


✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.19ऑक्टोबर):-देशात आणि जगात कुठेही इमारती उभ्या राहतात, दळणवळणांचे रस्ते तयार होतात, मोठमोठे कारखाने गजबजतात, तेव्हा त्यामागे परिश्रम करणारा एकमेव घटक असतो, तो म्हणजे बांधकाम कामगार. म्हणून त्यांच्या घामाच्या थेंबांवर आपली घरे, गावे, शहरे आणि स्वप्ने उभी राहातात. पण अनेकदा समाजाच्या विकासात मोलाचा वाटा असलेल्या या कामगारांच्या सुरक्षिततेकडे आणि सन्मानाकडे आपले सहज दुर्लक्ष होते. म्हणून कामगार वर्गाला सन्मान आणि संरक्षण देणे म्हणजे आपल्या समाजाच्या कणा असलेल्या वर्गाला बळ देणे होय. कारण, कामगार हाच आपल्या समाजाच्या प्रगतीचा खरा पाया आहे, असे प्रतिपादन स्थानिक आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केले.
शहरातील स्व.गोपीनाथ मुंडे अन्नछत्र सभागृह येथे आयोजित कामगार सुरक्षा किट वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी आ.डॉ.गुट्टे यांच्या हस्ते तब्बल १८५९ लाभार्थी कामगारांना सुरक्षा किटचे वाटप वाटप करण्यात आले. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विशेष सहकार्याने मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान व शासकीय योजना मोफत मदत केंद्राच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे औचित्य साधून आ.डॉ.गुट्टे यांनी उपस्थितांसह सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच मधल्या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांचे नुकसान झाल्याने व्यापारी व ग्राहक यांनी परस्पर संवादातून एकमेकांना सहकार्य करावे, असेही आवाहन त्यांनी केले.
पुढे बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, आजच्या वेगवान विकासयुगात कामगार वर्ग हा केवळ उत्पादनाचा घटक नाही, तर तो मानवी विकासाचा मूळ स्रोत आहे. त्याच्या श्रमाशिवाय कोणतेही स्वप्न साकार होत नाही, आणि म्हणूनच त्याच्या कल्याणासाठी उचललेले प्रत्येक पाऊल हे राष्ट्राच्या भविष्याकडे टाकलेले एक ठोस पाऊल आहे. सुरक्षा किट ही केवळ साहित्याची पेटी नाही, तर ती त्यांच्या आयुष्याची हमी आहे, त्यांच्या श्रमाची कदर आहे. कारण, कामगाराचा हात मजबूत झाला, तर तो राष्ट्रनिर्मितीस हातभार लागतो. म्हणूनच त्यांचे कल्याण, सन्मान आणि सुरक्षिततेसाठी सरकारने पुढाकार घेऊन सुरू केलेले किट वाटप ही फक्त योजना नसून सामाजिक जबाबदारीचे प्रतिक आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, व्यापारी सुभाष नळदकर, अनिल यानपल्लेवार, माजी सभापती शिवाजीराव निरदुडे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष इक्बाल चाऊस, तालुका प्रभारी बालाजी लटपटे, शहराध्यक्ष सय्यद अकबर, माजी उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, लाभार्थी कामगार, माता-भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.














