Home नागपूर दीक्षाभूमीच्या विकासात शासनाचे षडयंत्र, बसपा राज्यभर धरणे निदर्शने करणार : बसपा महाराष्ट्र...

दीक्षाभूमीच्या विकासात शासनाचे षडयंत्र, बसपा राज्यभर धरणे निदर्शने करणार : बसपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एड सुनील डोंगरे 

71

✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नागपूर(दि.13मार्च):-आंतरराष्ट्रीय दर्जाची व पर्यटनाचा अ दर्जा असलेली मानवतावादी दीक्षाभूमी सिंगापूरच्या धरतीवर विकसित करण्याचे स्वप्न शासनाने बघितले आहे. परंतु दीक्षाभूमी चा विकास जागेअभावी शक्य नसल्याने दीक्षाभूमीला लागून असलेली महाराष्ट्र शासनाच्या मालकीची कॉटन रिसर्च सेंटर व आरोग्य विभागाला लिजवर दिलेली पडीत व अनुपयोगी जागा 15 दिवसात दीक्षाभूमी स्मारक समितीच्या स्वाधीन करावी अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एड सुनील डोंगरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल व वनविभाग मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना एका पत्र परिषदेद्वारे केली आहे. 

 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा दिलेल्या दीक्षाभूमी वरील स्मारकाचे विस्तारीकरण, सौंदर्यीकरण व विकासाकरिता महाराष्ट्र शासनाने विनाविलंब जागा देण्यास टाळाटाळ केल्यास शासनाच्या विरोधात राज्यभर धरणे निदर्शने करण्यात येतील असे रवी भवन नागपूर येथे झालेल्या पत्र परिषदेत बसपा नेते एडवोकेट सुनील डोंगरे यांनी इशारा दिला.

     महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, दीक्षाभूमी स्मारक समिती यांच्या माध्यमातून दीक्षाभूमी चा विकास करण्याचे निश्चित केले आहे. यापूर्वी या संस्थांच्या वतीने दीक्षाभूमी विकासाचा प्रकल्प तयार करण्यात आला होता. या प्रकल्पातील अंडरग्राउंड पार्किंगला जनतेकडून विरोध झाल्याने हा प्रकल्प बंद पडला. शासनाने समाजाच्या व पक्षाच्या रेट्यामुळे पुन्हा नव्याने प्रकल्प हाती घेतला आहे. 

वास्तविक दीक्षाभूमीचे उत्तरेकडील चौथे प्रवेशद्वार उघडायला आजही जागा नाही. प्रकल्पाच्या नकाशात तो भाग तिसऱ्या टप्प्यात घेण्यात आला होता. परंतु यापूर्वीच्या नकाशात अर्धवट दाखवण्यात आला होता. जोपर्यंत मौजा लेंड्रा नगर भूमापन क्रमांक 1266 आराजी 122196.44 चौरस मीटर (कॉटन रिसर्च सेंटर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ च्या कब्जात आहे) ही जागा स्मारक समितीच्या सुपूर्त केल्या जात नाही तोपर्यंत सिंगापूरच्या धरतीवर त्याला विकसित करण्याचे स्वप्न पूर्ण कसे होणार? या प्रकल्पाला विरोध म्हणून की काय शासकीय स्तरावर या दारावर अनधिकृतपणे बहुमजली बांधकाम सुरू आहे.

दीक्षाभूमी स्मारकाच्या पूर्वेकडील दिशेची जमीन मौजा लेंड्रा, नगर भूमापन क्रमांक 1260 ते 1264 ही महाराष्ट्र शासनाने ज्या उद्देशासाठी हेल्थ विभागाला लीजवर दिली होती ती पडीत आहे. येथे सुद्धा दीक्षाभूमीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अनधिकृतपणे भव्य बांधकाम सुरू आहे. 

शासनाने या दोन्ही जागा स्मारक समितीला देऊन सुरू असलेले अनधिकृत बांधकाम थांबावे व सिंगापूरच्या धरतीवर दीक्षाभूमी स्मारकाचा विकास जसे बुद्धिस्ट सेमिनरी, यात्री निवास, वाहनतळ, भिक्खु निवास, लायब्ररी, कॅन्टीन, पुस्तकालय आदि बाबी कराव्या. शासनाने शिर्डी, शेगाव, पंढरपूर, कोराडी आदि स्थळांचा विकास शेकडो एकर जमीन व करोडो रुपये देऊन केलेला आहे. त्याच धर्तीवर दीक्षाभूमी चा सुद्धा विकास करावा अशी मागणी बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश चे अध्यक्ष एडवोकेट सुनील डोंगरे यांनी पत्र परिषदेत केली आहे.

यावेळी पत्र परिषदेला बसपाचे प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, प्रदेश महासचिव मोहन राईकवार, मंगेश ठाकरे, नागोराव जयकर, संजय थुल, राजकुमार बोरकर, योगेश लांजेवार, विवेक हाडके, चंद्रशेखर कांबळे, जितेंद्र घोडेस्वार, नरेश गायकवाड, भैय्याजी खैरकर, अभिलेश वाहने, प्रफुल मानके, उमेश मेश्राम, शितल नाईक, अनिकेत कुत्तरमारे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here