Home महाराष्ट्र सामाजिक कार्यकर्त्या सौ.मंजू ताई दर्डा यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय दामिनी पुरस्कार’ जाहीर

सामाजिक कार्यकर्त्या सौ.मंजू ताई दर्डा यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय दामिनी पुरस्कार’ जाहीर

350

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.10मार्च):-शहरातील नवा मोंढा परिसरातील भोलारामजी कांकरिया ट्रस्टच्या सचिव तथा प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या सौ.मंजू ताई दर्डा यांना नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय दामिनी पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. समाजसेवा,महिला सशक्तीकरण आणि आरोग्य जनजागृतीच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय आणि निःस्वार्थ कार्याची दखल घेत हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दि. १५ मार्च रोजी नाशिक येथे आयोजित भव्य समारंभात मान्यवरांच्या हस्ते सौ.मंजू ताई दर्डा यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

सौ.मंजू ताई दर्डा या अनेक वर्षांपासून समाजातील गरजू,वंचित,दिव्यांग आणि दुर्बल घटकांच्या सेवेसाठी सातत्याने कार्यरत आहेत.त्यांच्या पुढाकारातून विविध आरोग्य तपासणी शिबिरे,रक्तदान शिबिरे,गरजूंना वस्त्र व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप,विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण,तसेच दिव्यांगांसाठी सहाय्यक साधनांचे वितरण असे अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत.

याशिवाय महिलांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी महिला सशक्तीकरण,संस्कृती संरक्षण आणि सामाजिक मूल्ये या विषयांवर त्या सातत्याने प्रबोधनात्मक कार्य करत आहेत.त्यांच्या या सातत्यपूर्ण,निःस्वार्थ आणि समाजाभिमुख कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मोठी मदत झाली आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘राष्ट्रीय दामिनी पुरस्कार’ जाहीर करण्यात आल्याने गंगाखेड शहरासह संपूर्ण परिसरासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.

हा पुरस्कार जाहीर होताच शहरातील विविध राजकीय,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर,विविध सामाजिक संस्था तसेच पत्रकार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सौ.मंजू ताई दर्डा यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

त्यांच्या या सन्मानामुळे गंगाखेड परिसरातील सामाजिक कार्याला नवी प्रेरणा मिळणार असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here