Home नागपूर भारतीय संविधान – समतेचा पाया आणि बाबासाहेबांचा दृष्टिकोण !

भारतीय संविधान – समतेचा पाया आणि बाबासाहेबांचा दृष्टिकोण !

117

26 नोव्हेंबर हा दिवस फक्त एका पुस्तकाचा स्वीकार दिवस नाही; हा दिवस देशाच्या आत्म्याची, विचारांची आणि मूल्यांची पुनर्स्थापना करणारा दिवस आहे. भारतीय संविधान म्हणजे केवळ कायद्याचा ग्रंथ नव्हे, तर लाखो वंचितांच्या आशेचा दीपस्तंभ आहे आणि त्या दिपस्तंभाचे निर्माता होते एक व्यक्ति नव्हे तर विचारांचा महासागर भारताचे आधुनिक बुध्द, डॉ. बाबासाहेब आंबेडकर. भारतीय संविधानाची सर्वात मोठी देणगी म्हणजे समता. हजारो वर्षे भारतीय समाज वर्ण, जात, भेदभाव आणि उपेक्षेच्या खोल अंधारात अडकून पडला होता. त्या अंधारातून बाहेर पडण्याचा निर्धार करणारे आणि संपूर्ण् देशाला “कायद्यासमोर सर्व समान.” या अमर संदेशाने प्रकाशमान करणारे होते बाबासाहेब. ही ओळ वाचायला सोपी असली तरी तिच्यामागे लपलेली क्रांती भव्य होती. पहिल्यांदाच एका सामान्य माणसाला जाणवलं, “मीही कोणापेक्षा कमी नाही.”

       बाबासाहेबांसाठी समता ही केवळ राजकीय संकल्पना नव्हती तर ती त्यांच्या जगण्याचा श्वास होती. अन्याय त्यांनी पाहिला नाही, तर अनुभवला होता. अपमान ऐकला नाही, तर भोगला होता, पण संघर्ष त्यांनी सहन केला नाही तर स्वीकारला, कारण उद्दिष्ट एकच होतं शोषित, उपेक्षित, दुर्लक्षित आणि वंचित यांना मानाचा अधिकार देणे. संविधान तयार करताना त्यांनी फक्त कलमे लिहिली नाहीत; त्यांनी त्या प्रत्येक कलमात मानवतेची ज्योत रोवली. ते म्हणत, “राजकीय लोकशाही तेव्हाच टिकते, जेव्हा सामाजिक आणि आर्थिक लोकशाही तिचा पाया असतात.” या तीन स्तंभांवर उभारलेला नवा भारत म्हणजे समतेचा खरा राष्ट्रदिवस. भारतीय संविधानाचा सर्वात मोठा गुण म्हणजे त्याची मानवी संवेदनशीलता. संविधान म्हणत नाही. तुमची जात काय? संविधान विचारत नाही, तुमचा धर्म कोणता? संविधान शोधत नाही. तुमची स्थिती, पैसा, ओळख किंवा परंपरा कोणती? ते फक्त एकच प्रश्न विचारते, तुम्ही ‘मानव’ आहात का? जर उत्तर ‘होय’ असेल, तर संविधान तुम्हाला समान दर्जा, समान स्वातंत्र्य आणि समान संधी देते.

        बाबासाहेबांनी संविधानाला तीन प्रमुख दिशा दिल्या. राजकीय समता, मतदानाचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, न्यायाचा समान हक्क, ही मूल्ये प्रत्येक नागरिकाला ‘सत्ता’शी जोडतात. सामाजिक समता, जातिभेद, अस्पृश्यता, भेदभाव. या सर्वांविरुद्ध संविधानाने कठोर भूमिका घेतली, ही क्रांती होती. आर्थिक समता, शिक्षण, रोजगार, आरक्षण, संधींची दारे वंचितांना उभं राहण्यासाठी जे आवश्यक ते संविधानाने पुरवलं. ही बाबासाहेबांची समतेची त्रिसूत्री आजही भारताच्या शक्तीचा मूलाधार आहे. संविधान दिन फक्त उत्सवच नाही तर आत्मपरीक्षणाचीही हाक आहे. आज आपण संविधान दिन साजरा करतो, पण त्याचवेळी आपल्याला काही प्रश्न स्वतःला विचारावे लागतात. आपण खरोखर समतेकडे वाटचाल करतोय का?; अजूनही भेदभाव, असमानता आणि अन्याय दिसत नाहीत का?; संविधान दिलेल्या आदर्शांची आपण पायमल्ली करत नाही ना? संविधानाचा दिवस म्हणजे फक्त अभिवादन नाही, तो जागृतीचा दिवस आहे. तो सांगतो, आपण स्वातंत्र्य मिळवलं आहे पण समानता अजूनही अपूर्ण आहे. 

 बाबासाहेब सांगून गेले, “शिक्षण ही समाज परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे.” यावरच भारताचा भविष्यकाळ टिकलाय. समाजात समान स्पर्धा निर्माण करायची असेल, न्याय्य व्यवस्था उभी करायची असेल तर शिक्षण सर्वांना समान हवं आणि लोकशाही तेव्हाच मजबूत होईल जेव्हा नागरिक जागरूक, स्वतंत्र, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले आणि भेदभावाविरुद्ध उभे राहणारे असतील. संविधान आपली श्रद्धा, बाबासाहेब आपले मार्गदर्शक आहेत. संविधान दिन हा फक्त दिनविशेष नाही; तो कृतज्ञतेचा दिवस, स्मृतींचा दिवस आणि प्रेरणेचा दिवस आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाने आज एक गोष्ट आठवावी, आपण स्वातंत्र्याचे, न्यायाचे, समतेचे आणि बंधुतेचे जे स्वप्न पाहतो, ते बाबासाहेबांनी आपल्या हातांनी बांधलेल्या संविधानामुळेच शक्य झाले. भारतीय संविधान हा केवळ देशाचा कायदा नाही, तर तो भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या समान स्वप्नांचा, समान सन्मानाचा आणि समान अधिकारांचा पवित्र करार आहे आणि त्या कराराचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय लोकशाहीचे सर्वोच्च दीपस्तंभ आहेत.

 महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 18 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार, भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण असल्याने राज्यातील शाळा/महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे, शासकीय निवासी शाळा त्याचबरोबर शासन मान्यताप्राप्त अनुदानित/विनाअनुदानित/स्वयंअर्थसहाय्यित शाळा/आश्रमशाळा व वसतिगृहे, ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था तसेच महाराष्ट्र विधानपरिषद, विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय राज्यघटनेबाबत जागरुकता, घटनात्मक अधिकार व कर्तव्यांबद्दल सर्व नागरिकांमध्ये जागरुकता वाढविण्यासाठी संविधान अमृत महोत्सव 2024-25 “घर घर संविधान” हा कार्यक्रम राज्यभर वर्षभर उत्साहात राबविण्याकरिता मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. तसेच या कार्यक्रमाची सांगता करत असताना सदर कार्यक्रमातंर्गत भारतीय संविधानाविर्षयी जनजागृती करण्यासाठी तसेच उपेक्षित समुदायांमध्ये घटनात्मक अधिकार व कर्तव्यांबद्दल जागरुकता वाढविण्यासाठी संविधान अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत दि. 26 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत राज्यातील सर्व ठिकाणी विविध उपक्रम व कार्यक्रमांचे विशेष आयोजन सर्व स्तरावर करण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

 शाळा/महाविद्यालयांच्या दर्शनी भागात संविधानाची उद्देशिका लावणे, शालेय परिपाठात तसेच वसतिगृह प्रार्थनेत दररोज संविधान उद्देशिकेचे वाचन विद्यार्थ्यांकडून करवून घेणे, शालेय वाचनालयात संविधानाच्या किमान 5 प्रती विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करून देणे, भारतीय संविधान बाबत सर्वसाधारण माहिती देणे, जसे, संविधान सभा निर्मिती, निर्मिती समिती, अनुच्छेद, विशेषता, मुलभूत कर्तव्ये यावर व्याख्यानाचे आयोजन करणे, विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील प्रमुख प्रकरणे, मुलभूत हक्क आणि मुलभूत कर्तव्ये यावर मार्गदर्शन करणे, कार्यशाळांद्वारे विद्यार्थ्यांना संविधानाचे तत्वज्ञान आणि मुल्ये समजावून सांगणे, संविधान दिन कार्यक्रम आयोजित करणे ज्यात पथनाट्य आणि पोस्टर प्रदर्शन याचा समावेश असावा, संविधानावर आधारित निबंध लेखन, भाषण, वादविवाद, चित्रकला स्पर्धा ई. उपक्रमांचे आयोजन करणे, प्रजासत्ताक दिनी संविधानातील मुल्यांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम जसे देशभक्तिपर गाणी, नाटक आणि नृत्य आयोजन व सादरीकरण करणे आणि राज्यातील 36 जिल्हयांमध्ये संविधानाचे प्रबोधन होण्याकर‍िता संविधान संमेलनाचे आयोजन करण्याचे शासन निर्णयान्वये निर्देशित केले आहे.

*डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सभेतील शेवटचे चेतावणीपर भाषण.*

 संविधान कितीही चांगले असले तरी ते चालविणारे लोक जर चांगले नसतील, तर ते निष्फळ ठरेल पण एखाद्या देशाचे संविधान कितीही वाईट असेल आणि चालविणारे जर चांगले असेल तर ते संविधान देशाचा उध्दार करेल. आज दक्षिण आफ्रिकेत नेल्सन मंडेला यांनी भारताचं संविधान जशास तसं स्वीकारलं, कारण ते मानवाधिकारांचं जागतिक प्रतीक बनलं आहे. भारताच्या संविधानाधानावर जागतिक मानव अधिकार संघटन काम करते आणि भारतीय राज्यघटनेचा भाग हाच जगातील काम करणाऱ्या जागतिक मानव अधिकार आहे. आज संविधान बदलण्याची भाषा केली जाते, पण हा डाव लोकशाहीच्या आत्म्यावरचा आघात आहे आणि हा डाव हाणून पाडणे हे संविधान प्रेमींची जबाबदारी आहे! संविधान हे केवळ कायद्याचं पुस्तक नाही, तर ते भारताच्या आत्म्याचं आरशातलं प्रतिबिंब आहे. संविधान दिनी बाबासाहेबांचा संघर्ष स्मरुन गावात, देशात संविधान सुरक्षित राहील या दृष्टीने प्रयत्न करावे या महापुरुषांच्या शांतता, शैक्षणिक, सामाजिक विचारांचा प्रचार प्रसार करावा. संविधान दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

✒️प्रविण बागडे(नागपूर)मो:-9923620919

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here