Home महाराष्ट्र ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानातून भरारी घ्या -कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के 

ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानातून भरारी घ्या -कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के 

171

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि.24फेब्रुवारी):-“महाराष्ट्रात 700 वर्षांपासून ज्ञानेश्वरी वाचली जाते. गीता वाचणाऱ्यांना गीता उपदेश करते. यशवंतराव आणि वेणूताई चव्हाण यांनी अर्जुनासारखे कार्य केले. विद्यार्थ्यांनी ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान आत्मसात करावे.  नवयुगाचा प्रकाश दाखवून अज्ञानातून ज्ञानाकडे समाजाला घेऊन जावे. सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटला पाहिजे. विचार व्यक्त कारण्यासाठी अनेक व्यासपीठे उपलब्ध आहेत. तेव्हा भाषेचे सौदर्य समजून घ्या. भोवतालचे सूक्ष्म निरीक्षण करून स्वतः त्याचे आकलन करून घ्या. सर्वच शाखा विस्तीर्ण झाल्या असून त्यामध्ये तुम्ही गगन भरारी घ्यावी व यश संपादन करून नावलौकिक प्राप्त करावा. ” असे प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, साताराचे कुलगुरू मा. डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी केले. ते श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराडच्या उच्च शिक्षण मंडळ, कराडचे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. 

    या समारंभाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री अल्ताफहुसेन नसिरुद्दीन मुल्ला (जनरल सेक्रेटरी, श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ,कराड) हे होते. ते म्हणाले की, “जे का रंजले गांजले त्यांसी करूया आपुले” या संतवचनानुसार श्री शिवाजी शिक्षण संस्था ग्रामीण भागातील मुलांना नवनवीन शिक्षण उपलब्ध करून देते. यशवंतराव चव्हाण साहेब यांचा विचार आणि वारसा समर्थपणे सांभाळत आपण जोमाने कार्य करत आहोत. आमचे विध्यार्थी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतीक, कला, क्रीडा आदी क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन यशवंत, गुणवंत व कलावंत होतात याचा आम्हाला अभिमान वाटतो.”

     या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात राष्ट्रीय, राज्यस्तरीय व विद्यापीठस्तरीय पातळीवर विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या यशवंत, गुणवंत, कलावंत व खेळाडू विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. 

     सदर कार्यक्रमाचा प्रारंभ प्रमुख पाहुणे महाविद्यालयात येताच त्यांचे एन. सी. सी. विद्यार्थ्यांनी गार्ड ऑफ ऑनर देऊन स्वागत केले. प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन, हिरवळ भित्तीपत्रकाचे प्रकाशन, रांगोळी व पुष्परचना आणि ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन यांचे उदघाटन करण्यात आले.

     या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभास मा. श्री अरुण पांडुरंग पाटील (काका), मा. श्री. दिलीपभाऊ चव्हाण, (विश्वस्त व सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराड), माजी प्राचार्य बी. एन. कालेकर आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते. 

       वार्षिक पारितोषिक समारंभ प्रसंगी प्रथम प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. विद्यार्थिनी यांनी स्वागतगीत गायले. सदर कार्यक्रमात जिमखाना उपाध्यक्ष प्रा. डॉ. आर. आर. थोरात यांनी प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक केले. महाविद्यालयाच्या प्रचार्या प्रा. डॉ. श्रीमती एस. आर. सरोदे यांनी अहवाल वाचन केले. तर डॉ.  एम. ए. कदमपाटील यांनी प्रमुख अतिथी व अध्यक्ष यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रीमती एस. पी. पाटील यांनी केले. तर आभार उपप्राचार्य श्री आर. ए. कांबळे यांनी मानले. 

     सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील माजी शिक्षक, प्राध्यापक व पालकांनी हजेरी लावली. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यपिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, विध्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here