Home नागपूर ज्ञानक्रांतीचा पहिला दिवस : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी प्रवेश दिन

ज्ञानक्रांतीचा पहिला दिवस : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी प्रवेश दिन

165

विद्यार्थी कसा असावा? याचं प्रतीक म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. कितीही संकटे आली, कितीही अन्याय-अत्याचार झाले तरीही आपलं चारित्र्य न गमवता जिद्द आणि चिकाटीने त्यांना तोंड देणे हे एक सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याचे लक्षण आणि त्या विद्यार्थी दशेला परिपूर्ण न्याय देतात ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. ७ नोव्हेंबर हा दिवस भारतीय समाज जीवनात, विशेषतः विद्यार्थ्यांच्या जगात एक ऐतिहासिक व प्रेरणादायी दिवस म्हणून ओळखला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी प्रवेश दिन हा केवळ एक दिवस नाही, तर ज्ञान, समानता आणि स्वाभिमानाच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल आहे. ७ नोव्हेंबर १९०० रोजी बाबासाहेबांनी साताऱ्यातील प्रतापसिंग प्राथमिक शाळेत आपला शैक्षणिक प्रवास सुरू केला. शाळेकरिता वळणारी बारक्या भिवाची ती पावलं म्हणजे साधीसुधी नव्हती तर ती एक नव्या युगाची सुरवात होती. त्यावेळी त्यांचे नांव भिवा असे होते. या शाळेच्या रजिस्टरला “१९१४” त्या क्रमांकासमोर आजही बाल भिवाची स्वाक्षरी असून हा ऐतिहासिक दस्तऐवज शाळा प्रशासनाने जपून ठेवला आहे. शाळेच्या वर्गाबाहेर बसून शिकणारा विद्यार्थी, पाण्याच्या एका घोटाला तरसलेला विद्यार्थी तर अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी हा प्रवास म्हणजे साधासुधा प्रवास नाही बरं कां ! हे टाकीचे घाव सोसल्यानंतर या विद्यार्थ्याने भारतीय संविधानाची मूळ रचना न्याय, सक्त आणि बंधुता या तत्त्वावर कां केली? याचं प्रकर्षाने जाणीव होते.

          डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन म्हणजे एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहूल म्हटली पाहिजे, कारण बाबासाहेबांचे पाऊल शाळेत पडल्यामुळेच ते स्वतः सुशिक्षित आणि प्रज्ञावंत झाले आणि करोडो दलितांचे-वंचितांचे उद्धारकर्तेही झाले. एका अशा समाजातून आलेल्या या बालकाने, जिथे शिक्षण म्हणजे केवळ वरच्या जातींचा अधिकार मानला जायचा, तिथे प्रवेश घेऊन इतिहास घडवला. त्या छोट्या कृतीतून एका नव्या युगाचा उदय झाला, ज्ञानक्रांतीचा आरंभ! हा दिवस म्हणजे त्या संघर्षमय प्रवासाच्या पहिल्या पानाचा स्मरणदिन आणि परिवर्तनाची सुरुवात. डॉ. आंबेडकरांनी त्या शाळेच्या दारातून प्रवेश घेतला आणि पुढे शिक्षणाच्या शिखरावर जाऊन संपूर्ण भारताला अंध:कारातून प्रकाशाकडे नेले. डॉ. आंबेडकरांनी जगाला एक अमूल्य मंत्र दिला “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.” त्यांच्यासाठी शिक्षण हे फक्त पदवी मिळवण्याचं साधन नव्हतं; तर ते स्वातंत्र्याचं आणि आत्मसन्मानाचं शस्त्र होतं. त्यांनी शिक्षणाला सामाजिक न्यायाचं मूलभूत साधन बनवलं. कारण समाजातली विषमता तोडायची असेल, तर ती केवळ कायद्याने नाही तर शिक्षणानेच शक्य आहे. 

          आजच्या तरुण पिढीने हे स्मरण ठेवणं आवश्यक आहे की, बाबासाहेबांसाठी शिक्षण म्हणजे केवळ करिअर नव्हे, तर चरित्रनिर्मितीचा मार्ग होता. आजच्या विद्यार्थ्यांनी “विद्यार्थी प्रवेश दिन” फक्त साजरा न करता, त्यामागचा आशय समजून घेणं गरजेचं आहे. शाळेच्या दारात पाऊल टाकणं म्हणजे केवळ शिक्षणात प्रवेश नाही, तर चेतनेच्या प्रवासाची सुरुवात आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःला विचारावे की, मी शिक्षण केवळ नोकरीसाठी घेतोय की समाजासाठी काही करणार आहे? मी ज्ञानाचा उपयोग माझ्या आणि इतरांच्या उन्नतीसाठी करतोय का? बाबासाहेबांच्या “शिकण्याच्या भुकेला” मी जिवंत ठेवतोय का? हे प्रश्नच “विद्यार्थी प्रवेश दिन” साजरा करण्यामागचं खरं तत्त्वज्ञान आहे.

          आज डिजिटल युगात माहितीच्या सागरात आपण विहार करतोय, पण ज्ञानाचा दीप हरवतोय. डॉ. आंबेडकरांचे तत्त्व आजही तेवढेच लागू आहेत. शिकणं म्हणजे प्रश्न विचारणं आणि प्रश्न विचारणं म्हणजे विचारशक्ती जिवंत ठेवणं. आज समाजात पुन्हा अन्याय, असमानता आणि अंधश्रद्धेचं वातावरण वाढत आहे. अशावेळी बाबासाहेबांचं शिक्षणतत्त्व आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांना योग्य दिशादर्शन करतात. ७ नोव्हेंबरचा दिवस आपल्याला स्मरण करून देतो की, प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात समाजबदलाची किल्ली आहे. बाबासाहेबांचा शैक्षणिक प्रवास म्हणजे प्रत्येक दीन, दलित, शोषित, उपेक्षित व्यक्तीसाठी प्रेरणेचा झरा आहे. त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकं उघडू नयेत, तर मनंही उघडावी. कारण जेव्हा मन शिक्षित होतं, तेव्हाच समाज प्रकाशमान होतो.

          बाबासाहेब शाळेत गेल्यामुळेच ज्या संविधानाचा आज सर्वात आदर्श संविधान म्हणून जगभर गौरव होतो. त्या भारतीय संविधानाचे ते शिल्पकार ही ठरले. परिणामतः भारतीय समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मानवी मूल्ये रुजू शकली, म्हणूनच बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिन ही अत्यंत महत्वाची आणि इतिहासला कूस बदलावयास लावणारी क्रांतिकारी घटना ठरली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आजीवन विद्यार्थी होते. त्यांनी आपला हा विद्या व्यासंग आयुष्याच्या शेवटपर्यंत जपला. आजचा प्रत्येक विद्यार्थी हा या देशाचे भविष्य आहे. त्यामुळे आदर्श विद्यार्थी तयार होणे काळाची गरज आहे. शिक्षण हेच एकमेव उन्नतीचे साधन आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कठोर परिश्रमाची जाण सर्व विद्यार्थांना होण्यासाठी २७ ऑक्टोबर २०१७ रोजी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने खास शासन निर्णय जारी करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिन म्हणजे ७ नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी “विद्यार्थी दिन” म्हणून राज्यभर साजरा करण्यात यावा असे निर्देशित केले आहे. तसेच या शासन निर्णयामध्ये “विद्यार्थी दिवस” या उपक्रमांतर्गत सर्व शाळांमध्ये त्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर विविध कार्यक्रम जसे निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्य वाचन इत्यादि उपक्रम आयोजित करण्याचे सूचनाही आहेत. त्यामुळे सर्वांनी खूप शिका, विचार करा आणि परिवर्तन घडवा. तुमच्या मेहनतीमुळे आणि समर्पणामुळे तुम्ही मोठे यश मिळवावे, हीच सदिच्छा. सर्वाना विद्यार्थी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

✒️प्रवीण बागडे(नागपूर)मो:-९९२३६२०९१९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here