


▪️फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कलची ९३ वी वैचारीक प्रबोधनात्मक कार्यशाळा संपन्न
✒️छत्रपती संभाजी नगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
छत्रपती संभाजी नगर(दि.13फेब्रुवारी):- फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कल व दि ऑल इंडिया नाग असोसिएशन (आईना) च्या संयुक्त विद्यमाने फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कलचे जनसंपर्क कार्यालय, साकेत नगर, छत्रपती संभाजी नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वीय सहाय्यक नानकचंद रत्तू, ललई सिंह यादव, त्याग मूर्ती माता रमाई यांच्या जयंती निमित्त व रविवारच्या सुट्टीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्वातंत्र्य, समता, बंधुभाव ह्या तत्वावर आधारलेली नवी पद्धती हे कामगार संघटनांचे ध्येय असावे. या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानाच्या ८७ व्या वर्धापनदिनानिमित्त सदरील विषयावर ९३ वी वैचारीक प्रबोधनात्मक कार्यशाळा ९ फेब्रुवारी २०२५ ला संपन्न झाली.
फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कलचे संचालक बी. बी. मेश्राम अध्यक्षीय मार्गदर्शन करताना म्हणाले की, या विधानात असलेल्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव याविषयी बोलताना बाबासाहेब म्हणतात की, हे तिन्ही शब्द एकाच वेळी अस्तित्वात आले असे नाही. मात्र गरजेप्रमाणे अस्तित्वात आले, ते आपणासाठी पुरणपोळीतील पुरणाप्रमाणे आहेत. म्हणून आपण जसा पुरणपोळीचा आस्वाद घेत असतो, तसा समाज जीवनात वैचारिक पुरणपोळीचा तौलनिक आस्वाद घेतला पाहिजे. याची जाणीव ठेवून कामगार संघटनानी आपल्या सर्व व्यवहारात अंमलबजावणी केली पाहिजे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी रविवारच्या सुट्टी साठी लढा दिला म्हणून आज आपण ती सुट्टी आनंदाने उपभोगतो. परंतु परिवर्तनवादी महापुरुषांच्या कार्यास पुढे घेऊन जाण्यासाठी आपण किती आणि कसा वेळ देत आहोत? असा प्रश्न आम्ही स्वतःला विचारण्याची नितांत आवश्यकता आहे. जेणेकरून समाज जीवनात वाढणा-या बेरोजगारीवर अंकुश लावण्यासाठी उपाय योजनावर अंमलबजावणी करता येईल.
दलित शब्दाच्या अनुषंगाने वारंवार चर्चा पुढे येत असते, जसे पंचशील सर दलित म्हणजे मानवतेचा महासागर होय असे म्हणतात. ऐतिहासिक दृष्ट्या ते जरी बरोबर असले तरी वर्तमान काळात ते कसे वापरले जाते? त्याचे काय परिणाम होऊ शकतात? याचा विचार करून प्रयोग केला पाहिजे. यासाठी बामसेफ ने दलित अस्मितेचे गौडबंगाल या विषयावर यापूर्वी चर्चा घडवून आणल्या आहेत. दलित पँथर सारख्या संघटनांचा उदय आणि पुढील काळातील वास्तविकता पण समजून घेणे आवश्यक आहे. अन्यथा, ‘कोरा कागज, कोरा ही रह गया।’ अशी आपली स्थिती होईल.
एकंदरीत चळवळीच्या दृष्टीने विचार करता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जीआयपी रेल्वे कामगारांच्या परिषदेत बोलताना प्रत्येक मानवाला मिळाले पाहिजेत असे मूलभूत हक्क आपणास मिळाले नाहीत. याची जाणीव करून देताना सामाजिक व आर्थिक शक्ती सोबत राजकीय सत्तेचे महत्त्व अधोरेखित केले होते. कामगारांना आपल्या समस्या निर्मूलनासाठी ब्राह्मणशाही व भांडवलशाही या दोन शत्रूशी प्रामुख्याने लढावे लागेल, असेही स्पष्ट केले होते. तसेच वैचारीक पुरणपोळीतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव याच्या मर्यादा लक्षात घेऊन दुरूपयोग होणार नाही याची जाणीव ठेवून मार्गक्रमण केले पाहिजे. करिता कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी मिळवून दिलेल्या रविवारच्या सुट्टीचा बुद्ध फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीला वेगाने गतिमान करण्यासाठी सदुपयोग केला पाहिजे. म्हणून आपण परिवर्तनवादी महापुरुषांच्या कार्यास नीट समजून घेऊन प्रचार आणि प्रसार केला पाहिजे.
याप्रसंगी इंजिनिअर किशोर पाटील उद्घाटनपर मार्गदर्शन करताना म्हणाले की, जीआयपी रेल्वे कामगार संघटनेच्या नियोजित कार्यक्रमात मुळात कामगारांची संघटना अस्तित्वात असताना नवीन मागासवर्गीयांची संघटना का निर्माण करीतआहात? या आरोपाला उत्तर देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, अस्तित्वातील संघटनेत न्याय दिला जात नसल्याने नाईलाजाने हे मागासवर्गीयांचे स्वतंत्र संघटन चालविणे भाग पडले आहे. मागासवर्गीयांना निकृष्ट दर्जाचे काम दिले जात असून सातत्याने भेदभाव केला जात आहे. परिणामी न्याय मिळवून देण्यासाठी स्वतंत्र संघटना निर्माण करणे अगत्याचे झाले आहे.
प्रमुख वक्ते महादेव डांबरे म्हणाले की, सर्वोच्च अधिकार चळवळीतील कार्यातून प्राप्त होतात असे कामगारासमोरील परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केले होते. कामगारांचे हित साध्य करण्यासाठी कार्यकारी मंडळासमोर समस्या मांडल्या पाहिजेत. केवळ ट्रेड युनियनच्या बळावरच मागण्या मान्य होत नसतात तर त्या करिता शासनकर्त्यांचे पाठबळ पण असावे लागते. राजकारणात शिरणे म्हणजे केवळ नवीन पक्ष स्थापन करणे नव्हे! तर अस्तित्वातील दर्जेदार पक्षात कार्य करावे. करिता स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहिरनामा आपण समजून घेणे आवश्यक आहे.
याप्रसंगी उद्योजक मिलिंद बागूल म्हणाले की, तत्कालीन परिस्थितीत वरच्या पोस्टवर उच्चवर्णीय तर खालच्या पोस्टवर मागासवर्गीय असायचे ज्यात मागासवर्गीयांची पदोन्नती सुद्धा होऊ दिली जात नसे. साधू आनंद म्हणाले की, सहकारी सोबत आणले तर कार्याला बळ प्राप्त होईल. संग्राम घाटे म्हणाले की, आपण परिवर्तनवादी तत्वे अस्तित्वात आणण्यासाठी कार्य केले पाहिजे. प्रतीक पंचशील म्हणाले की, वैयक्तिक प्रगतीने सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईलच असे नाही म्हणून सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होण्यासाठी आपण कार्य केले पाहिजे. श्रमिक वर्ग बौद्धिकतेला जास्त स्विकार करीत नसतो कारण त्यांना ते कळतच नसते. आपण इतरांवर टिका करण्यापेक्षा ज्याला जे कळते ते त्याला ते करू द्यावे.
सुरुवातीला आदर्शांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आल्या तर स्टडी सर्कलच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. 
कार्यशाळेचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक एड. विलास रामटेके यांनी व्यक्त केले. या कार्यशाळेला उद्योजक मिलिंद बागूल, इंजिनिअर किशोर पाटील, महादेव डांबरे, संग्राम घाटे, प्रतीक पंचशील, एड. विलास रामटेके, बी. बी. मेश्राम, साधू आनंद इत्यादी प्रतिनिधी उपस्थित होते. अशाप्रकारे आभार प्रदर्शनाने कार्यशाळा हर्षोल्हासात संपन्न झाली.














