


▪️तातडीच्या मदतीची मागणी
✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.२८एप्रिल):- राजुरा तालुक्यातील मौजा तुलाना येथे शेतात लागलेल्या भीषण आगीत एका होतकरू युवा शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत विकास नीलकंठ बेले (सर्वे क्र. ५३/१(ब)) व सौ. शीला बेले (सर्वे क्र. ५२) यांच्या शेतात अचानक आग लागून शेतीसह विविध साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच नगर परिषद सभापती अनंता ताजने यांनी घटनास्थळी नगर परिषद, राजुरा येथील अग्निशमन दलाचे पाण्याचे बंब तात्काळ पाठवले व घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या आगीत पीव्हीसी पाण्याच्या पाइपलाइन, ठिबक सिंचनाचा संपूर्ण संच, कॉलम पाइप, सोलर मोटर व त्याचा संच, विद्युत तारा, कूलर, पंखा, सीसीटीव्ही कॅमेरे, इलेक्ट्रिक डीपी, पाण्याचे ड्रम व बकेट, जनावरांचा गोठा, कोंबड्यांचे पिंजरे यांसह शेतीतील पांढरे व लाल चंदन, जांभूळ, सीताफळ यांसारखी झाडेही जळून खाक झाली. या दुर्घटनेत अंदाजे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. नाविन्यपूर्ण शेती व पशुपालनाच्या माध्यमातून विविध शेतीपूरक व्यवसाय उभा करणाऱ्या या युवा शेतकऱ्यावर अचानक आलेल्या या संकटामुळे ते हवालदिल झाले असून तात्काळ पंचनामा करून शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
दरम्यान, टेंबुरवाही ग्रामपंचायतीचे सरपंच रामकृष्ण मडावी, पटवारी पठाण तसेच पोलीस पाटील शुभांगी आत्राम व गावकऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांना धीर दिला.
——————————————–
मान्सूनपूर्वी शेत पेरणी करीता तयार करण्याची लगबग सुरू आहे. अश्यातच शेतातील काश्या, काळी कचरा एकत्रित करून जाळला जातो. परंतु अशी आग लावल्याने हवा आल्यास ती आग वेगाने पसरते. तसेच बऱ्याच शेतकऱ्यांचे तनिस, कडबा, कुटार , जनावरांचा चारा व शेतीउपयोगी साहित्य हे शेतात ठेवले असतात. त्यामुळे या घटनेनंतर शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, आपल्या शेतात काही काळीकचरा जाळत असताना तिथेच उभे राहून आगीकडे लक्ष ठेवावे . आपली स्वच्छता एखाद्याच्या जीवन मरणावर उठू नये याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी.














