Home नागपूर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेत राजकुमार बडोले यांची नियुक्ती

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेत राजकुमार बडोले यांची नियुक्ती

97

✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नागपूर(दि.4जून):-महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू), नागपूरच्या कार्यकारी परिषदेच्या सदस्यपदी माजी मंत्री तथा ज्येष्ठ समाजनेते राजकुमार बडोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन व प्रशासकीय कार्याला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विद्यापीठाच्या सर्वोच्च निर्णयप्रक्रियेतील महत्त्वाची यंत्रणा म्हणून कार्यकारी परिषद ओळखली जाते.

 विद्यापीठातील शिक्षण व्यवस्था बळकट करणे, संशोधनाला चालना देणे, विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून शेतकरी व पशुपालकांपर्यंत आधुनिक ज्ञान पोहोचविणे, अभ्यासक्रमांचे अद्ययावतीकरण, पायाभूत सुविधांचा विकास तसेच पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यविज्ञानाशी संबंधित विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यकारी परिषद महत्त्वाची भूमिका बजावते. राजकुमार बडोले यांना सार्वजनिक जीवनातील प्रदीर्घ अनुभव असून सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा लाभ विद्यापीठाला होणार आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास विविध स्तरांतून व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, त्यांच्या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत करत अभिनंदन केले आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार , राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल, सुनील तटकरे यांच्यासह नियुक्त आमदार डॉ परिणय फुके, चैनसुख संचेती आणि संजय मेश्राम यांनी राजकुमार बडोले यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वाचा लाभ विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन व विकासात्मक उपक्रमांना होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here