


✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अमरावती(दि.6फेब्रुवारी):-महाबोधी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने,पिता रामजी सुभेदार यांच्या स्मृती दिनानिमित्त, ३४व्या धम्म परिषदेचे आयोजन, राजर्षी शाहू महाराज मैदान, वटफळी_वटफळा येथे २ ते ३फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते.
या दोन दिवसीय धम्म परिषदेत,धम्म प्रबोधन,सांस्कृतिक कार्यक्रमासह इत्यादी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडत असतांना, या कार्यक्रमात भरीस भर घातली ती परिवर्तनवादी कवी संमेलनाने.३फेब्रुवारी रोजी समारोपीय सत्रात प्रख्यात कवी, गझलकार विनय मिरासे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कवी संमेलनात कवी प्रा. हर्षवर्धन तायडे यांनी ,”दंगल झाली अन् बेकसुर लोक मारली गेलीत बोगस संस्कृतीसाठी…अहिंसेचा शांतीमार्च घेऊन निघालेले माणसाचे काफिले कुठे गेलेत,कदाचित ते ही सामील झाले असतील आपल्या धर्मासाठी…”अशी प्रश्न उपस्थित करणारी कविता सादर केली.हाच धागा पकडत विद्रोही अविनाश गोंडाणे यांनी,”मी निडर आहे,कारण मी आता स्वतःला इतरांच्या सावलीमध्ये शोधणं बंद केलंय
मी तोच आहे जो स्वतःच्या विचारावर ठाम उभा राहतो.” अशी स्वयंदीप कविता सादर केली.
शब्दास्त्र प्रमुख प्रवीण कांबळे यांनी,चळवळीचे होत असलेले रान बघता , एकतेची हाक देणारी गझल सादर केली.हाच विचार कवी पद्माकर मांडवधरे यांनी “शिकवण माझ्या बाबाची,विसरू नका रे कोणी दाखवा एकीची शक्ती, शोभेल निळ्या ध्वजानी राजधानी अशी आशावादी कविता सादर करून संघटनेचे महत्व विषद केले. कवयित्री स्नेहल सोनटक्के यांच्या ,”माणूस पंक्चर झाला तरी, किडा काही मरत नाही
नको तिथं खूटी टाकायची वळवळ,काही केल्या सरत नाही”अशी चिंतनशील कविता सादर केली तर कवयित्री सुनीता मेश्राम,प्रशिक ढोणे,पद्मा घरडे, पुंजाजी ठवरे, गोवर्धन रामटेके,कांताबाई सोनोने या कवींनी आशयपूर्ण कविता सादर केल्या.कवी संमेलनाध्यक्ष विनय मिरासे यांच्या,”निस्तेजांच्या,तेज आंतवर,भरण्यासाठी बुद्ध
अन्,तृष्णेचे थेंब विषारी, झरण्यासाठी बुद्ध”,अशी जगाला तारणाऱ्या बुद्धाला अधोरेखित कविता सादर करीत कवी संमेलनाची सांगता झाली.भूमिका प्रा.हर्षवर्धन तायडे यांनी विषद केली .कवी संमेलनाचे संचालन प्रख्यात कवयित्री स्नेहल सोनटक्के यांनी केले तर आभार हर्षवर्धन तायडे यांनी मानले.कवी संमेलनाला श्रोत्यांसह बुद्धिजीवी वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.














