


✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि. 14 ऑगस्ट ):-स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स ब्रह्मपुरी येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी तथा एन. सी. सी. कॅडेट्सनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेच्या सदस्या तथा महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे, मराठी भाषा विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. जगदीश मेश्राम, रा से. यो. कार्यक्रम अधिकारी तथा इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. राजेश कोसे यांनी परीक्षक म्हणून विचारमंचावर उपस्थित होते. विजेत्या स्पर्धकांची नावे महाविद्यालयाच्या वार्षिकोत्सवात जाहीर केली जातील असे घोषित करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन आणि आभार विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. तुफान अवताडे यांनी केले. महाविद्यालयातील संगीत विभागाचे प्रमुख प्रा. गणेश तिवाडे आणि त्यांच्या चमूने शब्दांना सुरांची सुरेख साथ दिली. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.














