Home महाराष्ट्र बालसाहित्य कलामंचच्या राज्याध्यक्षपदी आदित्य म्हमाने 

बालसाहित्य कलामंचच्या राज्याध्यक्षपदी आदित्य म्हमाने 

167

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.6फेब्रुवारी):- भारताचे सृजनशील नागरिक घडवण्यासाठी प्रगतिक विचारांना आदर्श मानून विविध क्षेत्रातील उपेक्षित, वंचित, शिक्षणबाह्य मुलांसाठी कृतीशील उपक्रम राबवणाऱ्या व खास ग्रामीण भागातील गरीब पालकांच्या मुलामुलींना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रबोधन करणाऱ्या बालसाहित्य कलामंचच्या राज्याध्यक्षपदी कोल्हापुरातील राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूलचा विद्यार्थी बाल कलाकार व बाल लेखक आदित्य म्हमाने याची मुंबईत झालेल्या राज्य अधिवेशनामध्ये सर्वानुमते निवड करण्यात आली. सदर बैठकीस राज्यभरातून शंभरहून अधिक बाल कलाकार, बाल लेखक, बाल कवी उपस्थित होते.

सत्यशोधक महात्मा, आम्हाला जगायचं आहे! या दोन महत्त्वपूर्ण पुस्तकाचे आदित्य म्हमाने याने लेखन केले आहे.

मुजरा, बुद्धा, अंतरंग, सरस्वती का सावित्रीमाई?, गांधी मरत नसतो, सत्यशोधक महात्मा, आरक्षण… दुसरी बाजू!, तिला फुलू द्या!, स्केटिंग आधी लघुपटात महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या असून सर्वोत्कृष्ट बालकलाकार राष्ट्रीय पुरस्कार (मुंबई), प्रशीक राष्ट्रीय बाल सन्मान पुरस्कार (कोल्हापूर), बालरंगभूमी परिषद (मुंबई) यांचा प्रशंसनीय पुरस्कार यासह दहाहून अधिक मानाचे व सन्मानाचे पुरस्कार त्याला मिळाले आहेत.

राज्य अधिवेशनामध्ये बालसाहित्य कलामंचची श्रावस्ती तामगागाडगे (मुंबई), राहुल पाटील (लातूर), श्रीजा पाटील (नागपूर), सिद्धार्थ सूर्यवंशी (पुणे) यांच्यासह पंधरा जणांची कार्यकारिणी निवडण्यात आली असून कोल्हापुरातून अमिरत्न मिणचेकर व दिक्षा तरटे यांचा यात समावेश करण्यात आला आहे.

बालसाहित्य कलामंचच्या राज्याध्यक्ष पदाचा कोल्हापूरला प्रथमच मान मिळाला असून आदित्य म्हमाने याची राज्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here