


‘ वंदे मातरम् ‘ या गीतास दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण झाले.या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वंदे मातरम् हा जयघोष म्हणतच ज्यांनी प्राणाची आहुती दिली आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले,अशा सर्व क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन ॥
वंदे मातरम् हे भारताचे राष्ट्रीय गीत (National Song) आहे. हे गीतथोर कादंबरीकार व कवी बंकिमचंद्र चटर्जी (Bankim Chandra Chatterjee) यांनी दि.७ नोव्हेंबर १८७५ ला संस्कृतप्रचुर बंगाली भाषेत लिहिले आहे आणि त्यांच्या १८८२ मध्ये प्रकाशितझालेल्या’आनंदमठ’
(Anandamath) या कादंबरीत समाविष्ट केले आहे.
या गीताचा अर्थ ‘
आई,मी तुला नमन करतो’ किंवा ‘मातृभूमी मातेची मी स्तुती करतो’ असा आहे. या गीतातून मातृभूमीला (भारत मातेला) देवीच्या रूपात वंदन केले आहे.भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात हे गीत एक प्रेरणास्रोत आणि क्रांतीचा नारा बनले होते. दि.२४ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान सभेने या गीताच्या पहिल्या दोन कडव्यांना ‘राष्ट्रीय गीता’ चा दर्जा दिला.
वंदे मातरम या गीतातील पहिले कडवे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारलेले आहे.
वंदे मातरम्
म्हणजे हे आई (मातृभूमी) मी तुला नमन करतो.
सुजलां सुफलां मलयजशीतलाम्
म्हणजे जी मातृभूमी सुंदर पाण्याने भरलेली, गोड फळांनी समृद्ध आणि दक्षिणेकडील वाऱ्यांनी शीतल आहे.
शस्यश्यामलां मातरम् ।
म्हणजे जी हिरवीगार पिके आणि शेतांनी नटलेली आहे,अशा आईला मी नमन करतो.
वन्दे मातरम् ।
हे आई (मातृभूमी )मी तुला नमन करतो. शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम् ।
म्हणजे जिच्या रात्री सुंदर चांदण्याने आनंदीत झालेल्या आहेत.
फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम् ।
म्हणजे जी पूर्णपणे फुललेल्या फुलांनी व वृक्षांच्या पानांनी सुशोभित आहे.
सुहासिनीं सुमधुर भाषिणीम् ।
म्हणजे जी मधुर हास्य करणारी आणि गोड बोलणारी आहे.
सुखदां वरदां मातरम् ।
म्हणजे जी सुख देणारी आणि वरदान देणारी आहे, अशा आईला -मातृभूमीला मी नमन करतो.
वन्दे मातरम् । वन्दे मातरम् ।
म्हणजे हे आई (मातृभूमी ) मी तुला नमन करतो.
असा या राष्ट्रगीताचा अर्थ आहे.गीतातून व्यक्त होणारा भाव अनमोल आहे.वंदे मातरम या गीतात मातृभूमीच्या नैसर्गिक सौंदर्याचे वर्णन आहे.भारत मातेला पाणी,फळे,थंड हवा आणि हिरवीगार शेते यांनी समृद्ध असलेली देवी मानले आहे. तिची रात्र चांदणीने उजळलेली आहे,ती हसणारी आणि गोड बोलणारी आहे. ती सुख आणि वरदान देणारी आहे. या गीताचा मुख्य भाव म्हणजे मातृभूमीबद्दलची उत्कट भक्ती, प्रेम आणि आदर व्यक्त करणे, तिला देवत्व प्रदान करून तिची वंदना करणे हा आहे.
स्वातंत्र्य लढ्याच्या काळात वंदे मातरम् या गीतावर इंग्रजांनी प्रामुख्याने १९०५ मध्ये बंदी घातली होती.या बंदीची मुख्य कारणे पुढीलप्रमाणे होती: बंग-भंग आंदोलन (बंगालची फाळणी): १९०५ मध्ये जेव्हा इंग्रजांनी बंगालची फाळणी केली,तेव्हा या फाळणीला विरोध म्हणून झालेल्या प्रचंड आंदोलनात ‘वंदे मातरम्’ हे गीत प्रमुख प्रेरणास्रोत बनले. हे गीत देशभक्ती आणि राष्ट्रीय अस्मिता वृद्धिंगत करणारे ठरले, ज्यामुळे स्वातंत्र्यसैनिकांना आणि सामान्य जनतेला एकत्र येण्याची प्रेरणा मिळाली. हे गीत मातृभूमीला देवीच्या (माता) रूपात चित्रित करते आणि तिची स्तुती करते.त्यामुळे भारतीयांमध्ये प्रखर राष्ट्रप्रेमाची – – देशभक्तिची भावना आणि ब्रिटिश राजवटीविरुद्ध बंडाची भावना भारतीय लोकांमध्ये सतत वाढत होती.’वंदे मातरम’ हे केवळ गीत न राहता एक शक्तिशाली राजकीय नारा बनले होते,जो नारा ब्रिटिश सत्तेला आव्हान देत होता.इंग्रज सरकारला असे वाटले की, हे गीत राष्ट्रीय आंदोलन अर्थात स्वातंत्र्य लढ्याचे आंदोलन अधिक तीव्र करीत आहे आणि त्यामुळे इंग्रजांची सत्ता धोक्यात येऊ शकते म्हणून त्यांनी या गीताच्या सार्वजनिक गायनावर आणि घोषणेवर बंदी घातली.या बंदीमुळे मात्र वंदे मातरम् या गीताची लोकप्रियता आणि महत्त्व देशभरात अधिक वाढले.
‘वंदे मातरम्’ हा केवळ एक जयघोष नव्हता,तर तो कोट्यवधी भारतीयांसाठी मातृभूमीवरील निस्सीम प्रेम आणि स्वातंत्र्याचा धगधगता अंगार होता.असे अनेक प्रसंग आहेत,जेव्हा सामान्य नागरिकांनी आणि क्रांतिकारकांनी इंग्रजांच्या अत्याचारांना तोंड देत, मरतानाही ‘वंदे मातरम्’ चा उद्घोष केला.
फाशीवर जाताना ‘वंदे मातरम्’ चा जयघोष अनेक क्रांतिकारक तरुणांनी केला. तसेच फाशीच्या दोरावर चढण्यापूर्वी ‘वंदे मातरम्’ चा जयघोष केला.अत्यंत तरुण वयात देशासाठी शहीद झालेले खुदीराम बोस यांना जेव्हा फाशी देण्यात आली, तेव्हा त्यांनी अत्यंत धैर्याने ‘वंदे मातरम्’ चा जयघोष केला. त्यांच्या बलिदानाने अनेक तरुणांना स्वातंत्र्याच्या क्रांतीसाठी प्रेरणा दिली.अनेक ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांनी ‘वंदे मातरम्’ चा नारा दिला. हा नारा त्यांच्यासाठी अखेरचा आणि सर्वात मोठा विजय होता.१९०५ मध्ये लॉर्ड कर्झनने केलेल्या बंगालच्या फाळणीविरुद्ध (वंग-भंग) जी चळवळ उभी राहिली, त्यात ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत बनले.या काळात, हिंदू-मुस्लिम असा कोणताही भेद न ठेवता सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले.मोर्चे, सभा आणि आंदोलनांमध्ये ‘वंदे मातरम्’ हा प्रमुख जयघोष होता. या घोषणा दिल्याबद्दल इंग्रजांनी अनेक आंदोलकांना क्रूरपणे मारहाण केली,अटक केली आणि तुरुंगात टाकले,पण लोकांनी घोषणा देणे सोडलं नाही.बंगालमधील एका घटनेत, एका तरुण आंदोलकाने ‘वंदे मातरम्’ चा जयघोष केल्याबद्दल कलकत्त्याच्या मॅजिस्ट्रेटने त्याला भर कोर्टात पाठीवर वेताचे फटके मारण्याची शिक्षा दिली. या अमानुष मारामुळे तो मुलगा कोर्टातच मरण पावला, पण त्याचा शेवटचा शब्द ‘वंदे मातरम्’ होता.शांततापूर्ण आंदोलनांमध्येही नागरिकांनी इंग्रजांच्या क्रूरतेचा सामना केला.सायमन कमिशन किंवा सविनय कायदेभंग आंदोलनासारख्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज दरम्यान,जखमी झालेले नागरिक जमिनीवर कोसळत असतानाही, तोंडातून ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ हे शब्द सोडत नव्हते.लाला लजपत राय यांच्यासारख्या नेत्यांनी लाहोरमध्ये लाठीमार सहन केला.या लाठीमारानंतरच त्यांनी ‘माझ्यावर झालेले हे लाठीचे घाव ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीतील अखेरचे खिळे ठरतील’ असे ऐतिहासिक विधान केले होते. या आंदोलनांमध्येही ‘वंदे मातरम्’चा आवाज सतत घुमत होता.
वरील सर्व प्रसंग दर्शवतात की, ‘वंदे मातरम्’ हे केवळ गीत नव्हते, तर ते भारतीय नागरिकांच्या आत्म्याचा आवाज आणि अखंड भारताच्या स्वातंत्र्याचा संकल्प होता.वंदे मातरम् या राष्ट्रीय गीतास दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण झाले .या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वंदे मातरम् हा जयघोष म्हणतच ज्यांनी प्राणाची आहुती दिली आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले,अशा सर्व क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन ॥
✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले(अमरावती)मो:-८०८७७४८६०९














