


✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कराड(दि.13फेब्रुवारी):-सोशल मीडियाचे फायदे जितके आहेत तितकेच तोटे आहेत. एकाच वेळी अनेक लोकांच्या पर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी, आपल्यापासून दुर्गम भागातील लोकांच्या पर्यंत संपर्क साधण्यासाठी , व्यापारासाठी, जाहिरातीसाठी, शिक्षणासाठी, विविध माहितीसाठी सोशल मीडियाचा चांगला वापर करता येतो. आजचा युवक सोशल मीडिया वापरत असताना बऱ्याच गोष्टीचे अंधानुकरण करतो. सोशल मीडियावर जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत तितक्याच वाईट ही गोष्टी आहेत. आजचा युवक रील्स आणि शॉट्स बघण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यस्त आहे. लाईक आणि शेअर याच्यामध्ये तो आपला बराच वेळ खर्च करतो. नको त्या गोष्टीच्या आहारी जाऊन नको त्या साईड बघण्यामध्ये आजची तरुणाई व्यस्त आहे. फेसबुक व्हाट्सअप युट्युब हेच आपले जीवन आहे असे काही जण मानतात.
व्हाट्सअप, फेसबुक यांचा योग्य वापर कसा करायचा हे आजच्या मुलींनी जाणून घेतले पाहिजे. नको ते व्हिडिओ शेअर करणे, कमेंट्स करणे, फोटो अपलोड करणे, व्हाट्सअप चॅटिंग करणे, व्हिडिओ कॉलिंग करणे या गोष्टी करत असताना युतीने जागृत राहिले पाहिजे. सोशल मीडिया हा भुलभुलय्या आहे याची जाणीव ठेवून प्रत्येक व्यक्तीने त्याचा योग्य वापर करावा. त्याला आपल्या जीवनामध्ये अधिक महत्त्व न देता स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर ज्ञानवृद्धीसाठी करणे गरजेचे आहे’. असे प्रतिपादन प्रा.प्रदीप चोपडे यांनी केले. ते कला व वाणिज्य महाविद्यालय, उंडाळे येथील राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये ‘समाज माध्यमे आणि आजचा युवक’ या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री काकासाहेब माने उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजनेचे दिनांक 30 जानेवारी ते 5 फेब्रुवारी यादरम्यान मौजे तुळसण या ठिकाणी विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न होत आहे. या शिबिरामधील व्याख्यानाचे पहिले पुष्प गुंफण्यासाठी प्रा.चोपडे उपस्थित होते. प्रकल्प अधिकारी प्रा. हनुमंत पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. साक्षी कांबळे पाहुण्यांची ओळख कु. निखिल डंबारके आभार कु.स्मिता मोरे सूत्रसंचालन कु. सानिका साळुंखे यांनी केले. या कार्यक्रमास तुळसणगावचे ग्रामस्थ व शिबिरार्थी उपस्थित होते














