Home राजकारण अमित शहांचे प्रश्न आणि उत्तरांचे वास्तव

अमित शहांचे प्रश्न आणि उत्तरांचे वास्तव

350

 

लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये भाजप दणकून प्रचार करत आहे. प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांनी तर स्वतःच्याच आधीच्या सभांचे रेकॉर्ड तोडलेत. बहुतांश ठिकाणी तर दोघांनीही उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरच अधिक हल्ले केलेत. याचे कारणही तसेच आहे. उद्धव ठाकरेंनी एका सभेत, “आमचं हिंदुत्व शेंडी-जानव्याचं हिंदुत्व नाही,” हे बोललेलं वाक्य भाजप-संघाच्या जिव्हारी लागलं आहे. कारण भाजप संघाचं हिंदुत्व हे शेंडी-जानव्याचं हिंदुत्व आहे आणि उद्धव ठाकरेंनी आता छत्रपती शिवरायांच्या सर्वसमावेशक हिंदुत्वाच्या मार्गाने वाटचाल सुरु केली आहे, जी भाजप-संघाला अजिबात परवडणारी नाही.
गृहमंत्री अमित शाह धुळ्यातील प्रचार सभेत म्हणतात “उद्धव ठाकरे यांनी सांगावं की, राम मंदिराच्या उदघाटनाला का आला नाहीत? अध्योध्येत प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला, त्यावेळी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांना आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, दोघेही या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. कारण त्यांना मुस्लीम मते आपल्यापासून दूर जातील, अशी भिती होती.” पहिली गोष्ट म्हणजे राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम म्हणजे पूर्णपणे भाजपचा इव्हेन्ट होता. शंकराचार्यांनी अर्धवट बांधकाम असलेल्या गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा होऊ शकत नाही आणि हिंदू धर्मानुसार पौष महिन्यात शुभ कार्य करता येत नाहीत म्हणून सोहळयाला विरोध केला होता. स्वतः शंकराचार्यही कार्यक्रमाला आले नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे शिवसेनेने प्राणप्रतिष्ठेच्या दोन वर्षा आधीच म्हणजे २७ जुलै २०२० रोजीच तब्बल १ कोटी रुपये देणगी राम जन्मभूमी ट्रस्ट च्या खात्यात (आरटीजीएस द्वारे) जमा केली होती आणि त्याचा कुठलाही गाजावाजा केला नाही. कारण धर्म हा दाखविण्याचा नाही तर आचरणात आणण्याचा विषय आहे. तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे याच कार्यक्रमाला स्वतः गृहमंत्री अमित शाह हजर नव्हते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर नव्हते, देवेंद्र फडणवीस हजर नव्हते, अजित पवार हजर नव्हते यांच्याबद्दल कोण बोलणार? जर हजर नसणाऱ्यांना राम हिसका दाखवतील तर शहा, शिंदे, फडणवीस, पवार यांना आणि भाजपच्या हजर नसलेल्या अनेक मोठ्या नेत्यांना कोण हिसका दाखवणार आहे? हेसुद्धा एकदा जनतेला सांगा. उद्धव ठाकरे म्हणजे, ज्यावेळी बाबरी मशिदीची जबाबदारी घेताना भाजप-संघाचे नेते शेपूट घालून बसले होते त्यावेळी स्वतः हुन जबाबदारी स्वीकारणाऱ्या एकमेव बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत हे भाजपला नव्याने सांगण्याची गरज नाही.
दुसरा मुद्दा शहा विचारतात की, “काश्मीर मधून कलम ३७० हटवले गेले ते चांगले झाले की नाही? हे ठाकरेंनी सांगावे.” कलम ३७० हटवले गेले याचे उद्धव ठाकरेंसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे, त्याचा विरोध केलेला नाही. कलम ३७० हटविले गेले याचा प्रत्येकाला आनंदच आहे, परंतु ते पूर्णपणे हटले असते आणि भारतीय जनतेसाठी हटले असते तर जनतेला अधिक आनंद झाला असता. पण कलम ३७० अजूनही भारतीय संविधानात आहे. ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. असीम सरोदे यांनी नुकतीच जाहीर सभेतून सांगितलं आहे की, “कलम ३७० (A) आणि ३७०(B) असे दोन भाग आहेत, त्यातील ३७०(B) या सरकारने काढून टाकलं आहे. हे कलम ३७०(B) म्हणजे जम्मू काश्मीर मध्ये इतर राज्यातील माणूस जाऊन विनापरवानगी जमीन विकत घेऊ शकत नव्हता तो आता घेऊ शकतो.” मग आता २०१९ पासून कोणी-कोणी जमीन विकत घेतली? तर फक्त ३ लोकांनी. त्यातील सर्वात जास्त जमीन ही गौतम अडाणी यांनी विकत घेतली. ती सुद्धा अशी जमीन जिथे जगातला ७ वा सर्वात मोठा लिथियमचा साठा आहे, ती अडानीने विकत घेतली. म्हणजेच ये देश नहीं बिकने दूंगा म्हणणाऱ्यांनी ३७० मधील फक्त ३७०(B) हटवलं, कुणासाठी? तर फक्त अडाणी साठी, जनतेसाठी नाही. हे कलम ३७०(B) हटविल्यानंतरही अनेकदा जम्मू काश्मीर मध्ये दहशदवादी हल्ले झालेत, अजूनही सुरूच आहेत. अजूनही घरात आणि कार्यालयात घुसून काश्मिरी पंडितांच्या हत्या सुरूच आहेत. अशा जनतेची फसवणूक करणाऱ्यांनी आम्हाला देशभक्ती सांगावी हे हास्यास्पद आहे.
“उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादी शी युती केली म्हणजे त्यांनी हिंदुत्व सोडलं, कसाब ला समर्थन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांच्या विचारांशी सहमत आहात काय ? आणि सत्तेचे तुष्टीकरण करणाऱ्या काँग्रेस सोबत गेले” असाही मुद्दा अमित शहांनी उपस्थित केलाय. भाजपने राष्ट्रवादी शी युती केली म्हणजे हिंदुत्व सोडले नाही, भाजपने काँग्रेसच्या अनेक भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना सोबत घेऊन सन्मानाची पदे दिली, त्यावेळी त्यांनी हिंदुत्व सोडले नाही. पण शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत युती केली म्हणजे त्यांनी हिंदुत्व सोडलं, हा अजब तर्क आहे. भाजपचे म्हणणे आहे की एक करार झाला होता, तो करार उद्धव ठाकरेंनी पाळला नाही, म्हणून युती तुटली. म्हणजे सत्ता भेटली नाही म्हणून भाजपने युती तोडली. सत्ता भेटली नाही म्हणून उद्धव ठाकरेंशी युती तोडून अजित पवारांसोबत पहाटेचा शपथविधी उरकलेला चालतोय, अजित पवारांना सोबत घ्यायला तयार आहोत पण उद्धव ठाकरेंना सत्ता भेटू देणार नाही, ही कुठली मानसिकता? उद्धव ठाकरे त्यावेळी भाजप सोबत असतांनासुद्धा उद्धव ठाकरेंबद्दल भाजपला इतका द्वेष का? मग सत्तेसाठी भाजपने युती तोडली हे का मान्य करत नाही. हिंदुत्व जर इतकंच महत्वाचं होतं तर उद्धव ठाकरे झाले असते अडीच वर्ष मुख्यमंत्री तर काय बिघडलं असतं? तुमचं हिंदुत्व वाचलं असतं ना? पण नाही, तुम्हाला हिंदुत्व नाही तर सत्ता महत्वाची आहे हे या सर्व प्रकरणावरून स्पष्ट आहे.
दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेऊन वारंवार काँग्रेस आणि शिवसेनेच्या युतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात पण शहा साहेब हे विसरतात की, आणीबाणी च्यावेळी जेव्हा संपूर्ण देश इंदिरा गांधींच्या विरोधात होता तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता. काँग्रेस पक्षाचे प्रणव मुखर्जी ज्यावेळी राष्ट्रपती पदाचे उमेदवार होते त्यावेळी शिवसेनेनेच त्यांना निवडून आणण्याकरिता पाठिंबा दिला होता. आणि महत्वाचे म्हणजे ज्या शिवसेनेने भाजपला बोटाला धरून महाराष्ट्रात मोठं केलं, त्याच शिवसेनेला जेव्हा भाजपने सत्तेसाठी दूर केलं त्यावेळी हीच काँग्रेस शिवसेनेच्या मदतीला बिनशर्त धावून आली हेसुद्धा आपण विसरता कामा नये.
राहिला प्रश्न कसाबचा तर स्वतः ऍड.उज्वल निकम यांनी स्वतः कबूल केलं आहे की, “कसाबने कधीही बिर्याणीची मागणी केली नाही आणि काँग्रेस सरकारकडूनही त्याला कधीच सेवा दिली गेली नाही. खटल्याच्या सुनावणीदरम्यान कसाबच्या बाजूने आकार घेत असलेले भावनिक वातावरण मोडून काढण्यासाठी मी हे मिथक रचले आहे,” काँग्रेसला कसाब बद्दल प्रेम असतं तर काहीही करून ते त्याला वाचवू शकले असते. (जसे आता दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आणि आतंकवाद्यांसोबत एकाच गाडीत पकडल्या गेलेल्या डीएसपी देवेंदर सिंगला या मोदी सरकारने वाचवून त्याला जमानत दिली आहे.) पण या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता या ऍड. निकमांच्या अफवेमुळे देशाभरात काँग्रेस विरोधी वातावरण निर्माण झालं होतं. काँग्रेसच्याच काळात कसाब चा खटला चालला, काँग्रेसच्याच काळात कसाबला फाशी झाली, हे वास्तव लोक विसरतात.

उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेने कोणत्या प्रकारे हिंदुत्वाचा विरोध केला हे एकदा स्पष्टपणे भाजपने सांगितले पाहिजे. भाजपला विरोध म्हणजे हिंदुत्वाला विरोध अजिबात नाही. कारण भाजपनेच हिंदूंना हातघाईस आणले आहे. या देशात ८०% जनता हिंदू आहे. १४.५% मुस्लिम आणि ५.५% इतर सर्व धर्मीय आहेत. घरघुती गॅस सिलिंडर जर १२०० रुपये झालं तर त्याचा सर्वात मोठा फटका ८०% हिंदूंना बसतोय, पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि महागाई चा सर्वात मोठा फटका या ८०% हिंदूंना बसतोय. आज बेरोजगारीने उच्चांक गाठलाय, यातही सर्वात जास्त हिंदूंचीच मुले बेरोजगार होत आहेत. हिंदूंबद्दल जाहीर गरळ ओकणाऱ्या कट्टरवादी मुस्लिम नेत्यांवर एकही धाड पडत नाही पण हिंदू नेत्यांवर इडी, सीबीआय, इन्कम टॅक्स अशा सर्व विभागांच्या धाडी पडत राहतात. वनिता फोगाट, साक्षी मलिक, मणिपूर च्या भगिनी, हाथरस ची भगिनी, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी मधील पीडित भगिनी ह्या सर्व अत्याचारग्रस्त महिला हिंदूच आहेत, गेल्या १० वर्षात फक्त महाराष्ट्रातच एकूण ८००० (आठ हजार) शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यात बहुतांश हिंदूच आहेत. फक्त या लोकसभा निवडणुकीच्या काळात म्हणजे (२०२४) च्या फक्त एप्रिल महिन्यात एकट्या मराठवाड्यात २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. इतके हाल तर हिंदूंचे मोघलांच्याही काळात नव्हते. हे हिंदूंवर कोण अत्याचार करतंय ? तर स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे मोदी सरकार करतंय. मग या हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाविरोधात कुणी बोलायचे नाही का? या हिंदूंवरील अन्याय-अत्याचाराला विरोध केला म्हणजे हिंदुत्व सोडणे असा अर्थ होत असेल तर असे षंढ हिंदुत्व कुणाला पाहिजे असेल? या महाराष्ट्रातील उदयॊगधंदे बाहेर पळवले जात आहेत, मुंबईचे महत्व कमी करण्याचे प्रयत्न होताहेत, महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकला जातोय. या कार्यामध्ये सर्वात मोठी अडचण आहेत उद्धव ठाकरे आणि शिवसेना. त्यासाठी ठाकरेंच्या मागे हे लोक हात धुवून लागलेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व समावेशक हिंदुत्व हाच खरा महाराष्ट्र धर्म आहे, आणि हा महाराष्ट्र धर्म पाळणे हाच या भाजप-संघाच्या षड्यंत्रांवरील रामबाण उपाय आहे.
*-चंद्रकांत झटाले,* अकोला
7769886666

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here