


शिक्षण म्हणजेच गुणवत्ता वृद्धी. शैक्षणिक गुणवत्तेची व्याख्या आणि मोजमाप करणे, हे तसे अवघड व गुंतागुंतीचे काम. जगात शिक्षणाच्या इतिहासात शिक्षण गुणवत्तापूर्ण असायाल हवे असा विचार सातत्याने मांडण्यात येतो. शिक्षणाच्या इतिहासाची पाने चाळली तर शिक्षण गुणवत्तापूर्ण होते असे फारसे दिसत नाही. खरं तर गुणवत्ता म्हणजे नेमके काय? हे व्याख्येत बांधण्याचा प्रयत्न आजवर अनेकांनी केला आहे. मात्र, त्या व्य़ाख्येत अपेक्षांची भिन्नता दिसून येते. शिक्षणाच्या प्रक्रियेत आपण गुणवत्तेचा जो विचार करतो आहोत आणि त्यात गुणवत्तेची जी कल्पना आहे ती व्यक्ती सापेक्ष संकल्पना आहे. समाज जसा जसा गतीमान होत जातो त्याप्रमाणे शिक्षणाकडून देखील अपेक्षा सतत बदलत जात आहेत. जगभरात होणारी संशोधने, औद्योगिक विकास, समाजात रूजणारे विज्ञान, बदलणारी राजकीय विचारधारा यानुसारही शिक्षणाकडून अपेक्षा बदलत जातात
वर्तमानातील अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न शिक्षणाकडून होण्याची गरज असते. मात्र, त्या अपेक्षा शिक्षणातून साध्य होतील असे घडत नाही. वर्तमानातील अपेक्षा शिक्षणाकडून पूर्ण झाल्या नाही तर शिक्षण गुणवत्तापूर्ण नाही असे मानले जाते. त्यामुळे शिक्षण गुणवत्तापूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न व्यवस्थेत सातत्याने होत असतात. प्रयत्न जसे होत जातात त्याप्रमाणे अपेक्षा पुन्हा उंचावत जातात हेही वास्तव आहे. शिक्षणातून अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी काळ लागत असतो. त्यामुळे वर्तमानातील अपेक्ष पूर्ण करण्यासाठी भविष्यात वाट चालावी लागते. वाट जशी चालत जातो त्याप्रमाणे अपेक्षा पुन्हा पुन्हा उंचावत जातात. त्यामुळे शिक्षणात अपेक्षां पूर्णत्वाला जाण्याची शक्यता कधीच नसते.
आज ब-याच शाळा ओसाड पडत आहे. कारण तिथे शिक्षकांचा तुटवडा पडत आहे. कुठे ७ वर्गासाठी १ किंवा २ तर कुठे ५ वर्गासाठी १ च शिक्षक आहे. त्यामुळे शिक्षणाची अपेक्षापूर्ती होत नाही. यामुळे शिक्षणाची गुणवत्ता ढासळत चालली आहे. केवळ हेच कारण नाही, तर बरेच शिक्षक आपल्या शिक्षकीपेशाला काळीमा फासणारे आहेत. ब-याच शिक्षकांच्या हालचालीवरून, व्यवहारावरून एकंदरीत त्यांच्या वर्तवणूकीवरून ते विद्यार्थ्यांचं काय भविष्य घडवतील हा प्रश्न सतत मनाला सतावतो. यातीलच एक कारण पुढे करून शिक्षक पण शिकविण्यास पात्र असावे म्हणून राज्य शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा घेणे सुरु केले आहे. विद्यार्थ्यांना घडविणारे शिक्षकवृंद पण ‘तावून सुलाखून’ निघणार असतील तर उत्तम. हा त्यामागचा हेतू शासनाने ठेवला.
उद्याची पिढी घडवणा-या राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षक पात्रतेसाठी महत्त्वाची असलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) च्या २०२५ मध्ये झालेल्या अंतिम परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. मात्र, या निकालाने राज्यातील अनेकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. हा निकाल शिक्षण क्षेत्रास चांगलाच धक्का देणारा ठरला असून राज्यातील शिक्षक गुणवत्तेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या परीक्षेत केवळ ११.२८ टक्के शिक्षक उमेदवार उत्तीर्ण झाले. ४.७५ लाख शिक्षकांपैकी ३ लाख ९६ हजार शिक्षक अनुत्तीर्ण झाले ही बाब धक्कादायक आहे. केवळ धक्कादायकच नसून भविष्यातील शिक्षक व शिक्षण यांच्या दारुण परिस्थिवर प्रकाश टाकणारी आहे. सर्वाधिक कन्नड माध्यमाचे १५ टक्के तर मराठीचे १२.२८ टक्के, हिंदीचे १२.१९ टक्के तर तेलुगू माध्यमाचे याच सरासरीच्या आसपास उमेदवार उत्तीर्ण झाले. यात उर्दू, इंग्रजी आणि विशेषत: गुजराती माध्यमाचा निकाल सर्वात कमी ३.४४ टक्के लागला.
क्षेत्र कोणतेही असो मग ते आयटीचे असो की वैद्यकीय. झपाट्याने होणा-या बदलांना सामोरे जाताना स्वत:ला कालसुसंगत राखणे हे आवाहन झाले आहे. एकदा डीएड झालो आणि शिक्षक म्हणून चिकटलो की मोकळे ही ब-याच शिक्षकांची मानसिकता…आता वर्षानुवर्ष मी कुठल्याही परीक्षेला कशाला सामोरे जायचे? या भावनेतून टीईटी परीक्षेला काही शिक्षक संघटनांचा विरोध राहिला. अन्य क्षेत्रात स्वत:ला अपडेट ठेवण्याकरिता धडपड सुरु असताना शिक्षकांनी अशी भूमिका घेणे हे योग्य नव्हेच. एआयमुळे वेगवेगळ्या क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. भविष्यात शिक्षण क्षेत्रही त्यापासून वेगळे नसेल. त्यामुळे आपल्या बुद्धीला तावूनसुलाखून पाहण्यात काहीच गैर नाही.
मात्र, ज्यांनी शिकविण्याकरिता अजून खडू हातात धरलाही नाही, अशा शिक्षकांची या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याची मोठी संख्या आहे. आता जे उत्तीर्ण झाले ते सध्या शिक्षक असून ही परीक्षा दिल्याखेरीज आपली नोकरी कायम होणार नाही, अशी टांगती तलवार मानगुटीवर कायम असल्याने ज्यांनी परीक्षा दिली तेच यात उत्तीर्ण झाल्याने निकाल ११ टक्क्यांच्या आसपास लागला. यावरून भविष्यातील शिक्षक व शिक्षण यांची अवस्था कशी भीतीदायक आहे, याचाच साक्षात्कार होतो. शिक्षक होण्याकरिता धडपडणा-यांना अपयश येण्याचे मुख्य कारण हे सध्याच्या कंत्राटी शिक्षणात आहे. अनेक युवक-युवती वेळप्रसंगी अन्य छोटी-मोठी कामे करणे पसंत करतात. मात्र, शिक्षक होण्याला तिलांजली वाहतात. अत्यल्प वेतन देऊन अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकांची पिळवणूक होते. एका रकमेवर स्वाक्षरी घ्यायची आणि अत्यल्प रक्कम हातावर टेकवायची, असे प्रकार अनेक शैक्षणिक संस्थामध्ये सर्रास होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे अन्य कुठल्याच क्षेत्रात पाय रोवता आला नाही तोच शेवटचा पर्याय म्हणून या क्षेत्राकडे वळतो, असे म्हटले तर ते अयोग्य ठरणार नाही. याच भीतीपोटी असले प्रकार सहन करण्यावाचून पर्याय नसतो.
ज्यांना निवृत्तीला केवळ ६ महिने बाकी आहेत. अशा शिक्षकांनाही ही परीक्षा सक्तीची केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे ही परीक्षा अनिवार्य केली गेली. एकीकडे अशैक्षणिक कामाच्या बोजाने शिक्षक त्रस्त आहेत. शालेय पोषण आहारातील तांदुळाचा हिशेब ठेवण्यापासून तंबाखुमुक्त अभियानाची माहिती सरकारला भरून देण्यापर्यंत जवळपास शंभरेक कामे शिक्षकांना लावली आहेत. सरकारचे अशैक्षणिक कामे शिक्षकांवर लादण्याचे धोरण असमर्थनीय आहे. यामुळे शिक्षकांचे मूळ कामाकडे दुर्लक्ष होत आहे. या कामांच्या बोजाने शिक्षक अक्षरश: वाकले आहेत. शिवाय शिक्षकांकरिता वेगवेगळे प्रशिक्षण आयोजित केले जाते. त्यामुळेही या परीक्षेला विरोध होत आहे. टीईटी परीक्षेची काठिण्य पातळी जास्त आहे. दिलेल्या ४ पर्यायातून १ पर्याय निवडायचा असतो. शिवाय निगेटिव्ह मार्किंग (नकारात्मक गुण पद्धत) आहे. त्यामुळे अनेकदा शिक्षकांचा गोंधळ उडतो. परिणामी त्यांच्या पदरात भोपळा पडतो. जसे टीईटी परीक्षेला विरोध करणा-यांचे समर्थन करता येत नाही तसेच टीईटीची सरसकट सक्ती ही देखील योग्य म्हणता येत नाही. विद्यार्थ्यांकडून गुणवत्तेची व पैकीच्या पैकी गुणांची अपेक्षा करणा-या शिक्षकांनी टीईटी परीक्षेत अधिक चमकदार कामगिरी करून आपली गुणवत्ता सिद्ध करावी ही अपेक्षा बाळगणे अचूक आहे.
✒️शब्दस्पर्शी:-सुनील शिरपुरे(कमळवेल्ली,यवतमाळ)मो:-७०५७१८५४७९














