


🔸ठाणे येथे घुमला आवाज : कबड्डी असोसिएशनची शाब्बासकीची थाप
✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.16जुलै):-शहरात संपन्न झालेल्या ४९ व्या कुमार-कुमारी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने दखल घेवून मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानला सर्वोत्कृष्ट स्पर्धा संयोजक पुरस्कार देवून गौरविले आहे. प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष हनुमंत मुंढे, सचिव ॲड.मिलिंद क्षिरसागर यांनी ठाणे येथील गडकरी रंगायतन सभागृहात हा पुरस्कार स्वीकारला.
मागील डिसेंबरमध्ये प्रतिष्ठानने कबड्डी स्पर्धेचे अतिशय सूत्रबद्ध नियोजन केले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील हजारो स्पर्धेकांना आपले कौशल्य सिद्ध करता आले. आयोजक म्हणून भूमिका पार पाडताना प्रतिष्ठानने राहाणे, भोजन, प्रवास, स्वागत, नावनोंदणी, प्रत्यक्ष खेळ, आसन व्यवस्था, मैदान, पाणी, अल्पोपहार अशा सर्व बाबींचे काटेकोरपणे नियोजन केले होते. त्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने घेतली आहे.
प्रतिष्ठानने सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा व उद्योगसह विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच निबंध व वक्तृत्व स्पर्धा, गौरी-गणपती सजावट स्पर्धा, नौकरी मेळावा, पत्रकार संमेलन, अभिवादन महामानवांना सामान्य ज्ञान स्पर्धा, गझल संमेलन, राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा, उद्योग मेळावा या उल्लेखनीय उपक्रमांचे प्रभावीपणे आयोजन केले होते.
हा पुरस्कार म्हणजे प्रतिष्ठानच्या धडपडीचे यश आहे. कबड्डी असोसिएशनने टाकलेली हि शाब्बासकीची थाप जबाबदारी वाढवणारी आहे. त्यामुळे भविष्यात सुध्दा सर्व समाज घटकांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित केले पाहिजेत, अशी अपेक्षा गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केली आहे.
हा पुरस्कार मिळणे म्हणजे प्रतिष्ठानच्या कामगिरीची राज्य पातळीवर घेतलेली दखल आहे. सेवाभावी वृत्तीने प्रतिष्ठान नेहमी कार्यरत असते. गरजू लोकांना आधार व पाठबळ देण्यात सुध्दा प्रतिष्ठानने सातत्याने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रतिष्ठानचे सर्व पदधिकारी, हितचिंतक, देणगीदार, पाठीशी उभे राहाणाऱ्या सर्व लोकांचे अभिनंदन आणि आभार तसेच महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचेही आभार, अशा शब्दात सचिव ॲड.मिलिंद क्षिरसागर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत मुंढे, उपाध्यक्ष शिवाजी पवार, सचिव ॲड.मिलिंद क्षिरसागर, कोषाध्यक्ष सचिन महाजन, सदस्य राजेभाऊ बापू सातपुते, हनुमंत लटपटे, कवी विठ्ठल सातपुते, संभुदेव मुंढे यांच्यासह आ.डॉ.रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळ आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे वरिष्ठ पदधिकारी व कार्यकर्ते यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला आहे













