


▪️जंबो कार्यकारिणी घोषित : आ.गुट्टेंच्या हस्ते नियुक्तीपत्रे
✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.26जानेवारी):-नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर गुट्टे काका मित्र मंडळाची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात नव्या कार्यकारिणी विषयी अंदाज लावले जात होते. तसेच उलट-सुलट चर्चेला उधाण आले होते. अखेर त्या सर्व चर्चेला पूर्णविराम मिळाला असून गुट्टे काका मित्र मंडळाची नवी जंबो कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून शहरातील राम-सीता सदन येथे संपन्न झालेल्या बैठकीत गंगाखेड व पालम तालुक्यातील कार्यकारणीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामध्ये काही जुन्या पदाधिकाऱ्यांची खांदेपालट तर अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. याच बैठकीत आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. याप्रसंगी आ.डॉ.गुट्टे यांनी नव्या कार्यकारिणीचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. तसेच मार्गदर्शन सुद्धा केले.
नव्याने घोषित झालेल्या कार्यकारिणीनुसार जिल्हाध्यक्ष म्हणून संदीप आळनुरे, उपाध्यक्षपदी माधवराव गायकवाड, हनुमंत मुंढे, संदिप वाळके, कृष्णा सोळंके, विधानसभा अध्यक्षपदी किशनराव भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच गंगाखेड तालुकाध्यक्ष म्हणून प्रल्हाद शिंदे, उपाध्यक्ष उध्दव चोरघडे, अशोक मुंढे, गोविंद सानप, तुकाराम वाळके, बालासाहेब फुगनर यांची निवड झाली आहे.
तर गंगाखेड शहराध्यक्ष म्हणून ॲड.सय्यद अकबर, उपाध्यक्ष राजेश दामा, जगदिश तोतला, आकाश पारवे, सचिन नाव्हेकर तसेच दलित आघाडी शहराध्यक्ष म्हणून सुमित कामत उपाध्यक्ष हरिभाऊ साळवे, राहुल गायकवाड आणि युवक तालुकाध्यक्ष कुलदीप जाधव यांची वर्णी लागली आहे. तसेच पालम तालुका कार्यकारिणीत तालुका अध्यक्ष म्हणून चंद्रशेखर लांडगे, युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ढोले, पालम शहराध्यक्ष अजिउल्ला खान पठाण, युवक तालुका अध्यक्षपदी विजयकुमार घोरपडे, तर दलित आघाडी तालुकाध्यक्ष म्हणून गंगाधर मस्के, उपाध्यक्ष बाबासाहेब एंगडे ओबीसी सेल तालुकाध्यक्ष पवन सोन्नर यांचाही समावेश करण्यात आला आहे.
यंदा झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील कामगिरी आणि त्यांचा जनसंपर्क लक्षात घेऊन या निवडी केल्याचे निवड समितीने सांगितले आहे. त्यामुळे निवड झालेले सर्व पदाधिकारी आपल्याला दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतील. तसेच संघटन वाढीसह सामाजिक बांधिलकी जोपासून काम करीत राहातील, असा विश्वास आ.डॉ.गुट्टे यांनी म्हटले.
दरम्यान, आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लक्षात घेऊन या निवडी झाल्यामुळे याचा चांगला फायदा होईल, असा अंदाज राजकीय क्षेत्रात वर्तवला जात आहे.














