्वतः कडे असूनही त्याला आपण अनुत्तरित ठेवतो.
आपल्या घरातले आपल्यातून निघून जाणे यापेक्षा मोठे दुःख कुठले असू शकत नाही. ते दुःख आपल्या अश्रूतून, हंबरण्यातून व्यक्त होते. ते मोकळे केल्याने हलकेही तितकेच वाटते. ते लपविणे आणि त्याला आवरणे जमत नाही म्हणून ते आपसूकपणे घडून जाते. पण सगळ्याच दुःखाच्या बाबतीत असे घडत नाही. काही दुःखे अशी असतात ती लपविणे हा आपला नाईलाज असतो. ती दाखविणे म्हणजे शरमेची बाब होते. त्यापेक्षा आतल्या आत झरा आटावा तशी ती आटू द्यावी लागतात. पण जसे झरा एका ठिकाणी आटून दुसरीकडून मार्ग काढतो तसेच दुःखही असते. ते कुठून तरी दिसतेच. कृत्रिमपणा हा शब्द आला म्हणजे तो असतो व दिसतो म्हणून तर आला. त्यामुळे खऱ्या दुखामागचे कृत्रिम हसू व खऱ्या आनंदामागचे कृत्रिम दुःख हे दिसणारच. आता लपविणेच बघा की, काहीतरी लपविलेले कळतेय म्हणून लपविणे आले आणि ते दिसते म्हणून शोधणे. या अधिक शब्दाच्या भानगडीत पडण्याचे कारण हे की दुःख लपविता येत नाही. मग ते का लपवायचे? अर्थात लपविण्यासाठी कारणेही तितकी आहेतच. धंद्यात झालेले नुकसान हे दुःख देणारे व ते दुःख लपवायचे म्हणजे खोटी प्रतिष्ठा लोकांत टिकावी म्हणून तसे काही झालेच नाही हे सांगणे म्हणजे लपविणे. अर्थात त्यासाठी आम्ही सुखी आहोत हे दाखवावे लागेल आणि ते दाखवायचे म्हणजे सुखी माणसे जे करतात, जशी ती वागतात तेही करावेच लागेल. मग गरज नसताना व सध्या झेपावत नसताना नवीन वस्तू खरेदी करणे, ती वारंवारिता टिकवणे म्हणून विशिष्ट कालावधीनंतर विशिष्ट वस्तू खरेदी करत राहणे. फिरायला जाणे, तिथे मौज मजा करणे, वाढदिवसाचे सोहळे करणे, लोकांना गिफ्ट वाटत फिरणे हे सगळेच सुखी आहोत हे दाखविण्यासाठी करावेच लागेल. मग होणारी झळझळ मळमळपर्यंत गेली तरी पचवून घ्यायची; कारण दुःख लपवायचे आहे. हे एक लपविण्यासाठी कित्येक गोष्टी झाकाव्या लागतात. एक झाकतो म्हणले की दुसरी दुःखे उघडी होतात मग तिसरी. हे झाकणे – पांघरणे सुरूच राहते. संपूर्ण आयुष्यच कधी उघडेनागडे होते तेच कळत नाही. कशासाठी? तर झालेले नुकसान लोकांना दिसू नये म्हणूनच न! पण एवढे करूनही ज्यांना जे पहायचे ते बरोबर पाहतात. कारण भावना लपत नाहीत. त्या तुमच्या डोळ्यांत असतात अणि डोळे कधी खोटे बोलत नाहीत. कारण त्यांचे कनेक्शन थेट मेंदूशी असते आणि हा मेंदू खोटा वागू शकत नाही. कारण तो जर या लपवाछपवीच्या भानगडीत पडला तर त्याचे वागणे तो विसरून जाईल.
मग ही दुःख शोधणारी जमात, ती कशी शोधत असेल? ती पण आपल्यातलीच. त्यांच्याकडे काही वेगळे यंत्र थोडे आहे तपासायला. त्यांना ते कळते कारण ती त्या वासावर असतात, ती त्या क्षणाची वाट पाहत असतात. कारण ह्यांच्या स्वतः कडेच एवढे दुःख असते की त्यावर दुसऱ्याचे दुःखच फुंकर मारू शकते. तुमच्या चेहऱ्यावरचा एक लवलेश बदलणेही यांसाठी तुमचे दुःख तपासायला पुरेसा आहे. हजारो सकारात्मक गोष्टीतली एक नकारात्मक गोष्ट यांच्यासाठी पुरेशी आहे लपवलेले ते दुःख शोधायला. त्यामुळे जी गोष्ट आपण लपवू शकत नाही, जी गोष्ट एक न एक दिवस बाहेर येणारच आहे तिथे ती लपविण्यात कसलाच शहाणपणा नाही. कारण ज्यावेळेस लपविलेली गोष्ट कळते तेव्हा होणारे दुःख आधीच्या दुःखाला अधिक करणारे असते. म्हणून हे बोनस दुःख नको. लोकांसाठी म्हणून नाही स्वतः साठी आपण ते स्वीकारायलाच पाहिजे. लोकं आपल्यात काही क्षण असतात पण आपण आपल्यासाठी सर्वकाळ असतो. जगण्याची उमेद नेहमी येत नसते आणि एकदा गेलेली उमेद पुन्हा नाउमेद करते. त्यासाठी आलेल्या समस्येतून मार्ग काढणे हाच त्यावर एक पर्याय असू शकतो. ज्याला अंतिम करायला हरकत नसावी. विनाकारण दुःखाचे कुरूप करण्यात अर्थ नसतो. कुरूप झाले तरी ते मिटवावे तर लागतेच मग सुरुवात अगोदरच केली तर काय वाईट!
घरातल्या लोकांचे आपसात अजिबात पटत नाही. मग ही नाती आहेत म्हणून लोकांनी सांगायची म्हणून एकत्र रहायचे. काम आटोपले की सर्व आपापले उत्तर – दक्षिण मुखी. शेजारी तरी बोलतील सुख दुःखात! त्यात ही रक्ताची नाती दाखवायलाच का! मग यांच्यामागे पण एक दुःख आहे; जबरदस्ती सोबत रहायचे! पण लोकांना एकोपा दिसणे,दाखवणे याला ह्यांनी सुख समजून चूक केली. ते सुख असेलही पण दिखावा करण्यात नाही. मग हे सुख दाखवण्यासाठी आयुष्यभर वाटून वाटून दुःख पचवायचे, लपवायचे.
आई वडिलांचे मुलासोबत पटत नाही, सुनेचे सासुसोबत नाही. पण बाहेर फिरताना नाते दाखवत फिरायची. कशासाठी? आमचा परिवार भरून आहे हे दाखवण्यासाठी. सुख- दुःख हे आयुष्यातले हार- जीत आहेत. ते प्रत्येकाच्या वाट्याला येणार. पण नेमकं दुखालाचा लपवून ठेवणे म्हणजे खेळातला कामचुकारपणा नव्हे का? जणू अंपायरला विकत घेतल्यासारखे. खेळ चुरशीचा झाला तर आयुष्याला वळण येते. शेवटी रस्ता वळणाचा असो की सरळ पार तर करावाचा लागतो.

मी तसा नव्हे
नाही तसा
लपवत बसलो आयुष्यभर
सरत नव्हते कष्ट
मीच सरलो सरणावर…..

लेखक – अमोल चंद्रशेखर भारती, नांदेड
मो. 8806721206

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here