Home खेलकुद  भारताने इतिहास डिफिट आणि रिपिट केला!

भारताने इतिहास डिफिट आणि रिपिट केला!

111

९ मार्च २०२६ ही तारीख भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदली गेली आहे कारण या दिवशी टी २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्युझीलंड संघावर ९६ धावांनी विजय मिळवत टी २० विश्वचषकावर तिसऱ्यांदा भारताचे नाव कोरून इतिहास रचला. या विश्व विजयासोबतच भारताने अनेक विक्रम आपल्या नावे केला. या विजयासोबत भारत तिसऱ्यांदा टी २० चा विश्व विजेता संघ तर बनलाच शिवाय सलग दुसऱ्यांदा आणि घरच्या मैदानावर टी २० विश्वचषक जिंकणारा पहिला संघही ठरला याचाच अर्थ भारताने इतिहास डिफिट आणि रिपिटही केला.

स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मी माझ्या ‘इंडिया इतिहास डिफिट करणार आणि रिपिटही करणार’ या माझ्या लेखात तसे भाकीत वर्तवले होते ते आज खरे ठरले. अर्थात यामागे कोणतेही ज्योतिष किंवा भविष्य नसून भारतीय खेळाडूंचा फॉर्म आणि गुणवत्ता पाहूनच मी तो लेख लिहिला होता. यावेळची टी २० विश्वचषक स्पर्धा भारत आणि श्रीलंका या देशात खेळली गेली. या विश्वचषक स्पर्धेत भारत सुरुवातीपासूनच भारत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार होता. काहीही करून यावेळी संघाला विश्व विजयी करायचेच अशी खूणगाठ कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी बांधली होती. टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी कोणते खेळाडू हवेत याचा पक्का विचार करून सूर्यकुमार यादवने त्याला हवे ते खेळाडू संघात घेतले. टी २० स्पर्धेत अष्टपैलू खेळाडूंचे महत्व ओळखून त्याने संघात हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल यांचा संघात समावेश केला. वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंगस्ट सुंदर यांचा समावेश संघात केला तर जगातील सर्वात घातक वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंग मोहम्मद सिराज यांचा संघात समावेश करण्यात आला होता. भारताची गोलंदाजी या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाजी ठरली. ज्या ज्या वेळी सामना भारताच्या हातातून निसटला असे वाटत होते त्या त्या वेळी गोलंदाजांनी संघाला विजय मिळवून दिला. अंतिम फेरीतही भारताच्या सर्व गोलंदाजांनी घातक गोलंदाजी केली.

जसप्रीत बुमराने संपूर्ण स्पर्धेत जशी घातक गोलंदाजी केली तशीच घातक गोलंदाजी अंतिम सामन्यात करून ४ प्रमुख फलंदाजांना बाद केले आणि न्यूझीलंडच्या फळा फलंदाजीचा कणा मोडत भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. केवळ बुमरानेच नाही तर सर्वच गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करून न्यूझीलंडच्या फलंदाजांना जेरीस आणले आणि भारताला ९६ धावांनी एकतर्फी विजय मिळवून दिला. जसप्रीत बुमराने त्याच्या घातक गोलंदाजीने अंतिम सामन्यातील सामानावीर हा किताब मिळवला. संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागलेल्या या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले. भारताने मिळालेल्या या संधीचा पुरेपूर फायदा उचलत धमाकेदार सुरुवात केली. भारताचे सलामीवीर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी भारताला धडाकेबाज सुरुवात करून विश्व विजयाचा पाया रचला. त्यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. अभिषेक शर्माने अर्धशतक झळकावले. या स्पर्धेत त्याला त्याच्या लौकिकाप्रमाणे फलंदाजी करता आली नाही मात्र अंतिम सामन्यात त्याने ती कसर भरून काढली. संजू सॅमसनसाठी तर ही स्पर्धा अविस्मरणीय ठरली. सुरवातीच्या काही सामन्यात त्याला संघाबाहेर बसावे लागले पण जेव्हा त्याला संधी मिळाली तेव्हा त्याने या संधीचे सोने केले.

वेस्ट इंडिज, इंग्लंड यांच्या विरुद्ध त्याने जशी स्फोटक फलंदाजी केली तशीच अंतिम सामन्यातही करून संघाला पुन्हा एकदा अडीचशेचा टप्पा ओलांडून दिला आणि भारताचा विजय पक्का केला. त्याने संपूर्ण स्पर्धेत तीनशेपेक्षा अधिक धावा काढत मालिकावीर हा किताब मिळवला. भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत फलंदाजी आणि गोलंदाजीत अप्रतिम कामगिरी केली . या स्पर्धेत भारताचे क्षेत्ररक्षणही अप्रतिम होते. एकूणच गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर भारताने अप्रतिम कामगिरी करीत हे विश्व विजेेतेपद मिळवले. सूर्यकुमार यादवने संघाचे कर्णधारपद अतिशय कुशलतेने सांभाळले. या विजतेपदात जितका खेळाडूंचा वाटा आहे तितकाच सपोर्ट स्टाफचाही आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर आणि त्यांच्या टीमने पडद्यामागे मोठी कामगिरी बजावली त्यामुळेच भारत पुन्हा एकदा आयसीसीच्या स्पर्धेत विजेता बनला.

भारतीय संघाचे हे विजेतेपद खास आहे कारण भारतीय संघाचे हे तिसरे टी २० चे विश्व विजेतेपद आहे. २००७ साली भारताने पाकिस्तानला हरवत पहिल्यांदा विजेतेपद मिळवले होते. तेंव्हा भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा होता . त्यानंतर २०२४ साली रोहित शर्मा कर्णधार असताना भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून दुसऱ्यांदा टी २० विश्वचषक जिंकला. त्यानंतर आता म्हणजे २०२६ साली भारतीय संघाने या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. तीनदा टी २० विश्वचषक जिंकणारा भारत हा पहिला देश आहे. त्यामुळेच भारतासाठी हे विजेतेपद ऐतिहासिक आहे. तीनदा टी २० विश्वचषक जिंकून भारताने आम्हीच टी २० चे चॅम्पियन आहोत हे जगाला दाखवून दिले. हे विजेतेपद मिळवून भारतीय संघाने क्रिकेट विश्वावर आपली मक्तेदारी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. कारण आयसीसीच्या सलग चार स्पर्धेत भारताने अंतिम फेरी गाठली त्यात भारताला तीनदा विजेतेपद मिळवण्यात यश मिळाले.

फक्त एकदाच भारताला अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला तो २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया कडून मात्र त्यानंतर मागील म्हणजे २०२४ च्या टी २० विश्वचषक स्पर्धेत भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून विश्व विजेतेपद मिळवले त्यानंतर मागीलवर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. आता हे विश्व विजेतेपद मिळवून भारताने क्रिकेट विश्वातील आपली मक्तेदारी सिद्ध करून आपणच क्रिकेट मधील सर्वोत्तम संघ आहोत हे जगाला दाखवून दिले आहे. तिसऱ्यांदा टी २० विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळवून इतिहास रचणाऱ्या भारतीय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन!

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here